दिल, दिमाग और बत्ती

दिल, दिमाग और बत्ती

प्रसादचा (मिरासदार) फोन आला आणि दिल, दिमाग और बत्ती हा चित्रपट बघायचं ठरलं. प्रसाद, यमाजी आणि मी पुण्यातल्या मंगला टॉकीजमध्ये जाऊन पोहोचलो. मला या चित्रपटाविषयी काहीएक माहिती नव्‍हती आणि जेव्‍हा प्रसादने हा चित्रपट हृषिकेश गुप्ते याचा आहे असं सांगितलं तेव्‍हा मला जेवढं आश्चर्य वाटलं तितकाच आनंद झाला.
हृषिकेश गुप्तेंची अंधारवारी, दंशकाल, चौरंग, परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष, हाकामारी, काळजुगारी ही सगळीच पुस्तकं मला आवडलेली असून ती माझ्या संग्रही आहेत. गूढ, रहस्यमयी, उत्कंठावर्धक, रोमांचक, थरारक अशी त्यांची पुस्तकं वाचताना मजा येते. अशा वेळी या चित्रपटात हा माणूस काय दाखवणार आहे याची उत्सुकता वाढीला लागली आणि चित्रपट सुरू झाला.
मनमोहन देसाई म्हणजेच दिलीप प्रभावळकर या माणसाची गोष्ट सुरू होते. या मनमोहन देसाईची मुलगी जया यानेकी सोनाली कुलकर्णी (सिनियर सोनाली!) ही तिच्या नवऱ्याला म्हणजे अमिताभला (पुष्कर श्रोत्री) ‘आपण मॉ बनणार’ असल्याची मिठी खबर फिल्मी स्टाईलने देते आणि तोही तिला कुठे ठेवू आणि कुठे नको करत आपला आनंद दर्शवतो. त्यानंतर मात्र तो केळीच्या सालीवरून पडतो आणि मग बरंच काही घडतं. आपला जावई हरवल्याची तक्रार मनमोहन देसाईंनी पोलिसात नोंदवलेली असते, पण त्याचा काही तपास लागत नाही. तो कुठे असतो, सापडतो का, तसंच यात सतत इतकी पात्रं येतात की सगळी मिळून एक धमाल पडद्यावर बघायला मिळते.
दिल, दिमाग और बत्ती हा चित्रपट म्हणजे ७०-८० च्या दशकातलं वातावरण - या काळात मनमोहन देसाईंच्या चित्रपटांचा प्रेक्षकांवर जो पगडा होता, तो पगडा, तो प्रभाव लक्षात घेऊन लेखकाने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे आणि ती फिल्मी असली, तरी ती आपल्याला आपलीशी वाटते. मुळातच भारतीय प्रेक्षकांच्या आयुष्यात चित्रपटाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि तेच या चित्रपटाच्या निमित्ताने रेखाटलेलं आहे. हा चित्रपट आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण देत नाही, डोळ्यांतून अश्रू काढत नाही, आपलं डोकं बधिर करत नाही की कुठलं ओझंही आपल्यावर टाकत नाही. सुरूवातीपासूनच आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवत तो आपला एक मस्त प्रवास घडवून आणतो.
यात दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, रेवती लिमये (आमचा मित्र बाळ्या म्हणजेच वसंत वसंत लिमये यांची गुणी लेक) संस्कृती बालगुडे, वैभव मांगले, पुष्कराज चिरपूटकर, आनंद इंगळे, संजय कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, सखी गोखले, विनित भोंडे, मयुरेश पेम, सागर संत सारखे अनेक मुरलेले कलाकार आहेत. इतकी मोठी स्टारकास्ट असूनही कुठेही गर्दी जाणवत नाही आणि मुख्य म्हणजे या चित्रपटात प्रत्येकाने आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. सोनाली कुलकर्णीचा ट्रिपल रोल यात असून तिने तिन्ही भूमिका जबरदस्त साकारल्या आहेत. हो, ‘जबरदस्त’ हाच शब्द इथे लागू होतो. माझा आवडता असा पुष्कराज चिरपूटकर या मुलाने तर असं भन्नाट काम केलंय की चित्रपट सुरू असताना, खुर्चीवरून उडी मारून थेट पडदा गाठावा आणि त्याला जाऊन सांगावं वाटलं, अरे काय झकास काम करतो आहेस! वंदना गुप्ते आणि किशोर कदम हेही एकदम हटके भूमिकेत असून आपण त्यांच्या या लूकच्या, भूमिकेच्या आणि अभिनयाच्या प्रेमातच पडतो. आनंद इंगळे याचा अभिनय मला नेहमीच आवडतो, इथेही शेवटच्या अब्बास वाणी या गाण्यात त्याच्या डान्सने धमाल उडवून दिली. मला कर्जमधलं ‘इक हसिना थी, इक दिवाना था’ या गाण्याची आठवण झाली. दिलीप प्रभावळकरांबद्दल काय बोलायचं! मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर हे भूमिका जगताहेत असंच नेहमी वाटतं. त्यांना अभिनय करायची गरजच नाही, ते याच भूमिकेसाठी जन्मले आहेत इतकं सगळं स्वाभाविक आणि खरंखुरं वाटतं. संजय कुलकर्णी हा तर आमच्या औरंगाबादचा, त्याचंही काम खूप मस्त.
खरं तर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर यायला हवा आणि तोही सगळ्या भाषांमध्ये. खूपच बहार येईल. आणि हो या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, गाणी सबकुछ हृषिकेश गुप्ते आहेत. चांगल्या साहित्यिकांनी उत्तमोत्तम लिहावं आणि त्यावर असे चित्रपट निघावेत ही मनापासून इच्छा! आणि हो 'दिल, दिमाग और बत्ती' अशा नावावर जाऊ नका. हा चित्रपट चक्क मराठीत आहे. यात एक मात्र आवर्जून सांगावं वाटतं, ते म्हणजे विनोद घडताना जे लहान बाळाचे आणि तत्सम आवाज टाकले आहेत ते टाकायला नको होते! 
आणखी एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे 'शोले' या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर मालेगावके शोले नावाचा डमी ॲक्टर्स घेऊन एक चित्रपट निघाला होता. त्या चित्रपटानेही चांगली कमाई केली होती. रिमेक काढणं तसं धाडसाचंच काम आहे आणि असं असताना मालेगाव ची मंडळी मोठी जोखीम घेऊन असे चित्रपट काढत होती. इथेही ‘दिल, दिमाग और बत्ती’ हा चित्रपट काढणं मला वाटतं हे अत्यंत धाडसाचं काम हृषिकेश गुप्तेंनी केलं आहे. मनमोहन देसाईंनी जवळपास सगळेच चित्रपट हिट दिले. त्यांच्या चित्रपटाची कथा अतिरंजित असली, मसालेदार असली तरी प्रेक्षकांना ते चित्रपट खूप आवडत आणि ते भरभरून प्रतिसाद देत. त्या चित्रपटातल्या व्‍यक्‍तिरेखांचं, वातावरणाचं विडंबन ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि ते आव्‍हान पेलण्याचं काम हृषिकेश गुप्ते यानं केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.  प्रसारमाध्यमातल्या काहींनी जरी नाक मुरडली, तरी मला मात्र हा चित्रपट खूप आवडला आणि मी तो आणखी एकदा नक्‍की बघणार. याचं कारण चित्रपट संपल्यानंतर आम्ही तिघं बाहेर पडलो, तेव्‍हा आमच्या तिघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. आम्हाला लगेच एकमेकांचा निरोप घ्यावासा वाटत नव्‍हता. त्यामुळे आम्ही छानशा हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तिथेही ‘दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटावर चर्चा केली, त्यातले अनेक प्रसंग आठवून खूप हसलो आणि तृप्त होऊन घरी परतलो. 
पुन्हा एकदा ७० ते ८०च्या दशकात पोहोचण्यासाठी, त्यावेळच्या संगीताची अनुभूति घेण्यासाठी, त्यावेळची फॅशन बघण्यासाठी, त्यावेळची भाषा ऐकण्यासाठी, त्या वेळचं सिनेमाचं मनमोहक, सुवर्णमयी वातावरण अनुभवण्यासाठी, नॉस्टॅल्जिक होण्यासाठी, आनंदाची एक झुळूक या भर उन्हाळ्यात मनाभोवती वेढून घेण्यासाठी ‘दिल, दिमाग और बत्ती’ हा चित्रपट बघायलाच हवा.
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.