मी, नयन आणि तिची मार्जार गँग!
मी, नयन आणि तिची मार्जार गँग! आजची सायंकाळ बरं नसताना, त्यातही पेस्ट कंट्रोलच्या अॅलर्जीनं मी त्रस्त, ग्रस्त असतानाही 'आनंद ग्रुप'च्या कार्यक्रमाला येणार असं कबूल केल्यामुळे आधी नयन या माझ्या मैत्रिणीकडे पोहोचले. ती माझ्यापेक्षा वयानं मोठी असली तरी मला ती माझ्याएवढीच वाटते आणि मला तिला अहोजाहो मुळीच म्हणावसं वाटत नाही आणि मी म्हणतही नाही. नयनचा जॅक, डॉक्सी या कुत्रे कंपनीनं स्वागत केलं. त्यानंतर मात्र मार्जारांच्या प्रदेशात माझा प्रवेश झाला. अँटेना, तारा यांनी खूप करमणूक केली. मागच्या वेळी अँटेनाला माझं येणं अजिबात आवडलं नव्हतं.
त्यानं माझ्या गळ्यातली ओढणी चिडून खसकन ओढली होती. आणि 'बस कर बोलणं' असा सज्जड दमही दिला होता. मात्र या वेळी अँटेनानं मवाळ धोरण स्वीकारत, माझ्या समोरच्या वर्तमानपत्रावर पथारी पसरली. माझ्याकडून पुरेसे लाडही करून घेतले. तारानं मात्र आपण किती सुंदर आहोत आणि माझ्याकडेच लक्ष द्या या पद्धतीनं उलट्या सुलट्या उड्या मारल्या. समोरचं वर्तमानपत्र फाडून टाकलं. वेगवेगळ्या पोझेस माझ्या फोटोसाठी देत, 'मै सुंदर हूँ' असं मला पुन्हा पुन्हा सांगितलं.
त्यातच स्वतःची झुपकेदार शेपटी इकडून तिकडे नाचवत ‘आहे का अशी सुंदर शेपटी तुझ्याजवळ? असा तोराही मिरवला. नयनकडे जाणं म्हणजे तिचं प्राणिप्रेम अनुभवणं, त्याबद्दलचे किस्से ऐकणं आणि त्या सगळ्या प्राणिराज्यात मनसोक्त विहार करणं हे सगळं घडतं. घरी आल्यावरही कितीतरी वेळ मी त्याच विश्वात तरंगत असते.
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment