पुणे- नाशिक- पुणे प्रवास!
पुण्याहून अनर्थच्या कार्यक्रमासाठी २५ मे च्या सकाळी मनोविकासचे अरविंद पाटकर, गीता भावसार, वाहनचालक विशाल आणि मी निघालो. बघता बघता पुणं मागं पडलं आणि राजगुरूनगरची हद्द सुरू झाली. नाश्त्यासाठी पोट सूचना द्यायला लागलं आणि विशालनं आकाश मिसळ इथं गाडी थांबवली. अतिशय स्वच्छ आणि ऐसपैस असं रेस्टारंट! आम्ही बटाटेवडा, मिसळ-पाव, इडली-सांबार, पोहे असे पदार्थ मागवले आणि चव घेताच 'अहाहा', असे उद्गार तोंडून काढते झालो. अरविंद पाटकर म्हणाले, हे हॉटेल रेड्डी लोक चालवताहेत, त्यामुळे या पदार्थांची चव इतकी चांगली आहे. इतक्यात एक महाराष्ट्रीय तरुण आमच्याजवळ आला आणि सगळं काही व्यवस्थित आहे ना अशी आत्मीयतेनं चौकशी करू लागला. त्याच्याशी गप्पांचा सिलसिला सुरू झाला आणि कळलं, तोच या रेस्टारंटचा मालक होता. शिक्षण- चौथी पास! पण पुस्तकांनी त्याच्या आयुष्यात क्रांती केली. एक बंद पडलेलं रेस्टारंट त्यानं चालवायला घेतलं आणि वर्षभरात त्याचा कायापालट केला. या मराठी तरुणाचं नाव आशुतोष थिगळे! आपल्या पुतण्याच्या -आकाशच्या नावानं त्यानं हे रेस्टारंट सुरू केलंय. त्याचे परिश्रम, त्याचा विनयशील स्वभाव, सगळं काही अनुभवून आम्ही एकदमच खुश झालो. आमच्या भरपेट नाश्त्यानंतर त्यानं आग्रहानं आम्हाला त्याच्यातर्फे विड्याचं पान खाऊ घातलं. अप्रतिम - जिभेवर ठेवताच विरघळून जावं असं! ‘पुन्हा या’ चा आग्रह सोबत घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. पुण्याहून नाशिकला जाताना ‘आकाश’ला जरूर जरूर भेट द्या! अतिशय माफक किंमत आणि चविष्ट पदार्थ यासाठी आकाशमध्ये जायलाच हवं.
नाशिकला पोहोचायला दुपारचे दोन वाजून गेले होते. अच्युत गोडबोले यांची मावसबहीण सीमा ही जेवणासाठी आमची वाट बघत होती. आम्ही पोहोचताच, तिनं केलेली बटाटा-कोबी-टोमॅटो रस्सा भाजी, कुरकुरी हिरवीगार कोवळी भेंडी, ताकातली दाणे टाकून केलेली पालकची भाजी, काकडीची कोशिंबीर, कैरीचा मेथांबा, हिरव्यागार मिरचीचा लसून टाकून केलेला ठेचा, गरमागरम फुलके, वांग्याचे कुरकुरीत काप, रसगुल्ला विथ टेंडर कोकोनट आइस्क्रीमची स्वीट डिश आणि हे कमी की काय म्हणून हापूसचा गोड आंबा! इतकं अप्रतिम जेवण की पोट इतक्या लवकर का भरलं असं म्हणून स्वतःलाच कोसायला सुरूवात केली.
बघता बघता कार्यक्रमाची वेळ झाली. नाशिकच्या कार्यक्रमासाठी पुण्याहून गीता ही मैत्रीण आवर्जून माझ्याबरोबर आल्यानं प्रवास सुखकर झाला. सोबतही झाली. गीता बुद्धिमान आणि अतिशय प्रेमळ मुलगी आहे. अनर्थ च्या रंगलेल्या कार्यक्रमानंतर वैशाली आणि तिच्या दोघी गोड मुली राधा आणि आर्या यांच्यामुळे रामा हेरिटेज इथं रात्रीचं जेवण झालं. खास महाराष्ट्रीयन पद्धतीचीं पातवडी रस्सा भाजी, पिठलं, मँगो मस्तानी विथ आइस्क्रीम, सुरुवातीला पाणीपुरी, बटाटा शेवपुरी असे पदार्थही...असं सगळं भरपेट जेवून आम्ही सुस्तावलेपणानं सगळ्यांचा निरोप घेतला. गीता तिच्या भावाकडे तर मी वैशालीकडे मुक्कामाला पोहोचले.
वैशालीनं आपलं घर सुरेख सजवलेलं! अपार्टमेंट असूनही बंगल्याचा फिल देणारं घर! मी कितीतरी वर्षांनी तिच्या टेरेसवर झोपले. राधा, आर्या, वैशाली यांच्याशी मध्यरात्रीपर्यंत गप्पा रंगल्या. दोघी मुली इतक्या गुणी की काय बोलावं. राधा आणि आर्या या दोघींनी आपली रूम स्वतः रंगवलेली! आर्या तर सध्या सुट्टी असल्यानं दोन्ही वेळचा स्वयंपाक करून आईचं काम हलकं करतेय. वार्याची येणारी प्रत्येक गार झुळूक लहानपणात नेत होती. औरंगाबादच्या घरातल्या गच्चीवर आम्ही गाद्या टाकून सगळे झोपायचो, सुरईतलं गार पाणी प्यायचो, भुताखेताच्या गप्पा मारायचो ते सगळे क्षण आठवले आणि त्यातच केव्हातरी झोप लागली.
सकाळी वैशालीचा जोडीदार विनायक याच्याशी गप्पा झाल्या. एक आदर्श नवरा किंवा जोडीदार मित्र कसा असावा याचं उदाहरण म्हणजे विनायक! इतका सपोर्टिव्ह, इतका मेहनती आणि इतका समंजस की इतका चांगला मनुष्य खरंच असू शकतो का हा प्रश्न मनात उपस्थित व्हावा! मात्र लग्न झाल्यापासून ते आजपर्यंतच्या आठवणी जेव्हा जेव्हा वैशाली सांगते, तेव्हा तिच्या प्रत्येक शब्दातून विनायक बद्दलचा अभिमान व्यक्त होत असतो.
नंतर हंसराजकडे (सेरेब्रल पाल्सी विकाराशी दोन हात करून तहसीलदार बनलेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जलतरण पटू - हंसराज!) ब्रेकफास्टला वैशाली आणि मी पोहोचलो. हंसराज, प्रियंका, हंसराजची आई - उल्का पाटील यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा आणि खाणं झालं. हंसराजची आई प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गोष्ट करत असते. त्या नृत्य शिकताहेत हे कळल्यावर मी थक्क झाले. त्यांचा निरोप घेत पुस्तक पेठ गाठलं. तिथं अरविंद पाटकर पुण्याला परत निघण्यासाठी आमची प्रतीक्षा करत होते.
पुस्तकपेठेत गीतानं कॅनव्हास, सिंफनी आणि इतर बर्याच पुस्तकांची खरेदी केली. निखिलनं मला दुर्गा भागवतांच्या बुद्धाच्या जातक कथांचे खंड भेट दिले. राजू देसले भेटीला आवर्जून आले. आता निघायलाच हवं म्हणत आम्ही पुस्तकपेठेचा निरोप घेतला. निघतानाच रस्त्यात नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात असलेल्या ग्रँड पुस्तक जत्रेला भेट दिली. जनार्दन हा तिथे १८ वर्षांपासून काम करत असलेल्या एका भन्नाट माणसाला आम्ही भेटलो. ढिगानं असलेली इंग्रजी, मराठी पुस्तकं! येणारा कुठलंही पुस्तक मागो, या माणसाला ते कुठं आहे ते माहीत असायचं! गीतानं माझ्या सुपरहिरो मालिकेतली सगळी पुस्तकं खरेदी केली. मी अनुवादित केलेल्या चांदोबाचे अनेक अंक तिनं विकत घेतले. (प्रत्येक अंक दहा रूपयाला फक्त!) मीही सॉक्रेटिस सारखी काही पुस्तकं खरेदी केली.
याच प्रवासात विद्या फडके यांच्या घरकुल संस्थेला पुढल्या वेळी भेट देण्याचं ठरलं. शुभम शेंडे या उत्साही तरुणाची भेट झाली. ऋषीकेश या तरुणानं कॅनव्हास विकत घेतलं, तेव्हा खूप दिवसांपासून हे पुस्तक विकत घ्यायचं होतं, पण जमत नव्हतं असं त्यानं सांगितलं तेव्हा स्वाक्षरी करताना आणि सेल्फी काढताना त्याच्याबरोबरही एक नातं निर्माण झालं. गीता, पाटकर आणि मी गप्पा मारत पुणे-नाशिक प्रवास कधी संपला कळलंच नाही! प्रवासात माणसं अनेक प्रकारे कळतात, भेटलेली माणसं खूप काही शिकवून जातात, आनंद देऊन जातात.
पुढला नाशिक दौरा १५ जूनला - सिंफनीचा दृकश्राव्य कार्यक्रम त्या वेळी सादर करणार आहोत - अच्युत गोडबोले आणि मी! त्या वेळी पुन्हा एकदा नक्की भेटू या!
दीपा देशमुख, पुणे.
Add new comment