शोभायात्रा - शफाअत खान

शोभायात्रा - शफाअत खान

शोभायात्रा - शफाअत खान खूप वर्षं झाली, कुठल्यातरी कारणानं काही कामानिमित्त औरंगाबादहून पुण्यात आले आणि बालगंधर्वला ‘शोभायात्रा’ हे नाटक बघितलं. नाटक संपल्यावर यातल्या बापट (महात्मा गांधी) या पात्राला म्हणजेच, माझ्या मोठ्या भावाचा मित्र - नंदू माधव याला भेटले. सगळ्यांचीच कामं उत्तम झाली होती. त्या वेळी शफाअत खान या माणसाची या नाटकाच्या लिखाणातून पहिल्यांदा ओळख झाली.

‘शोभायात्रा’ हे नाटक मी आजपर्यंत विसरू शकले नाही. या नाटकाचे महाराष्ट्रात जवळजवळ २०० च्या वर प्रयोग झाले. मध्यंतरी पुण्यातल्या काही मंडळींनी हे नाटक परत एकदा रंगमंचावर आणलं होतं म्हणे. तर सांगायचं असं, की झी५ वर मी काल रात्री उशिरा ‘शोभायात्रा’ हे हिंदीतून सादर झालेलं नाटक बघितलं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मवाळ-जहाल असे सगळेच एकत्र आले हेाते. महात्मा गांधींची अहिंसा, सुभाषचंद्र बोस यांची सशस्त्र क्रांतीची घोषणा, भगतसिंग, राजगुरूचं बलिदान, लोकमान्य टिळकांची रोखठोक भूमिका अशा सगळ्या वातावरणात देश ढवळून निघत होता आणि अखेर सगळ्यांच्याच अथक प्रयत्नांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळवताना अनेक अज्ञात हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ठळकपणे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पं. जवाहरलाल नेहरू, बाबू गेनू आणि झाशीची राणी यांचं योगदान महत्त्वाचं होतं. या व्यक्तिरेखा घेऊन शफाअत खान यांनी ‘शोभायात्रा’ हे नाटक एका अस्वस्थ मनोवस्थेत लिहून काढलं. या नाटकाचं अभिवाचन काही मित्रांसमोर झालं आणि हे नाटक करायचं सगळ्यांनी मनावर घेतलं. सुरुवातीला या नाटकाचं नाव ‘उजाडलं....पण सूर्य कुठे आहे?’ असं ठेवण्यात आलं होतं, पण विजय तेंडुलकरांनी जेव्हा या नाटकाचं वाचन ऐकलं तेव्हा त्यांनी ‘शोभायात्रा’ असं नाव या नाटकाला सुचवलं. यात नंदू माधव, सयाजी शिंदे, विश्वास सोहोनी, पुष्कर श्रोत्री, हृषिकेश जोशी, पल्लवी आणि विदुला मुणगेकर यांनी कामं केली. प्रदीप मुळ्येचं नेपथ्य होतं, तर सिराज खान यांची प्रकाशयोजना होती.

आज स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक कार्यक्रम केले जातात. या दिवशी सगळं वातावरण देशभक्तीपर घोषणांनी आणि देशभक्तीपंर गीतांनी भारलेलं असतं. याच वेळी इतिहासाची उजळणी होईल असेही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. म. गांधी, पं. नेहरू, टिळक अशा अनेक व्यक्तिरेखांची वेषभूषा करून शोभायात्राही काढली जाते. या नाटकात अशाच एका शोभायात्रेसाठी गावातली प्रोफेसर, वकील वगैरे अशी काही प्रतिष्ठित मंडळी एकत्रित केली जातात. ही मंडळी एका ठिकाणी गांधी, नेहरू, टिळक, झाशीची राणी बनून आपापली वेशभूषा आणि डॉयलॉग्ज यांची जय्यत तयारी करतात. कार्यक्रमाला उशीर होत राहतो आणि सगळ्यांची अस्वस्थता वाढते. या सर्व मंडळींना आपल्या वेशभुषेमुळे बाहेर जाता येत नसतं आणि त्यांना चहा किंवा इतर काही हवंनको असल्यास एका चहावाल्या १०-१२ वर्षांच्या मुलाची व्यवस्था केलेली असते. याच दरम्यान त्यांना या कार्यक्रमाचं आयोजन एका गुंड भाईनं केल्याचं समजतं. झाशीची राणी झालेली शिक्षिका आपण यात सामील होणार नाही असं जाहीर करते, मात्र बाकी सगळी मंडळी त्या गुंड भाईच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली असतात. शासकीय यंत्रणेपासून अनेक मंत्री-संत्री भाईच्या खिशात असतात. या नाटकातला बाबू गेनू झालेला तरूण अर्धवट शिक्षण सुटलेला, बेकार असा असतो. भाईनं त्याला आपल्याकडे आश्रय दिलेला असतो.

या नाटकात थोर नेत्यांच्या वेशभुषेतले ही मंडळी, मात्र प्रत्यक्षात आपल्या जीवनात कशी विसंगत वागताहेत हे दाखवलं आहे. एकीकडे स्वदेशीचा नारा लावत, चरख्यावर सूतकताई करणारे गांधीजी म्हणजेच बापट आपली मुलं कशी उच्च शिक्षण घेऊन आता अमेरिकेत स्थायिक झाली आहेत हे आनंदानं आणि अभिमानानं सांगताना दिसतात. एकीकडे झाशीच्या राणीचा आवेश आणून डॉयलॉग्ज मारणारी शिक्षिका, प्रत्यक्षात मात्र नवर्‍याचा छळ सहन करणारी, आगतिक अशी दाखवली आहे. प्रत्येकाची काही मजबुरी आहे तर काही स्वार्थ आहेत. यातला कोणीही स्वाभीमानानं जगताना दिसत नाही. सगळी मूल्यव्यवस्था पोखरलेली, ढासळलेली बघायला मिळते. काही वेळा यांच्यातला चांगुलपणाही जागृत होतो, पण अगदी थोड्याच क्षणांपुरता कारण व्यवस्थेनं त्यांना लाचार करून सोडलं आहे.

यातली भारताची भावी पिढी म्हणून चहावाला मुलगा प्रतिनिधीत्व करताना दिसतो. मात्र त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्याचं भवितव्य अंधारात आहे. यातली गंमत म्हणजे शिक्षण मिळू शकत नसलेल्या या चहावाल्या पोर्‍यापासून ते भाईपर्यंत अनेकांना भारताचा इतिहासही धडपणे ठाऊक नाही असं चित्र दिसतं. स्वातंत्र्यानंतर आपण अधिक उन्नत व्हायला हवं होतं, त्या ऐवजी आपण आपल्याच र्‍हासाची कशी व्यवस्था करून ठेवलीय हे नाटक सांगतं. भ्रष्टाचार, जातीभेद, राजकारण, चंगळवाद, हिंसेच्या जोरावर सत्ता हस्तगत करणार्‍यांची फौज, स्वार्थी आणि संवेदनशून्य समाज बघून मन अस्वस्थ होतं, बेचैन होतं आणि स्वतःचीच चीडही यायला लागते. या नाटकात क्षणोक्षणी विनोद घडतात. तर अनेक विसंगती आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. हे चित्र आपल्याला नको आहे हे कळतं, पण बदलायचं कसं हे ठाऊक नाही.

नाटकात मात्र चहावाल्या पोर्‍या हातात तिरंगा घेतो आणि 'भारतमाता की जय' म्हणतो, तेव्हा कुठेतरी आशेचं वातावरण दिसतं इतकंच. पण ज्या पिढीला धडपणे शिक्षण नाही, खायला पोष्टिकच काय, पण पोटभर अन्न नाही, आरोग्यव्यवस्था सर्वांना परवडेल अशी नाही. डोक्यावर कुठलं छत्र नाही, खूप लहानपणीच व्यसनं, गुंडगिरी, हिंसा यांच्या वातावरणात तो भारताचा एक सुजाण, सजग नागरिक कसा बनणार हा मोठा प्रश्नच आहे. स्वातंत्र्याच्या वेळी जे राष्ट्रपुरुष आमचे आदर्श होते, ते काही मूठभर विकृत लोकांमुळे आज टिंगलीचा, चेष्टेचा विषय बनले आहेत. अशा वेळी मिळवलेल्या स्वातंत्र्याचं मोल खरंच आपल्याला आहे का हा प्रश्न शफाअत खान उभा करतात.

आजही तेच प्रश्न घेऊन ‘शोभायात्रा’ नाटक समोर उभं आहे. जरूर जरूर बघायलाच हवं असं नाटक ‘शोभायात्रा’!

दीपा देशमुख, पुणे.

deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.