फादरहूड

फादरहूड

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं मॅट (मॅथ्यू) आणि लिझ नावाचं एक जोडपं. लिझला दिवस जातात आणि तिच्या नेहमीच्या तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर बाळाची वाढ चांगली झालेली असून आजच प्रसुती करावी लागेल असं सांगतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लिझला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. आपल्याला मुलगी होणार आहे हेही दोघांना माहीत असतं. 'तुला तिचे डायपर्स बदलावे लागतील' असं लिझ मॅटला चिडवत असते आणि तोही 'हो, मी आनंदाने ते काम करेन' असं म्हणत असतो. कारण त्याला आपल्या मुलीच्या आगमनाची अपार उत्सुकता असते. मॅटचं आपल्या सासूबरोबर विशेष पटत नसतं, पण प्रसुतीच्या वेळी तिलाही व्‍हिडिओ कॉलवर नातीच्या जन्माचे सगळे क्षण टिपायचे असतात. मॅडी नावाच्या एका गोड मुलीला लिझ जन्म देते. त्या क्षणाचा साक्षीदार मॅट असतो. आपल्या बाळाला तो पहिल्यांदा हातात घेतो, त्या दोघांची प्रेमाची ती खूण असते. त्या क्षणाची आठवण म्हणून तो सुंदरसं लॉकेट लीझच्या गळ्यात घालतो. 
दोघंही नवरा-बायको खूप खुश असतात. तेवढ्यात नर्स येते आणि लिझने आता कॉटवरून उठून खुर्चीत बसावं म्हणून तिला आधारासाठी हात देते. मॅट आणि नर्स यांच्या आधाराने लीझ उठून उभी राहते आणि त्याच क्षणी तिला चक्‍कर येते. काही समजायच्या आतच ती खाली कोसळते. मॅट एकदम सैरभैर होतो, त्याला काहीच सुचत नाही. नर्स डॉक्टरांना बोलावते आणि मॅटला रूमबाहेर काढलं जातं.  
त्याच वेळी आनंदित झालेले लिझचे आई-वडील आपल्या नातीला बघायला हॉस्पिटलमध्ये फुगे आणि खूप सारं सामान घेऊन प्रवेश करतात. तिथे त्यांना बैचेन अवस्थेत उभा असलेला  मॅट दिसतो. डॉक्टर बाहेर येतात तेव्‍हा त्यांचा गंभीर चेहरा लीझ कायमची सोडून गेल्याचं सांगतो. मॅटला लिझचं असं आकस्मिक सोडून जाणं सहन होत नाही. 
बाळाला घेऊन मॅटची आई आणि सासू-सासरे घरी येतात. आपल्या मुलीच्या संगोपनाची सगळी जबाबदारी घेत मॅट त्यांना निरोप देतो. इथून मॅट आणि मॅडी या बापलेकीची गोष्ट सुरू होते. मॅडीच्या रडण्याची कारणं न कळल्यामुळे आगतिक झालेला, त्यावर वेगवेगळे उपाय शोधणारा एक अनुनभवी पण प्रयत्नशील बाप आपल्याला भेटतो. तिचे डायपर्स बदलणं, तिचं रडणं थांबवण्यासाठी गाणं गाणं, तिची खेळणी, तिचे वेळेवर द्यावे लागणारे औषधी डोस, तिचं बेबीसिटिंग अशी सगळी कसरत सांभाळत राहतो. या सगळ्यांसाठी त्याच्या बॉसकडून 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधाही मिळवतो. त्याच्या या तारांबळीत जॉर्डन आणि ऑस्कर दोघं मित्रही त्याला साथ देतात.
बालसंगोपन करण्यासाठी एका स्त्रीजवळ असलेला संयम पुरुषाकडे नसतो; एक पुरूष बाळाला व्यवस्थित सांभाळू शकत नाही अशी बहुतांश लोकांची मानसिकता असताना अशा वेळी हेच मातृत्व व्यापक अर्थाने एका पुरुषात कसं सामावलेलं  असू शकतं आणि तो ते पितृत्व कसं निभावतो याची गोष्ट म्हणजे ‘फादरहूड’ नावाचा चित्रपट.
हा चित्रपट इतक्या तरलपणे चित्रीत केला आहे, की अनेक प्रसंग बघताना आपण गहिरून जातो. त्या प्रसंगाचे केवळ साक्षीदार न राहता त्या अनुभवाचा एक भाग बनून जातो. या चित्रपटात अनेक गोष्टी घडत राहतात. रडणाऱ्या मॅडीला झोपवण्यासाठी व्‍हॅक्यूम क्लिनरच्या आवाजात झोपवणारा मॅट, कंपनीचं महत्वाचं प्रेझेंटेशन देतानाही मॅडीचा रडण्याचा आवाज ऐकू येताच तिला शांत करण्यासाठी प्रेझेंटेशन अर्धवट सोडून धावत जाणारा बाप, आपल्या स्पर्शाची ऊब देत तिला कडेवर घेऊन मिटिंग पार पाडणारा मॅट, तिचं खेळणं, तिचं हसणं, तिचं पहिलं पाऊल या सगळ्यांचा आनंद घेणारा, तिला खुश ठेवू पाहणारा मॅट आपल्याला भेटत राहतो. मॅट मॅडीला शाळेतही तो मुलगी म्हणून स्कर्ट वगैरे असा युनिफॉर्म घालून न पाठवता पँट घालून पाठवत असतो. तिलाही मुलांच्याच पेहरावाची सवय झालेली असते. अशा वेळी शाळेत तिची समजूत घालून शाळेच्या बाई तिला स्कर्ट घालण्यास भाग पाडतात आणि खेळत असलेल्या मॅडीने मुलांची अंडरपँट घातलेली आहे असं म्हणत तिला मुलं चिडवतात आणि चिडलेली मॅडी वरून खाली कोसळते आणि जखमी होते.
मॅटला मॅडी हाच आता आयुष्यातचा प्राध्यान्यक्रम असतो. तिला सोडून तो पार्टी, मद्य किंवा कुठल्याच गोष्टीत रमू शकत नाही. तसंच तो लिझलाही विसरू शकलेला नसतो. अशा वेळी जॉर्डन आणि ऑस्कर हे त्याचे मित्र त्याला यातून बाहेर काढण्यासाठी एका सुस्वभावी तरुणीचा परिचय करून देतात. मात्र आपण या तरुणीबरोबर असताना मॅडी जखमी झाली आणि आपण तिथे तिच्यासोबत नव्‍हतो याची अपराधी भावना मॅटच्या मनात तयार होते आणि तो त्या तरुणीबरोबर आपलं नातं पुढे नेण्याची असमर्थता दाखवतो.
‘फादरहूड’ या चित्रपटात मॅट आणि मॅडी या बापलेकीचं बाँडिंग ज्या पद्घतीने होताना दाखवलंय की तिथे स्त्री-पुरुष, आई-बाप, काळा-गोरा, गरीब-श्रीमंत असे कुठलेली भेद शिल्लक राहत नाहीत. आर्थिक स्तराच्या, वर्णभेदाच्या आणि लिंगभावाच्या पलीकडे शिल्लक राहतं ते फक्त प्रेम. या प्रेमातूनच आपल्या वडिलांपासून दुरावलेल्या मॅटचं मॅडीच्या आगमनानंतर त्यांच्याबरोबर, आपल्या सासूबरोबरचं त्याचं नातं बदलतं. चित्रपटाचा शेवट खूप हलकाफुलका आणि प्रेक्षकांना अपेक्षित असा दिलासा देणाराच आहे.  
 ‘फादरहूड’ हा चित्रपट पॉल विट्झने दिग्दर्शित केला आहे. ‘टू किसेस फॉर मॅडी : ए मेमॉयर ऑफ लॉस अँड लव्‍ह’ या 2011 साली प्रकाशित झालेल्या मॅथ्यू लॉगलिन याच्या आत्मचरित्रावर आधारित आहे. हे आत्मचरित्र न्यूयॉर्कच्या सर्वाधिक विक्री असलेल्या पुस्तकांच्या यादीत मोडतं. मॅटची म्हणजे बापाची भूमिका करणारा केविन हार्ट हा अभिनेता विनोदी भूमिका करण्यात माहीर असूनही इतकी तरल आणि संवेदनशील भूमिका साकारताना तो कुठेही कमी पडलेला नाही. मेलडी हर्ड या चिमुकल्या मुलीने मॅडीची भूमिका साकारली असून केविन हार्ट आणि मेलडी हर्ड दोघंही खरोखरंचे बापलेक वाटतात.
एक सुरेख, शब्दातीत अनुभव घ्यायचा असेल तर 18 जून 2021 या दिवशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘फादरहूड’ हा अमेरिकन चित्रपट जरूर बघा. 
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.