एक झपाटलेला तंत्रज्ञ स्टीव्ह जॉब्ज

एक झपाटलेला तंत्रज्ञ स्टीव्ह जॉब्ज

'अॅपल’ कंपनीचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यानं प्रचंड लोकप्रिय उत्पादनं तयार करून उद्योगविश्‍वात शून्यातून आपलं साम्राज्य निर्माण केलं. आयफोन, आयपॅड आणि टॅब्लेट कॅम्प्युटर लोकांसमोर आणून त्यानं जगभर खळबळ माजवली. मायाोसॉफ्टच्या झंझावातातही अॅपल कंपनी मजबूतपणे टिकाव धरून उभी होती. आयमॅक, आयपॉड, आयफोन आणि आयपॅड ही उपकरणं तयार करुन त्यानं तंत्रज्ञानाचं जग कित्येक दशकांनी पुढे नेऊन ठेवलं. स्टीव्ह जॉब्ज हा सर्वसामान्य लोकांसाठी सुपरहीरो तर होताच पण जगभरातल्या कोट्यवधी लोकांना त्यानं आपल्या अचाट तंत्रज्ञानानं भुरळ पाडली होती. आयुष्यातले अनेक चढउतार, मानअपमान पचवत, अनेक संकटांना सामोरं जात स्टीव्ह जॉब्जनं शून्यातून विश्‍व कसं उभं केलं असेल याची कहाणी अतिशय चित्तथराराक आहे.

स्टीव्ह जॉब्जचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ या दिवशी कॅलिफोर्निया राज्यात सॅन फ्रान्सिस्को इथे झाला. मात्र अनौरस मुलाचा शिक्का त्याच्यावर बसला. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला दत्तक दिलं गेलं. दत्तक गेलेल्या स्टीव्हचे वडील दारुडे तर होतेच पण आपल्या बायको मुलाला ते मारहाणही करत. अशा परिस्थितीचं लहानपण वाट्याला येऊनही स्टीव्हनं आपलं आयुष्य भरकटू दिलं नाही हे विशेष. असं असलं तरी स्टीव्हला दत्तक घेतलेल्या वडिलांमुळेच इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची गोडी लागली.

१९७१ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या एका मासिकात स्टीव्ह जॉब्ज आणि त्याचा मित्र स्टीव्ह वॉझ्नियॅक यांनी रॉन रोझेनबॉम यानं लिहिलेला एक लेख वाचला. हा लेख वाचल्यावर दोन्ही स्टीव्ह मंडळींनी लगेच फुकट फोन करायची यंत्रणा मिळवून ती घरोघरी विकायचं ठरवलं. पण हा उद्योग फार काळ टिकला नाही. १९७४ साली स्टीव्ह वॉझ्नियॅकबरोबर कम्प्युटरविषयीच्या परिषदांना स्टीव्ह जॉब्ज हजेरी लावायला लागला. त्यानं ‘अतारी’ नावाच्या कम्प्युटरच्या गेम्स बनवणार्‍या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून नोकरी धरली. यानंतर काही काळानं जॉब्जला अचानक खूपच वैराग्य आलं आणि आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी त्याची भटकंती सुरु झाली. भारतातले लोक अंतःप्रेरणेला कसं महत्व देतात हे पाहून तो भारावून गेला होता आणि तो चक्क हिप्पी झाला होता. पुढे तर त्यानं अंमली पदार्थांचं सेवनही करून पाहिलं आणि अमेरिकेत परतल्यावर काही काळ एका शेतातही काम करून बघितलं. नंतर जॉब्ज आणि वॉझ्नियॅक यांनी अतारी कंपनीला ‘आम्ही तुम्हाला कम्प्युटर बनवून देऊ’ अशी ऑफर दिली. पण अतारीला त्यात रस नव्हता. त्यामुळे जॉब्जनं स्वत:च कम्प्युटर बनवून विकायची कल्पना काढली.

हे सगळं सुरू असताना वॉझ्नियॅकचे स्वतंत्रपणे कम्प्युटर बनवायचे बेत जोरात सुरू होते. पण तो स्वत: आता ह्युलेट पॅकार्ड कंपनीत नोकरीला होता. त्यानं ती नोकरी सोडून आपल्या बरोबर कम्प्युटर निर्मितीच्या क्षेत्रात उतरावं म्हणून जॉब्जनं त्याला गळ घातली. स्टीव्ह आणि वॉझ्नियॅक यांनी पहिला पर्सनल कम्प्युटर बनवला आणि तिथून त्यांच्या आयुष्यानं घेतलेलं एक वेगळच वळण घेतलं. स्टीव्हनं आपली फोक्सवॅगन बस विकून १५०० डॉलर्स तर वॉझ्नियॅकनं त्याचा आवडता कॅल्क्युलेटर विकून जमवलेले २५० डॉलर्स उभे करुन ‘अॅपल’ कंपनीची उभारणी १९७६ साली केली. जेव्हा अॅपल जगातली एक बलाढ्य आणि तंत्रज्ञानात प्रचंड आघाडीवर असणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली तेव्हा ते गॅरेज जगामधलं सगळ्यात प्रसिद्ध गॅरेज म्हणून गाजलं.

अॅपल हे नाव स्टीव्हला का ठेवावंस वाटलं यामागचा त्याचा परफेक्शनिस्ट स्वभाव दिसून येतो. अॅपल हे एक परिपूर्ण फळ असून ते आरोग्याला तर चांगलं आहेच पण ते लवकर खराबही होत नाही त्यामुळे आपली कंपनीही अशीच परिपूर्णत्व लाभलेली असावी हा स्टीव्हचा उद्देश होता. सुरूवातीला त्यांनी ‘अॅपल वन’ नावाचा संगणक तयार केला. अॅपलवरचा इंटरप्रीटर वॉझ्नियॅकनंच लिहिला. असे ५० संगणक ‘बाईट शॉप’ नावाच्या कंपनीनं त्यांच्याकडून विकत घेतले. १९७७ साली जॉब्ज आणि वॉझ्नियॅक यांनी ‘अॅपल टू’ नावाची आपल्या कंप्युटरची नवी आवृत्ती तयार केली. या कंप्युटरवर ‘व्हिजिकॅल्क’ नावाचं स्प्रेडशीट सॉफ्टवेअर (आत्ताच्या एक्सेल सॉफ्टवेअरसारखं) चालू शकत असल्यामुळे या कंप्युटरची तब्बल २० लाखांच्या घरात विक्री झाली आणि अॅपलची घोडदौड सुरु झाली!

१९७९ साली स्टीव्ह जॉब्जनं ‘पॅलो अल्टो रिसर्च सेंटर (PARC)’ या सुप्रसिद्ध सेंटरला भेट दिली. तिथे त्यानं माऊस आणि यूजर इंटरफेस यांच्याविषयीच्या कल्पना सुचल्या. १९८२ साली ‘टाईम’ मासिकानं आपल्या मुखपृष्ठावर स्टीव्ह जॉब्जचं छायाचित्र छापलं आणि जॉब्ज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. त्याच्या आक्रमक आणि बॉसिंग करायच्या स्वभावावर अनेकदा सगळे टीका करायचे हा भाग वेगळा. अॅपल कंपनीचे कम्प्युटर्स प्रचंड लोकप्रिय असतानाच आयबीएमनंसुद्धा या ‘पर्सनल कम्प्युटर (पीसी)’च्या उद्योगात उतरायचं ठरवलं. आयबीएमच्या धडाक्यासमोर अॅपलला नमतं घ्यावंच लागलं. पण लवकरच जॉब्जनं ‘ग्राफिकल यूजर इंटरफेस (जीयूआय)’ तंत्रज्ञानावर आधारलेली ऑपरेटिंग सिस्टिम बनवून सगळीकडे खळबळ माजवून दिली.

त्यानंतर त्यानं आणलेला मॅकिंटॉश कम्प्युटर खूपच लोकप्रिय झाला. १९८४ सालच्या अखेरीला जेव्हा अॅपलचा धंदा मंदावला तेव्हा जॉब्जला स्वतःच्याच कंपनीतून अपमानित होऊन बाहेर पडावं लागलं. जॉब्जनं या काळात आपली उमेद सोडली नाही. त्यानं अॅपलमधले आपले काही शेअर्स विकून ‘नेक्स्ट कम्प्युटर’ नावाची कंपनी काढली. अशा रीतीनं जॉब्ज बर्‍यापैकी प्रगती करत असताना अॅपल कंपनीचे मात्र तीनतेरा वाजले होते. शेवटी १९९६ साली ४२.९० कोटी डॉलर्सना अॅपलनं जॉब्जची ‘नेक्स्ट’ ही कंपनी विकत घेऊन जॉब्जला पुन्हा त्यानं काढलेल्या ‘अॅपल’ कंपनीत परत घेतलं आणि जॉब्जला सीईओ म्हणून नेमलं. १९९८ सालच्या मार्च महिन्यात जॉब्जनं तोट्यांमध्ये चालणारे अनेक प्रॉजेक्ट्स बंद केले.

त्यानंतर त्यानं ‘आयमॅक’ नावाच्या संगणकाची घोषणा केली. त्याच्या या आणि इतर धडाडीच्या निर्णयांमुळे अॅपल संकटामधून बाहेर आली. २००१ साली अॅपलनं हजारो गाणी खिशात ठेवून ऐकायची सोय असणार्‍या आयपॉड उपकरणाची घोषणा केली, आणि अॅपलचं नाव घरोघरी पोहोचलं. वापरायला अतिशय सोपा, प्रचंड प्रमाणात गाणी साठवायची आणि बदलायची सोय आणि पिटुकला आकार यामुळे कोट्यावधी आयपॉड्स विकले गेले! त्यानंतर आलेल्या आयफोननं तर सगळीकडे धूमच माजवली! मोबाईल फोन, अतिशय सुंदर कॅमेरा, उत्कृष्ट दर्जाचं संगीत ऐकायची सोय, लिखित-श्राव्य रुपात संदेश पाठवायची सोय, इमेल, इंटरनेट, वाय-फाय अशा अनेक सोयी असलेल्या या फोननं तंत्रज्ञानाच्या पुढच्या युगाची झलक दाखवली.

२००१ साली जॉब्जनं ऍपलच्या ‘आयट्यून्स’ आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या. तसंच २००३ साली त्यानं म्युझिक स्टोअरची घोषणा केली. त्यामधे त्यानं प्रत्येकी ९९ सेंट्स अशा किंमतीला या दुकानावरुन संगीताच्या वेगवेगळ्या ट्यून्स डाऊनलोड करायची सोय केली. हाही प्रकार प्रचंड गाजला. त्यानंतर आलेल्या ‘आयपॅड‘ आणि ‘आयपॅड-२’ या कम्प्युटर्सनी तर लोकांना वेडंच करून सोडलं. ना धड मोबाईल फोन ना धड लॅपटॉप अशा मधल्याच प्रकारच्या या ‘टॅब्लेट कम्प्युटर’नं सगळीकडे प्रचंड धुमाकूळ माजवला. त्यात नेहमीसारखी कम्प्युटरमधली कामं करणं तर शक्य होतंच, पण त्याशिवाय अत्युच्च दर्जाच्या क्षमतेचे व्हीडिओ बघणं, संगीत ऐकणं, पुस्तकं तसंच वर्तमानपत्रं किंवा नियतकालिकं वाचणं आणि इंटरनेट बघणं अशा अनेक सोयी होत्या. त्यांचा विक्रमीच खप झाला.

स्टीव्ह जॉब्जनं तयार केलेला आयमॅक कम्प्युटरनं विक्रीबाबत उच्चांक गाठला होता. या कम्प्युटरचा रंग किंवा आकारच चांगला असता कामा नये तर आतला प्रत्येक पार्टही चांगला असायला हवा असा त्याचा कटाक्ष असे. एकदा तर त्याला मदरबोर्डचं डिझाईन आवडलं नाही तेव्हा ‘तो कम्प्युटरचा आतला भाग असल्यामुळे कोण बघणार? कपाटाची मागची बाजू कोण बघतो?’ असं त्याच्या इंजिनियरचं मत होतं. त्यावर जॉब्ज म्हणाला होता, ‘मी बघतो.’ म्हणूनच अॅपलची उत्पादनं घेतलेली लोकं परत परत अॅपलचीच उत्पादनं विकत घेताना दिसून येतात. मात्र या सार्‍यामागे स्टीव्हचा प्रचंड आशावाद आणि चिकाटी, कल्पकता, ध्यास अनेक प्रसंगातून दिसत राहातो.

जॉब्जनं लॉरीन पॉवेल हिच्याशी लग्न केलं. त्यांना तीन मुलं झाली. त्याला बीटल्सचं संगीत खूप आवडायचं. २००९ सालच्या जानेवारी महिन्यात जॉब्जला ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. २०११ सालच्या मार्च महिन्यात अॅपल कंपनी आपल्या ‘आयपॅड’ या ‘टॅब्लेट कंम्प्युटर’ची नवी आवृत्ती बाजारात आणणार होती. स्टीव्ह जॉब्ज वैद्यकीय कारणांमुळे सुट्टीवर गेलेला असतानाही तो अचानकपणे व्यासपीठावर स्वत: अवतरला आणि त्यानं आपण अगदी ठीकठाक असल्याच्या आवेशात ‘आयपॅड-२’ ही या आयपॅडची नवी आवृत्ती सगळ्यांसमोर सादर केली. त्यामुळे जगभरात नवनव्या तंत्रज्ञानाविषयी ‘क्रेझी’ असलेल्या लोकांच्या मनात आनंदाची लाटच उसळली.

स्टीव्ह जॉब्जनं अमाप पैसा तर मिळवलाच पण त्याचबरोबर तो कायम प्रसिद्धाच्या झोतातही राहिला. जून २०११ मध्येही त्यानं दोन भाषणं केली. पण २४ ऑगस्टला आपण इथून पुढे अॅपलचं काम बघू शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचं जॉब्जनं जाहीर केलं. तो बहुतेक सगळा वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवायचा. दुर्दम्य आशावाद, प्रचंड कल्पकता, उद्योजकता मनोधैर्य, आत्मविश्‍वास, विक्षिप्तपणा, हट्टीपणा आणि कठोर परिश्रम याचं भन्नाट मिश्रण असलेला स्टीव्ह जॉब्ज हा एक माणूस होता. ५ ऑक्टोबर २०११ या दिवशी स्टीव्ह जॉब्ज या अॅपल कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या एका महान तंत्रज्ञाचं कर्करोगानं दुःखद निधन झालं आणि अवघं जग या बातमीनं हळहळलं.

संगीत, अॅनिमेशन आणि कम्प्युटर्स अशा अनेक क्षेत्रात क्रांतिकारी उत्पादनं निर्माण करुन अनेकांचं जगणं जास्त सुखकर आणि समृद्ध करणारा स्टीव्ह जॉब्ज आज आपल्यामध्ये नसला, तरी ‘अपयशानं खचून जाऊ नका, कामावर प्रेम करा, यश खचितच मिळेल’ असा त्याचा त्यानं सार्थ करून दाखवलेला संदेश मात्र आपल्याजवळ आहे!

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.