संगीत देवबाभळी

संगीत देवबाभळी

आसावरीनं तिच्या कुटुंबीयांसोबत ‘देवबाभळी’ या नाटकाचं माझंही तिकिट काढलं आणि मी काल बालगंधर्वला नाटक बघण्यासाठी पोहोचले. नाटकाचा विषय काय, त्यातले कलाकार कोण काहीच ठाऊक नव्हतं. हे एक संगीत नाटक आहे इतकंच माहीत होतं! प्रयोग सुरू झाला.

तुकारामाची आवली आणि विठोबाची रखुमाई या दोन स्त्रियांमधल्या संवादावर आधारित हे नाटक! आवलीला दिवस गेले असताना ती तुकारामासाठी खाण्याचं घेऊन त्याला शोधत असते. तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि ती चक्कर येऊन तिथेच कोसळते. तिच्या पायातला काटा साक्षात विठ्ठलानं काढला असं म्हटलं जातं. या कथानकाला घेऊनच या नाटकाचा विस्तार केला आहे. आवलीची पायाची जखम बरी होईपर्यंत तिची काळजी घेण्यासाठी विठ्ठल आपल्या रखुमाईला तिच्या घरी पाठवतो. रखुमाईला आवलीच्या घरातली सगळी कामं बरोबरीनं करावी लागतात. तसंच आपला नवरा बिघडण्याला कारण विठ्ठल असल्यानं पदोपदी आवली विठ्ठलाच्या नावानं शिव्याशाप देतच असते, तेही रखुमाईला ऐकावे लागतात. आवलीचं वागणं रखुमाईला सुरुवातीला वैताग आणतं....विठ्ठलानं आपल्याला कुठून या घरात पाठवलं असंही तिला वाटायला लागतं. मात्र हळूहळू दोघींमध्ये स्नेहाचे नाजूक बंध तयार होतात. दोघींना एकमेकींची व्यथा कळू लागते. प्रेम, भक्ती, त्याग, समर्पण, जगण्यातली सार्थकता, समाधान आणि स्त्री-वादी दृष्टिकोन असे अनेक पैलू दोघींच्या संवादातून उलगडतात. रखुमाईचं देवपण आणि आवलीचं माणूसपण इथं बघायला मिळतं.

या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही पौराणिक दंतकथांमध्ये हे नाटक अडकून न पडता, पुढे सरकत राहतं. तुकारामाची भक्ती, विठ्ठलाचं आपल्या भक्ताकडे असलेलं लक्ष, रखुमाईचं रुसणं आणि आवलीचं वागणं यातून भक्तीपरंपरा, अस्तित्व आणि जगणं यातले अनेक बारकावे टिपले आहेत. बाई म्हणून केलेला वेगळा विचारही इथं प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो. संगीत नाटक असल्यानं यात आवली आणि रखुमाई यांची अभंगरूपात, ओव्यांच्या रुपात गाणी आहेत. तीही लाईव्ह, रेकॉर्डेड नाही!

आवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आणि रखुमाईच्या भूमिकेत मानसी जोशी यांनी अतिशय समर्थपणे आपापल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाबरोबरच दोघींचेही आवाज अप्रतिम! शेवटाकडे जाताना आवलीतलं माणूसपण मोठंमोठं होत जाताना प्रेक्षक अनुभवतात...प्रदीप मुळ्ये यांची प्रकाशयोजना आणि प्राजक्त देशमुख यांचं दिग्दर्शन अतिशय सुरेख! भद्रकाली प्रोडक्शन ही मच्छिंद्र कांबळी यांची संस्था! आज मच्छिंद्र कांबळी नसले तरी भद्रकाली प्रोडक्शन निर्मित संगीत देवबाभळी हे नाटक विक्रमी ठरलं आहे. आजपर्यंत २५० च्या वर या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. जरूर बघावा असा अनोखा नाट्यप्रयोग म्हणून ‘संगीत देवबाभळी’कडे बघता येईल!

(काल या नाटकाच्या निमित्ताने गीता भावसार ही गोड अशी फेसबुक मैत्रीण भेटली. आसावरीमुळे एक चांगलं नाटक आणि फेसबुकमुळे चांगली मैत्रीण काल भेटली. THANKS आसावरी आणि गीता!)

दीपा देशमुख, पुणे.

deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.