अनोखी संगीत मैफिल - ८ डिसेंबर २०१६
७ डिसेंबरला सुवर्णरेहाचे मेसेजेस - 'मुंबईला संगीत मैफिलीला जहॉंगीर हॉल इथं हजेरी लावणार ना? मी आणि श्रीतेज कन्फर्म असणार आहोतच. तू माझ्याकडे राहा, आपण बरोबर जाऊ, बरोबर घरी परत येऊ वगैरे.....' इतकंच काय पण साडी कुठली नेसायची इथंपासून आमची जय्यत तयारी सुरू झाली. माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे खलनायक हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि बी-१२ हे मला एकटीनं प्रवास करायचं म्हटलं की घाबरवून सोडतात. पण त्यांना न जुमानता मी सुवर्णला ‘हो’ म्हटलं आणि पुणे-बोरीवलीची शिवनेरी पकडून जाऊ असं ठरवलं.
८ डिसेंबरला बुकगंगामध्ये सकाळीच रेकॉर्डिंगसाठी पोहोचले आणि कल्याण (तावरे) चा फोन आला. आपल्याला मुंबईला कार्यक्रमाला जायचंय आणि रात्री लगेच परत येऊ. तू रेकॉंर्डिंग आटोपलं की घरी ये. हातातल्या छोट्या बॅगवजा पर्ससह शिवनेरी पकडण्याऐवजी मी रेकॉर्डिंग होताच कल्याणकडे पोहोचले. सकाळी नाश्ता झाल्यामुळे सीमानं आग्रह केला तरी पोटात भुकेला जागा नव्हती. कल्याणचा मित्र त्याची गाडी घेऊन गेटमध्ये हजर झाला. कल्याण, मी, उषा आणि आश्विनी असे लगेचच मुंबईच्या दिशेनं निघालो. कल्याणचा मित्र अभिजीत पन्हाळे हा उद्योगपती असून स्वभावानं शांत, सौम्य अशा व्यक्तिमत्वाचा! गाडी अतिशय सॉफ्ट पण अतिशय वेगात चालवत त्यानं पुण्याहून साडेबाराला निघाल्यानंतरही ३ वाजताच फोर्टमध्ये टच केलं. फोर्टमध्ये त्याचं कार्यालय आणि त्याचा ऐसपैस फ्लॅट बघून त्याचा हेवाच वाटला. आम्ही पाचच मिनिटांत तयार होऊन ताज हॉटेलमध्ये गेलो. तिथेच सुवर्णरेहा आणि श्रीतेज येणार होते. मला अच्युत गोडबोले यांनी नवीन ताज आणि ओबेरॉय दाखवलं होतं, पण जुनं ताज हॉटेल मी बघितलंच नव्हतं. कल्याणनं फिरून सगळं ताज हॉटेल दाखवलं. तिथल्या स्वागतिकेंपासून ते एम.एफ. हुसेनची पेटिंग्ज असोत, वा वैविध्यपूर्ण फुलांची सजावट असो, तिथल्या वातावरणातला सुगंध असो, वा तिथून लगबग करणार्या तरुणांचा ड्रेस कोड असो सगळंच कसं खूप शाही पण सौंदर्यपूर्ण होतं. सुवर्णरेहा आणि श्रीतेज येताच आम्ही कॉफी आणि हलकेसे स्नॅक्स मागवले आणि श्रीतेजला फोटो काढण्याचं कंत्राट देऊन टाकलं. श्रीतेज अतिशय गोड मुलगा.....इतके दिवस त्याची आई गोड आहे असं वाटायचं, पण काल मात्र या पोरानं आपल्या आईचा विक्रम मोडून स्वतःचं स्थान निश्चित केलं. आम्ही काही वेळानं मुंबईच्या सुखावणार्या हवेतली सुखद उब झेलत चालत चालत, गप्पा मारत 'जहॉंगीर' या कार्यक्रम स्थळी जाऊन पोहोचलो.
साडेसहा वाजता प्रमुख पाहुणे म्हणून मिनिस्ट्री ऑफ एस्टरनल अफेअर्स, गर्व्हमेंट ऑफ इंडियाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे हे आमचे मित्र उपस्थित असणार होते. त्यांनी आमच्यासाठी पासेसची व्यवस्था केली असल्यानं आम्ही शाही रुबाबात समोरच्या रांगेत आसनस्थ झालो आणि ज्ञानेश्वर मुळे, पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी आणि अभिनेत्री आणि लेखिका निशिगंधा वाड यांचं आगमन होताच कार्यक्रमाला सुरुवात झाली. कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी क्लासिकल संगीत यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट यांनी आयोजित केला होता. उस्ताद रफत खान नियाजी (सतार), उस्तद वासी अहमद खान (तबला), पंडित नाराण मणी (सरस्वती वीणा) यांच्या साथीला संगीत मिश्रा (सारंगी), रोहित प्रसाद (मृदंग), फराज खान (तबला) आणि वाजिद खान होते. कार्यक्रमाचं निवेदन करणारा तरूण इतका देखणा होता की मला तो खूपच आवडला. अतिशय नम्र भाषा आणि आकर्षक व्यक्तिमत्व!
कार्यक्रम सुरू होताच त्या कार्यक्रमानं मनाची जी पकड घेतली की मंत्रमुग्ध होणं काय असतं किंवा स्वगीर्य आनंद म्हणजे काय या शब्दांचा अनुभव काल प्रत्यक्ष प्रत्ययाला आला. फक्त संगीत त्याची स्वतःची भाषा बोलत होत.....पार मनाच्या आत जाऊन ती पोहोचली होती. हृदयाला गाभार्याचं स्वरूप देत तिथं एखादी मंद समईची ज्योत तेवत असावी असं शांत वाटत होतं. पुरिया धनाश्री आणि त्यानंतरचा बागेश्री तर जिवाला वेडं करून गेला. मुख्य कलाकार असो वा त्यांचे साथीदार - सगळेच इतके कुशल होते की हा कार्यक्रम संपूच नये, संपूच नये असं वाटत होतं. आसपास कोण आहे, कार्यक्रम संपत आलाय का किंवा इतर कुठल्याही प्रश्नांची व्यवधानं मनात शिरकाव करतच नव्हती. संगीत आणि आपण याशिवाय तिसर्या कुणाचाच अडसर मध्ये नव्हता. कार्यक्रम संपला आणि मन मात्र त्यातून बाहेर यायला नकार देत होतं.
प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर मुळे आणि निशिगंध वाड यांनी सगळ्या मान्यवर कलाकारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. ज्ञानेश्वर मुळे यांनी दोन मिनिटं बोलावं अशी त्यांना विनंती करण्यात आली. कार्यक्रम संपल्यावर खरं तर सगळ्यांना लोकल पकडण्याचे आणि घरी जाण्याचे वेध लागलेले असायला हवे होते. पण इथं मात्र चित्र वेगळंच होतं. लोक त्या संगीतमय दुनियेतून बाहेर यायला तयारच नव्हते. ज्ञानेश्वर मुळे बोलायला व्यासपीठावर आले. रॉयल ब्ल्यू रंगाचं जाकीट घातलेल्या प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या ज्ञानेश्वर मुळेंनी बोलायला सुरुवात केली. सरस्वतीचा वरदहस्त काय असतो, सोपी, रसाळ, ओघवती भाषा काय असते, या मनीचे त्या मनीपर्यंत हितगूज कसे पोहोचते, संगीताच्या भाषेला साहित्यिकाच्या भाषेचा स्पर्श होताच काय घडतं, हे सगळं त्यांच्या त्या छोटेखानी भाषणातून पार आत काळजापर्यंत पोहोचलं.
ते म्हणाले, 'आजचं सुरेख वातावरण मी माझ्या पुरचुंडीत बांधून माझ्या कार्यालयात माझ्या दिल्लीला घेऊन जाऊ इच्छितो. ही मैफल इथंच का संपतेय याबद्दल मला खूप खंत वाटते आहे. व्यासपीठावरच्या कलाकारांना अभिवादन करत ते म्हणाले,
संगीत है शक्ती ईश्वर की हर सूर मे बसे है राम
रागी जो सुने रागिनी रोगी को मिले आराम
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, कार्यक्रम सुरू असताना मी डोळे बंद करून बसलो होतो, तेव्हा कोणीतरी अमृताचे कुंभ रिते करतोय आणि ते आपण कानांनी प्राशन करतो आहोत असं वाटत होतं. भारतातल्या कलांची, त्या अनोख्या दिव्य शक्तीची ताकद अशा कलाकारांना बघून कळते. या कलाकारांची बोटं आपापल्या वाद्यांवरून ज्या सफाईनं फिरत होती, तेव्हा परमेश्वर, खुदाच जणू काही या निसर्गात खेळतोय असा भास होत होता. त्यांनी कलाकारांच्या प्रशंसेबरोबरच पुण्याहून आणि इतर ठिकाणांहून आलेल्या आपल्या जुन्या आणि नव्या मित्रमंडळींचाही आवर्जून उल्लेख करत त्यांचे आभार मानले. इतक्या सुंदर वातावरणाचा समारोप करताना त्यांच्यातल्या कवीलाही मोह आवरला नाही. निशिगंधा वाडला संबोधित करत त्यांनी स्वतःच्या एका कवितेतल्या काही ओळी उदृत केल्या ः
कविता वाचू नकोस
कविता वाचू नकोस अंगभर फुटतील डोळे
आणि पाहशील त्यात तुझ्याच डोळ्यांची प्रतिबिंबे
प्रतिबिंबातील प्रत्येक डोळ्यात असेल एक कविता
निशिगंधाच्या वासानं तुझ्या डोळ्यात बघत
कविता वाचू नकोस,
रात्री तर मुळीच वाचू नकोस
अवेळीच येईल पहाट आणि....
खिडकीतून राहील डोकावत....
एखाद्या स्वप्नासारखी..अधांतरी तरंगत...
बोलेल तुझ्याशी कविता...
तुला तिचा मत्सर वाटेल का ग,
तसं असेल तर कविता वाचू नकोस
ज्ञानेश्वर मुळे यांच्या वक्तृत्वानं व्यासपीठावरचे कलाकारही भारावून गेले. ते म्हणाले,
ये तो दरिया है इन्हे इनका हुनर मालूम है
जिस तरहसे चल पडेंगे रास्ता हो जायेंगा
ज्ञानेश्वर मुळे इतकं अप्रतिम बोलले की आपली आजची संगीताची मैफल विसरून बरोबर जाताना श्रोत्यांच्या मनात केवळ मुळे यांचे शब्दच रेंगाळत राहतील, असंही व्यासपीठावरचे कलाकार म्हणाले. तीन विषयांमध्ये डॉक्टरेट मिळवलेल्या निशिगंधा वाडनं मराठीतून ९ पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी ज्ञानेश्वर मुळे यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला तसंच कलाकारांना मानाचा मुजरा करत संस्कृतचे श्लोक ऐकवले. मन आणि आत्मा एकरूप झाल्यावर ते काय अनुभव देऊ शकतं याचा प्रत्यय आजच्या संगीत मैफलीत आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
कार्यक्रम संपताच ज्ञानेश्वर मुळे यांनी 'सह्याद्री (पूर्वीचं मुख्यमंत्र्याचं निवासस्थान)' या सुरेख वास्तूत रात्रीच्या जेवणाचं आर्याबागकरांना निमंत्रण दिलं होतं. तिथे गेल्यावर तिथून हलूच नये असं आम्हाला प्रत्येकाला झालं. ग्रुपमधली मुंबईची अमृता हिनं तिला येणार्या २८ भाषा आणि तिच्यातल्या असामान्य गुणांविषयी खूप सहजपणे संक्षिप्तपणे सांगितलं. श्रीतेज तर या सगळ्या वेळात आमच्या गळ्यातला ताईतच बनला होता.
सकाळी पुन्हा बुकगंगा - रेकॉर्डिंग असं सगळं समोर दिसत होतं. निघायला हवं होतं....सुग्रास जेवणाचा आनंद घेत सगळे एकमेकांशी भरभरून बोलत होते. मी प्रत्येकाकडे बघत होते. कल्याण तावरे....माणसांचा वेडा असलेला माणूस! याच्यामुळे....म्हणजे खरं तर अच्युत गोडबोले यांनी त्यांचे जे दोन मित्र मला दिले, त्यातला एक पार्ल्याचा सुधीर महाबळ! जिवाला जीव देणारा मित्र मला मिळाला आणि दुसरा हा कल्याण तावरे!
आपल्याजवळच्या माणसांचा, मित्रांचा खजिना सगळ्यांमध्ये वाटून टाकणारा.... याच्यामुळे जे मित्र-मैत्रिणी नव्यानं मिळाले त्यांनी अनेक बरेवाईट धक्वे पचवण्याचं बळ दिलं. ज्ञानेश्वर मुळे - एक बुद्धिमान पण अतिशय संवेदनशील मनाचा मित्र कल्याणमुळेच मिळाला. महेश भागवत यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी पण सामाजिक बांधिलकी सतत जपत कार्य करणारा मित्र लाभला. सुवर्णा (स्क्वेअर) यांना तर कुठल्या जन्मीच्या नात्याचं लेबल चिकटवावं हेच कळत नाही. भास्कर जेधे, अतुल गोतसुर्वे आणि संजीव कोल्हटकर यांच्यासारखे आयुष्यात संगीत निर्माण करणारे मित्र दिले. श्रीतेज, रोनित, सलोनी, विराज, विश्वतेज, शंतनू, निखील, शीतल, क्षमा, रविना, अंकिता अशी गुणी मुलं दिली, विनायक उ. सों. आणि विनायक डा. सों. सारखे प्रसन्न, हसतमुख, दिलखुलास मित्र नव्यानं दिले. बापू करंदीकर आणि किशोर गोरे कौतुकाची थाप सतत पाठीवर देत राहिले. महेश गायकवाड यांनी पर्यावरणाकडे नव्यानं डोळसपणे बघायला शिकवलं. प्रतिभाताई, रंजना, संगीता, वंदना, सुचेता, रुपाली, आसावरी, माधवी, ऊषा, संध्या, सुमित्रा, वनिता, स्वाती, रंजना, कल्पना, योंगिता, नीता, स्मिता, सीमा,शीरीन,खुशी, गायत्री, पिनल, मिनाक्षी, मधू (स्क्वेअर) नीलिमा, नेत्रा, भावना, दर्शना, साधना, जयश्री, आरती, सुजाता, सुनिता, मृणाल, रिया, मंगला, माधुरी, मधुरा, प्रियदर्शिनी, सविता, वर्षा या मैत्रिणी मिळाल्या. नीलिमासारखी जाऊ आणि चिऊ सारखी गोड गोड पुतणी मिळाली. ऋतूसारखा समंजस आणि गोड दीर मिळाला. हेरंब, मनोज, सचिन, दिनेश, श्रीनिवास यांनी वेगळं नातं दिलं. कल्याणनं किरणसारखा साहित्यिक गप्पांचा खजिना देणारा कायमस्वरूपी मित्र दिला. नेहमी मी त्याला गमतीनं म्हणते, तसं ‘चल कल्याण, तू शंभर गुन्हे केलेस तरी या गोष्टीसाठी तुला ते गुन्हे माफ बरं !’ तोही मग सात - दहा- वीस मजली गडगडाटी हास्य करतो.
मनाला भानावर आणलं. जड पावलांना मनाविरूद्ध उचललं. तेवढ्यात उषानं सह्याद्री गेस्ट हाऊस मधली खिडकी उघडताच, समोर समुद्राचं भव्य दर्शन झालं. मला नेहमीच प्रेमात पाडणार्या मुंबईचं विलोभनीय दर्शन त्या खिडकीतून होत राहिलं. रात्रीच्या वेळी चमचमणारे ते दिवे, त्यांचं पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब आणि खिडकीतून येणारी प्रत्येक झुळूक 'जाऊ नकोस ना थांब' असं सांगत राहिली.
दीपा.
Add new comment