त्रिभंग

त्रिभंग

तीन पिढ्यातल्या तीन बंडखोर स्त्रियांची गोष्ट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘त्रिभंग’ या चित्रपटात दाखवली आहे. तन्वी आझमी, काजोल आणि मिथिला पारकर या तीन गुणी अभिनेत्री एकत्र बघायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. साहित्य अकादमीनं गौरवलेली नयनतारा (तन्वी आझमी), ओडिसी नर्तकी आणि अभिनेत्री अनुराधा (काजोल) आणि तिची मुलगी माशा (मिथिला पालकर) यांचं स्वतंत्र स्त्री म्हणून जगणं, त्यांच्या आयुष्यातले संघर्ष, त्यांचं मनस्वीपण, जगासमोर आलेल्या त्यांच्या  विवादास्पद प्रतिमा, त्यांच्यातलं अंतर, गैरसमज, प्रेम, घुसमट, सगळं काही.
या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि पटकथा रेणुका शहाणेची असून अप्रतिम फोटोग्राफी बाबा आझमी यांची आहे. चित्रपटाचा निर्माता अजय देवगण आणि इतरही काहीजण आहेत. स्त्री-वादी चित्रपटांच्या निर्मिती प्रवासातला हा एक नितांत सुंदर असा चित्रपट आहे. अभिनय, फोटोग्राफी, लेखन सबकुछ दिल को छू लेनेवाला. चित्रपटात तन्वी आझमीची भूमिका मला सगळ्यात जास्त भावली. खूप संयमित असा तिचा अभिनय. थप्पडनंतर तिचं झालेलं सुखद दर्शन. तिची पॅशन म्हणजे तिचं लिखाण...पण त्याच वेळी तिच्या सासूची तिच्याकडून तिनं सर्वसामान्य गृहिणीसारखं वागावं अशी अपेक्षा...त्या घुसमटीतून तिचं बाहेर पडणं आणि त्याची किंमतही चुकवणं....आपल्या मुलांवर प्रेम असूनही तिच्या व्‍यस्ततेमुळे त्यांच्यात पडलेलं अंतर...आणि मग तिचीच मुलगी अनु हिचा एक बंडखोर प्रवास आपल्याला दिसतो. या दोघींपेक्षा अनुराधाची मुलगी माशा ही अनुराधा आणि तिचा रशियन प्रियकर दिमित्री यांची मुलगी. माशानं आपल्या जीवनात स्थैर्य शोधताना आपल्या जोडीदाराची केलेली निवड आणि काही तडजोडी. 
तीन पिढ्यांमधल्या तीन बंडखोर स्त्रिया बघताना लै भारी चा फिल येतो. मिथिला पालकर ही मुलगी मला सुरुवातीपासूनच आवडते. काजोल काही वेळा जरा ओव्‍हरॲक्टिंग करतेय असं वाटतं, पण कदाचित रेणुका शहाणे मधल्या दिग्दर्शकाला तेच अपेक्षितही असावं. यातला सगळ्यांना आत्मकथेच्या निमित्तानं जोडणारा धागा म्हणजे डॉक्टरेट करणारा तरुण कुणाल रॉय कपूर. वैभव तत्ववादी या तरुणानंही सहज अभिनय केला आहे. यात कंवलजीत या अभिनेत्यालाही रैनाच्या भूमिकेमुळे खूप दिवसांनी बघायला मिळालं.
‘त्रिभंग’ या चित्रपटातले अनेक प्रसंग मनाला स्पर्शून जातात. न कळत्या वयातलं समाजाकडून टॉर्चर होणं, घरातल्यांकडूनच होणारं लैंगिक शोषण आणि घरातला कलह अशा अनेक गोष्टी भिडत जातात. रैनानं हॉस्पिटल मध्ये येताना नयनतारासाठी आणलेली मोगऱ्याची फुलं, नयनताराच्या आठवणी, तिची मुलं यात दिग्दर्शक म्हणून रेणुका शहाणेचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. या प्रसंगात नयनतारा वर्तमानातलीच दाखवली आहे, पण तिची मुलं म्हणजे काजोल आणि वैभव तत्ववादी ही लहान दाखवली असून ती तळ्याकाठी बसलेली असताना तिच्यासाठी ती दोघं मोगऱ्याची फुलं घेऊन येतात आणि तिची ओंजळ त्या फुलांनी भरतात. तिच्या आयुष्यातला तो सगळ्यात सुखद क्षण, तिची सुंदर आठवण म्हणून ती बघते.....काजोल आणि आत्मकथेचं शब्दांकन करणारा तरुण यांच्यातलं परकेपण जात जात समजून घेणारं नातंही खूप छान दाखवलं आहे. या चित्रपटाचा शेवटही मला खूप तरल वाटला. आत्मकथा नयनतारा च्या हातात, तिच्या एक बाजूला तिची मुलगी आणि दुसऱ्या बाजूला तिची नात आणि आत्मकथेत आत आत शिरणारे आपण ..!
‘त्रिभंग’ हा चित्रपट चित्रपट वाटत नसून तो आपल्याच आसपास घडणाऱ्या घटनांचा, प्रसंगांचा साक्षीदार वाटतो. मला तरी खूप भावला. अनेक दिवसांनी समाधान मिळालं. आजवर एकही शिवी माझ्या तोंडून निघाली नाही आणि कुठून शिव्‍या कानावर पडल्या तर मला आवडतही नाही. कदाचित म्हणूनच अनुराग कश्यपचे चित्रपट जरा भडक आणि नकारात्मक सूर असलेले वाटतात. पण या चित्रपटातल्या काजोलच्या तोंडून बाहेर पडलेल्या शिव्‍या टोचत नाहीत हे विशेष!
‘त्रिभंग’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी मी पुन्हा एकदा बघू शकते. तुम्हीही जरूर बघा. नक्कीच आवडेल.  रेणुका शहाणे साठी हॅटस ऑफ!!!!!!
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.