विज्ञानावर बंदी घातलेलं गाव
एका गावातल्या लोकांनी विज्ञान हा शब्द कधी ऐकलेलाही नसतो आणि विज्ञान कशाशी खातात, तेही त्यांना ठाउक नसतं. गावात कोणाला काही अडचणी आल्या, तर त्या गावातला एक बाबा काहीतरी विचित्र उपाय सुचवत असतो आणि ते उपाय केल्यावर त्या अडचणी सुटतील असं सांगत असतो. त्या बाबाचे उपाय खूपच गंमतशीर असतात. आजारी पडल्यावर लोक याच बाबाकडे जात असतात. खरं तर त्या गावात डॉक्टरही असतात, पण बहुतांशी लोक मात्र बाबाकडेच जात असतात.
या गावात जांभुळा नावाची छोटी मुलगी असते आणि तिचा दम्या नावाचा एक मित्र असतो. दम्या काही ना काही उचापत्या करत असतो, तर जांभुळाला प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल वाटत असतं. दम्याच्या उचापत्यांमध्ये जांभुळा त्याला साथ देत असते.
या गावात दलित-सवर्ण किंवा काळे-गोरे असा भेद मोठ्या प्रमाणावर असतो. तो का असतो हे जांभुळाला कळत नसतं आणि अशा वेळी गावात हरिश नावाचे एक विज्ञानशिक्षक येतात. मुलंच नव्हे तर गावातली सगळीच मंडळी या शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे चकित होतात. शिक्षकांनी सांगितल्यामुळे त्यांना आपण पृथ्वीवर राहतो हे प्रथमच कळतं. मग पृथ्वीच्या शोधाची, पायथॅगोरस आणि ॲरिस्टॉटलची माहिती गावकऱ्यांना कळते. हळूहळू गावातल्या लोकांना गॅलिलिओ ठाउक होतो. ॲलेक्झांडर फ्लेमिंगही माहीत होतो. एक एक शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध ऐकून गावकऱ्यांना विज्ञानाची गोडी लागायला सुरुवात होते. इतके दिवस बाबा आणि सरपंच आपल्याला फसवत असल्याचंही त्यांच्या लक्षात येतं. आपलं महत्व कमी होतंय, लोक जागृत होताहेत हे बाबा आणि सरपंच यांना आवडत नाही. मग बाबा आणि सरपंच गुंडांना हाती धरून गावात दहशत निर्माण करतात. जो कोणी विज्ञानाचं नाव घेईल त्याची पायाची करंगळी कापण्यात येणार असते. अशा रीतीनं त्या गावात विज्ञानावर बंदी घालण्यात येते. अशा वेळी कुतूहल असणाऱ्या जांभुळाचं विज्ञानाचं शिक्षण तिथेच थांबतं का? गावकऱ्यांना पुन्हा अंधश्रद्घेला शरण जावं लागतं? शिक्षक हरिश हे गाव सोडून जातात का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानावर बंदी घातलेलं गाव या पुस्तकात आपल्याला मिळतात.
या पुस्तकाचं वैशिष्टय म्हणजे गोष्ट सांगत सांगत, त्याच वेळी विज्ञानातल्या अनेक शोध, अनेक शास्त्रज्ञ आणि अनेक प्रयोग सांगितले आहेत. त्यामुळे एकीकडे गोष्ट वाचल्याचा किंवा ऐकल्याचा आनंद, तर त्याचबरोबर आपल्या आयुष्यात विज्ञानाचं महत्व किंती आहे हे नकळत सांगून जाणारे हरिश शिक्षक... दोन्हीही या पुस्तकातून बरोबरीनं जात राहतात. विज्ञान आणि गणित शिकताना जसा कंटाळा येतो, तसं मात्र या पुस्तकात होत नाही, तर न्यूटन आणि गुरूत्वाकर्षण म्हटलं की डोळे विस्फारले जातात आणि गुरूत्वाकर्षण म्हणजे काय, किंवा गॅलिलिओ म्हटलं की जडत्वाचा नियम काय हे सगळं जाणून घेण्याची उत्कंठा वाढते. आकाशातला चांदोबा फक्त गोष्टीपुरता राहत नाही, तर त्याच्यावर असलेले खड्डे गॅलिलिओच्या दुर्बिणीतून वाचकाला देखील दिसायला लागतात. सौरउर्जा म्हणजे काय, ती काय काय करू शकते हेही समजतं.
या पुस्तकाचं सगळ्यात ठळक वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक लिहिणारी लेखिका आहे, संगीता मुळे आणि संगीताची आई अंजली मुळे यांनी या पुस्तकाचा अनुवाद मराठीतून अतिशय सुरेख, बोलका असा केलेला आहे. अशा प्रकारची पुस्तकं शाळेतून वाचनासाठी उपलब्ध करून दिली गेली, तर मुलांना विज्ञान मुळीच कठीण वाटणार नाही. हे पुस्तक वाचताना मला अत्र्यांचा चांदोबाचा अंगरखा, दिनूचं बिल अशा अनेक कथांची आठवण झाली. विज्ञान असो वा मूल्यं, त्यांची पेरणी अत्र्यांनी आपल्या लिखाणातून सहजपणे केली होती आणि तसाच प्रयत्न संगीता मुळे हिने केला असून तिने अशा प्रकारचं लिखाण खूप खूप करावं यासाठी मनापासून शुभेच्छा.
जरूर वाचा, विज्ञानावर बंदी घातलेलं गाव, लेखिका संगीता मुळे, अनुवाद - अंजली मुळे, प्रफुल्लता प्रकाशन, किंमत १२० रूपये फक्त. आणि हो, यातली सुरेख, पात्रांच हुबेहूब दर्शन घडवणारी चित्र गिरीश सहस्त्रबुध्दे यांनी रेखाटली आहेत.
प्रकाशक संपर्क...9422504030
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment