पायाशी आल्या होत्या, धावून समुद्री लाटा.....
पायाशी आल्या होत्या, धावून समुद्री लाटा..... पायाशी आला होता, धावून फुलांचा रस्ता... वैभवच्या या कवितेला आठवून मीही गेले दोन दिवस म्हणतेय, पायाशी आल्या होत्या, धावून समुद्री लाटा.... अपूर्वसोबत दापोलीजवळच्या कर्दे नावाच्या गावात त्याच्या सामी या मित्राच्या लग्नाला जायचं अचानक ठरलं आणि लगेचच बॅगमध्ये दोन ड्रेस आणि एक साडी टाकून मी निघाले. प्रवास अतिशय वाईट रस्त्याच्या, खड्डयांचा, अंग खिळखिळं करण्याचा असा होता...........रात्री नऊ वाजता गुगल मॅप कृपेनं दापोली जवळच्या कर्दे गावात पोहोचलो. काळ्याकुट्ट अंधारात समुद्री लाटांचा जोरजोरात आवाज कानावर आदळत होता...असं वाटलं भास होतोय....दुर्लक्ष करून आमची जिथं व्यवस्था करण्यात आली त्या सन ब्लिस या रिसोर्टवर जाऊन पोहोचलो. तिथे जाताच लाकडी झोपडीसारखी सुंदर खोली बघून इतका आनंद झाला की वाटलं, माझ्या स्वप्नातलं घर ते हेच.....बांबू जसा आवडतो, तसंच लाकडी कुठल्याही वस्तू खूप अप्रतिम वाटतात. इथं तर अख्खं घरच लाकडी होतं. साधंच पण सुबक आणि देखणं.
ऋषी नावाच्या तिथल्या मॅनेजरनं अपूर्वला मासे आणि मला शाकाहारी गरमागरम जेऊ घातलं. प्रवासाच्या थकव्यामुळे लगेचच झोप लागली. पहाटे जाग आली, रिसोर्टच्या बाहेर आले आणि मी स्वप्नात तर नाही ना असं म्हणत स्वतःला दोन-तीन चिमटे काढले. दाराच्या बाहेरच स्वच्छ निळा समुद्र वेगानं झेपावत माझ्याकडे मला भेटायला जणूकाही येत होता.......माझ्या एका मित्राला समुद्र खूप म्हणजे खूपच आवडतो. आपलं घर समुद्राकाठी असावं आणि झोपेतून डोळे उघडले की समोर समुद्र दिसावा असं तो नेहमी म्हणतो. त्याचं स्वप्न आपण जगतो आहोत की काय असं वाटून त्याची आठवण आली, लगेचच त्याला फोन लावला...पण हाय, इथे मोबाईलला नेटवर्क नव्हतंच! अपूर्व, सामी आणि जूबिन असे विल्सन कॉलेजच्या हॉस्टेलचे तिघं मित्र - ते स्वतःला अमर, अकबर, अॅन्थनी म्हणवून घेतात. त्यातल्या अकबरचं म्हणजेच सामीचं गाव दापोलीजवळचं कर्दे! तिथे त्याचं लग्न होणार असल्यानं आम्ही जाऊन पोहोचलो होतो. मुस्लीम लग्न मी पहिल्यांदाच अटेंड करत होते. मजा आली.
सामीच्या सगळ्या नातेवाईक स्त्रियांचे पेहराव चिकण, लखनवी असे सुरेख कलाकुसर केलेले होते. त्यांचे दागिने देखील नाजूक, त्यांच्याचसाठी खास बनवले गेले असावेत असे! मुलीकडल्या नातेवाईक पुरुषांचा पेहराव सुटाबुटातला होता, तर सामीच्या घरातले लोक नवे कोरे झब्बे आणि नवी कोरी चौकडा लुंगी असा! सगळे मुस्लिम असूनही आपसांत मराठीच बोलत होते. मीच बावळटसारखी पुणेरी हिंदी बोलण्याचा प्रयत्न करत होते! लग्नाच्या वेळी काझी महोदय उर्दूतून बरंच काही सांगत होते. उर्दू भाषा आवडत असली तरी मला फारशी समजत नाही. मात्र त्यांच्या बोलण्यातून इतकंच समजलं, की निकाह हा शब्द अरबी असून दोन जीव एकत्र येऊन एकरूप होऊन पुढलं आयुष्य जगायचं ठरवतात त्याला निकाह म्हणायचं. निकाह म्हणजे दोन जीवच नव्हे, तर दोन घराण्यांचंही जोडलं जाणं असतं.....थोडक्यात, सगळ्या धर्मात सारखंच सांगितलं जातं. मी या लग्नात लोकांचं, त्यांच्या कामाच्या पद्धतीचं, आपसांतल्या संवादाचं निरीक्षण करत बसले, इकडे तिकडे फिरले....लग्नाचे अनेक फोटोही काढले. या लग्नात दोन्हीकडचे नातेवाईक झटत होते. कुठेही कचरा नव्हता, अन्न वाया किंवा टाकून दिलं जाताना दिसलं नाही. सामीनं आमच्यासाठी समुद्रकिनार्यावर वॉटर स्पोर्ट्सची व्यवस्था केली होती. आम्ही समुद्री सैर केली. जवळजवळ सात-आठ डॉल्फिननी आमच्यासमोर उड्या मारल्या. आम्हीही खुश झालो.
मी आणि धनू सुबोध जावडेकरांच्या ‘माणसांची भाषा’ या विज्ञानकथेचं नाट्यरुपांतर करून तिचं अनेक शहरांत, अनेक ठिकाणी अभिवाचन केलं होतं. सुबोध जावडेकरांची ही कथा डॉल्फिनवर आधारित असून खूप सुरेख आहे, जरूर वाचावी अशी! डॉल्फिनना पाहताना सुबोध जावडेकर आणि त्यांच्या माणसांची भाषा या कथेचीही खूप आठवण झाली. तिथं वेळ मिळाला तर काम करायचं म्हणत लॅपटॉप, अनेक पुस्तकं, पेनड्राईव्हमध्ये आधीचं अर्धवट लिखाण असं काय काय सोबत घेऊन गेले होते. मात्र त्यातलं मी काहीही केलं नाही. पुरुष उवाचचा प्रदीप चंपानेरकर यांचा एकटेपणाचा ऊहापोह केलेला लेख वाचला...आवडला. त्याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया देईनच. कर्दे इथल्या वास्तव्यात सकाळ-सायंकाळ समुद्राशी गप्पा सुरू झाल्या.
वातावरण बदललं, की मनातले विचारही बदलतात. पुण्यात - घरी मला शांतता मिळतेच, पण इथली शांतता काही औरच होती. हा समुद्र मला भल्या पहाटे दोन अडीच तास आणि सायंकाळी दोन-अडीच तास बोलावत होता. त्याच्या झेपावत येणार्या लाटा माझ्याशी संवाद साधत होत्या. त्याचं व्यापक, विशाल रूप मी डोळ्यात, कानात साठवून घेत होते. इथला किनारा इतका स्वच्छ होता की कुठेही प्लॅस्टिक, बाटल्या किंवा तत्सम कचरा नव्हता. समुद्राचं पाणी देखील स्वच्छ, नीळंशार..... हे दिवस स्वप्नवत गेले! परतीचा प्रवास करताना....पुणे येईपर्यंत कर्देचा समुद्र सोबतीला गप्पा मारायला होताच!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment