2022 : एक दंत कथा

2022 : एक दंत कथा

तारीख

आवडता अभिनेता फहाद फासिल आणि कमल हसन हे दोघेही एकत्रित ‘विक्रम’ या चित्रपटात असल्याचं कळताच, अस्मादिकांनी  अपूर्वला मिळेल त्या शोचं तिकीट बुक करायला सांगितलं आणि जम्बो पॉपकॉर्न खात खात तरुणाईने हाऊसफुल केलेल्या वेस्ट एंड थिएटरमध्ये चित्रपट बघायला सुरुवात केली.
त्याच क्षणी माझ्या दंतकथेनं जन्म घेतल्याची जाणीव मला झाली. डाव्‍या बाजूचा सुळा हालचाल करत असल्याचं लक्षात आलं. हळूच त्या सुळ्याला बोट लावून बघितलं, तर ‘मी डोलकर डोलकर दरियाचा राजा’ असं त्याचं गाणं मला ऐकू आलं. मग बोटाऐवजी मिनिटामिनिटाला जीभेनं स्पर्श करत मी त्या गाण्याला आणखीनच वेगानं लय देण्याचं काम सुरू केलं. 
तेवढ्या अंधारातही अपूर्वला माझे हे कारनामे लक्षात आले असावेत. त्याने मला काय सुरू आहे, असं विचारलं. मी जाणीवपूर्वक दु:खी आवाज काढत, ‘माझा दात हलतोय’ असं सांगितलं. तिकडची पडद्यावरची वेगळी पटकथा आणि इकडची खुर्चीवरची वेगळी कथा रंगत अखेर चित्रपट संपला. 
दुसऱ्या दिवशी सकाळ होताच, अपूर्व माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला ओळखीच्या डेंटिस्टना फोन करायचं फर्मान त्यानं काढलं. श्वेता, सुवर्णसंध्या, नयन, डॉ. प्रकाश शेठ, डॉ. माधवी मेहेंदळे/आदिती अशा सगळ्यांशी मी मेसेज आणि फोनद्वारे बोलले. काहींचे फोन लागले नाहीत. त्यानंतर जवळच्या बालेवाडी इथल्या बियाँड स्माईल नावाच्या डेंटल क्लिनिकमध्ये अपूर्वसह जावून पोहोचले.
तिथे गेल्यावर माझ्या सामान्यज्ञानात आणखी भर पडली. नीरजा नावाच्या गोड डॉक्टर मुलीने आमचे भूषण नावाचे डॉक्टर खूप चांगले आणि अनुभवी आहेत, असं सांगत  माझा हा सुळारूपी दात काढून टाकावाच लागेल, असा निर्णय दिला. त्यानंतर तिथे ब्रिज करायचा, किंवा इंन्प्लॉन्ट करायचं वगैरे पर्याय तिने मला दिले.  ‘हे सगळं खूप सोपं असतं’ असं तिने सांगितल्यामुळे मी निर्धास्त झाले आणि ‘जे काय करायचं ते करा’ असं बेफिकिरीने म्हणत मी दुसऱ्याच दिवशीची सकाळची वेळ घेतली. 
दुसऱ्या दिवशी क्लिनिकला जायची तयारी करत असतानाच आसावरीचा फोन आला आणि अपूर्व मला तिथे फक्‍त सोडणार, या दोन तासांच्या काळात माझ्याबरोबर कोणीही नसणार हे कळताच, अतीव मायेनं पण डरकाळी फोडत ‘अग, असं कसं’ म्हणत ‘मी येतेय’ असं तिने सांगितलं. ‘कशाला येतेस, नको येऊस’ असं सांगूनही तिने ऐकलंच नाही. माझ्या आधी ती क्लिनिकमध्ये जणू काही हातात तलवार घेत, घोड्यावर स्वार होत वेगानं जावून पोहोचली.
इतका वेळ मला सगळी गंमतच वाटत होती, पण क्लिनिकमध्ये पोहोचताच माझा डॉक्टर नावाचा फोबिया उफाळून आला. मला डॉक्टरांची, उपचारांची किती भीती वाटते हे मी आधीच सगळ्यांना जाहीर केलेलं होतंच. पण आता प्रत्यक्ष सामोरं जाण्याची वेळ आली होती आणि ती येताच माझं उसनं अवसान गळून पडलं.  तिथे असलेल्या पेंशटच्या ऐतिहासिक खुर्चीवर पहुडल्यावर महाभयंकर अक्राळविक्राळ रूप घेत भीतीने माझ्या अंगात प्रवेश केला. आसावरीचं येणं म्हणजे माझ्यासाठी कुणीतरी देवदूत किंवा मदर तेरेसा पाठवल्याइतकं महत्वाचं वाटू लागलं. 
एका लांबलचक सुईच्या मागे असलेल्या सिरींजमध्ये ॲनेस्थेशिया टाकलेला मला दिसला. आता दाढेतून मला तो टोचण्यात येणार होता. मी गडबड करणार असं माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसल्यामुळे भूषण डॉक्टरांच्या दोन साहाय्यकांनी माझं डोकं आणि खांदे दाबून धरलेले होते. आणि ते पावनखिंड मधल्या मावळ्यांसारखे हर हर महादेव म्हणताना हर हर  चुकीचं म्हणत असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यांना बालाजी सुतार च्या ताब्यात द्यावं असही वाटलं. पण मी गप्प बसले. ॲनेस्थेशिया दिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची सगळी अवजारं घेऊन ‘आक्रमण’ असं म्हटल्यासारखा चेहरा केला. पण त्यांच्या हत्याराचा स्पर्श होताच, माझ्या हिरड्यांनी ॲनेस्थेशियाचा काहीच प्रभाव पडलेला नाही असं सांगत मला तो भाग दुखत असल्याची जाणीव दिली. ॲन्स्थेशियापुढे माझ्या हिरड्यांचा विजय झाला होता, पण डॉक्टर काही हार मानणाऱ्यातले नव्‍हते. ॲनेस्थेशियाचा कुठलाच परिणाम न झाल्याचं बघून डॉक्टरांनी उत्साहाने पुन्हा दुसऱ्यांदा सिरींज भरली आणि पुन्हा एकदा ‘काही होत नाही’ असं म्हणत ती लांबलचक सुई हिरड्यांमध्ये टोचवली. पुन्हा हत्यारं माझ्यावर आक्रमण करण्यासाठी सज्ज झाली आणि पुन्हा एकदा हिरड्यांनी मला वेदनेची चाहूल दिली. 
आता मात्र दोनदा ॲनेस्थेशिया देवूनही आपला पेशंट सद्दामसारखा उद्दामपणा करतोय हे लक्षात येताच डॉक्टरांनी चेहऱ्यावर हासू, पण मनातून चिडत पुन्हा तिसऱ्यांदा सिरींज भरली आणि मला ॲनेस्थेशियाचा तिसरा डोस टोचवला. आता बऱ्यापैकी परिणाम जाणवायला लागला होता. त्या क्षणी मला ॲनेस्थेशियाचा परिणाम आपल्यावर होत नाही असं पाहून वाटलं, की मी जर दारूबहाद्दर असते, तर एका पेगमध्ये/एका ग्लासमध्ये मला काहीच झालं नसतं. कदाचित माझ्याबरोबरचे एकदोन पेगमध्ये आडवे म्हणजे आडव्‍या झाल्या असत्या. पण मला किमान ७/८ पेग तरी घ्यावे लागले असते. आणि अट्टल दारूडा बनण्यासाठी तर आणखी डोस वाढवावे लागले असते.
तर मी विचारांमधून बाहेर आले. डॉक्टर मला ‘घाबरू नका, शरीर सैल सोडा, काही होणार नाही.’ असं सांगत होते. पण माझं शरीर माझं ऐकत नव्‍हतं, त्याला मी काय करणार? पुन्हा माझं डोकं खांदे घट्ट दाबून धरण्यात आले. डॉक्टरांनी मला रिलॅक्स करण्यासाठी आसावरीला माझी आवडती गाणी लावायला सांगितलं. स्पॉर्टीफायवरची माझी प्ले लिस्ट तिने सुरू केली, पहिलंच गाणं, ‘राजनिती’ या चित्रपटातलं सुरू झालं, ‘मोरा पिया मोसे बोलत नाही…..’ वा, काय गाणं आहे, त्यातली आर्तता, त्या सुरांचं मनाला भिडणं, …मी क्षणभर रमले. त्या दरम्यानं आसावरी त्यांना विचारत होती, ‘तुम्ही विदर्भातले दिसता डॉक्टर…’ तेही, ‘तुम्ही कसं ओळखलंत? मी अमरावतीचा’. ‘अरेच्च्या मीही अमरावतीला अमूक तमूक शाळेत शिकले होते. काय भारी होती ना ती शाळा….’ दोघांच्या गप्पा अशा काही रंगल्या की जणू ते १० हजार वर्षांपासूनचे मित्र असावेत. मला मात्र भीती वाटायला लागली, माझ्या त्या सुळ्याच्या ऐवजी ते भलताच दात काढतील की काय. अशा प्रकारच्या अनेक घटना मी विनोद म्हणून वाचलेल्या होत्या. ते विनोद आता खरे होणार की काय? त्या सगळ्याच्या सगळ्या विनोदी कथा मला त्या क्षणी आठवल्या. तेवढ्यात हत्यारांनी आपलं काम चोखपणे बजावलं होतं. मेंदूपर्यंत एक जोरदार सनक जावून टणकन डॉक्टरांच्या स्टिलच्या भांड्यात ‘सुळा’ नामक घटक पडला. डॉक्टरांनी हुश्श केलं, त्यांनी अर्धा गड जिंकला होता. डॉक्टर जर युरोपमधले असते, तर तिथल्या मानसिकतेनुसार आसावरीचं त्यांच्याबरोबरचं हे संभाषण रंगलं असतं का असा प्रश्न मला पडला. दोघांनी एकमेकांकडे किती तिरसट नजरेनं बघितलं असतं या काल्पनिक दृश्यानं माझ्या चेहऱ्यावर किंचित हासू उमटलं.
आता ‘इंटरवलके बाद’का चित्रपट शुरू होनेवाला था. मी ‘झालं का झालं का’ अशा करूण नजरेनं डॉक्टरांकडे बघत होते, आणि ते मात्र सुतारासारखी एक ड्रिलमशीन टाईप हातात काहीतरी घेवून पुन्हा आक्रमणकर्त्याच्या भूमिकेत शिरले होते. ते कितीही चांगलं वागत असले, तरी मला त्या क्षणी त्यांच्यामध्ये प्राण, प्रेम चोपडा, कादरखान, अजित, शक्‍ती कपूर, अमरीश पुरी, सहित एकजात सगळे व्‍हिलन समोर दिसत होते. मी डोळे गच्च मिटून घेतले आणि ती संधी साधून डॉक्टरांनी माझ्या सुळ्यांच्या जागी ड्रिलमशीन सुरू केली. मला बोअरवेल खणत असल्याचा फील येऊ लागला. मध्येच ते माझा एक्सरे काढायचे आणि तो बघून आणखी खोलवरचं खोदकाम हाती घ्यायचे. अखेर त्यांचं समाधान झालं असावं. त्यांनी त्या ड्रिलमशीनमध्ये आणखी स्क्रू टाईप काहीतरी टाकलं असावं, पुनश्च बोअरवेलमध्ये पाईप टाकण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मग तो त्यांनी फिट केला आणि ‘झालं’ असं म्हणत विजयी मुद्रेनं माझ्याकडे बघितलं. 
मला वाटलं आता, त्या खुर्चीरूपी ठिकाणाहून उठायचं, पण दोन सैनिकांनी चपळाईने मला आणखीनच जास्त जखडून ठेवलं. डॉक्टरांनी आता काळ्या रंगाचा दोरा सुईत ओवला असावा. मी प्रश्नार्थक नजरेनं बघताच, ते मला स्टिचेस/टाके घालायचे म्हणाले आणि त्यांनी टेलरिंग काम सुरूही केलं. माझ्या हिरड्या गुलाबी रंगाच्या असताना, मॅचिंग दोरा घेण्याऐवजी हा माणूस काळ्या रंगाचा दोरा घेऊन आपल्या कामात पाट्या टाकतोय असंच मला वाटलं. ‘गुलाबी रंगाचा दोरा घ्या’ असं माझं परफेक्शनिस्ट मन ओरडून मनातल्या मनात त्यांना सांगायला लागलं. पण त्यांनी माझ्याकडे जराही लक्ष न देता आपलं शिवणकाम आटोपलं. त्यानंतर अखेर या चित्रपटाचा ‘दी एन्ड’ झाला होता. हातातले ग्लोव्‍हज काढत डॉक्टर खुर्चीपासून दूर झाले.
तेवढ्यात अपूर्वची एन्ट्री झाली, मी काही त्रास दिला नाही ना असा प्रश्न त्यानं पालकत्वाच्या भूमिकेत शिरत डॉक्टरांना केला. डॉक्टरांनी देखील मिशन कामयाबच्या अविर्भावात त्याच्याकडे बघितलं.
डॉक्टर जिंकले होते आणि मी पराभूत सैनिकासारखी आसावरीच्या मागोमाग जावून गाडीत बसले. त्यानंतर आईस्क्रीम, फ्रूट शेक, पेज, लापशी अशा सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत मी आरशात बघण्याचं टाळते आहे. ‘सोड ना मौन सखे, पुरे हा बहाणा’ असं म्हणत मला बोलतं करायचा प्रयत्न मदर तेरेसा यानेकी आसावरी करते आहे आणि मी, माझ्या गेलेल्या त्या सुळ्याला, ‘क्या से क्या हो गया बेवफा, तेरे प्यार मे’ असं म्हणत कपाळावर उलटा हात लावत दु:ख व्‍यक्‍त करते आहे आणि सध्या मौनराग आळवते आहे!
Thanks Dr Bhushan and Dr Neeraja.
दीपा देशमुख पुणे adipaa@gmail.com
(धनंजय सरदेशपांडे - थॅंक्स. )

Blog comments

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories