कॉमरेड अरविंद पाटकर
कॉ. अरविंद पाटकर
वाट चाचपडण्याच्या माझ्या काळात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या इमारतीत आम्ही बसलेलो असताना तिथे हातात पुस्तकांनी भरलेल्या दोन जाडजूड मोठ्या पिशव्या घेतलेली काळीसावळी व्यक्ती आली. दत्ता बाळसराफ या मित्राने माझी त्यांच्याशी ओळख करून दिली, हे अरविंद पाटकर. पाटकर यांचं ते रूप मनात कोरलं गेलं.
पुढे पुण्यात आल्यावर ही ओळख वाढली. तुमचे आमचे सुपरहिरो या मालिकेपासून आमच्यात लेखक प्रकाशक हे नातं निर्माण झालं आणि पुढे ते वृद्धिंगतही झालं. लेखक प्रकाशक हे नातं औपचारिकतेपुढे जाऊन एक नितळ, निकोप असं माणुसकी जपणारं, स्नेहभावाचं नातं दृढ झालं होतं. मनोविकासच्या ऑफीसमधल्या केबिनमध्ये असलेले दोन टेबल, दोन रिव्हॉल्व्हिंग चेअर आणि त्यावर बसलेले पाटकर पितापुत्र - अरविंद पाटकर आणि आशीश पाटकर हे चित्र मी कधीच विसरू शकणार नाही. आमच्या चर्चा सुरू असताना, दोघांना एकत्रित बोलताना, हास्यविनोद करताना बघून मला त्यांच्यातल्या बापलेकाच्या नात्याचं खूप अप्रुप वाटायचं.
‘प्रथम’ या संस्थेबरोबर काम करत असताना तरूण प्रकाशक म्हणून एकदा मी आशीशची मुलाखत घेतली होती, तेव्हा लहानपणापासून आपल्या वडलांबरोबर फिरल्यामुळे आपल्याला पुस्तकांची गोडी कशी लागली, लहानपणी पुस्तकं हीच आपली खेळणी असायची आणि थोरामोठ्यांचा सहवास कसा लाभला हे आशीशने सांगितलं होतं. इतकंच नाही तर मुलांना वाढवताना आपल्या वडलांनी कधीही उपदेशकाची भूमिका घेतली नाही, त्यांच्या स्वातंत्र्याआड ते कधी आले नाहीत. आजारी असताना, हातात सलाईनची बाटली घेऊन लेखकाला भेटण्यासाठी तीन तीन जिने त्या अवस्थेत चढणारा हा माणूस होता. पत्नी आजारी असताना स्वत: स्वयंपाक करणारा बाप, अशी आपल्या वडलांची अनेक रूपं आशीशने बघितली होती, चळवळीतला त्यांच्यातला अँग्री यंग मॅन असं सगळं काही तो माझ्यासमोर साकारत होता.
मला आठवतं, माझ्या पुस्तकांची कम्प्युटराईज्ड फाईल त्यांच्याकडे पोहोचताच, ते आधी प्रिंटआउट काढून घेत आणि लगेचच मी लिहिलेलं मनोगत/प्रास्ताविक वाचून फोन करत. बोलताना कधीही नकारात्मक सूर ते लावत नसत. सगळ्यात आधी त्यांना भावलेले मुद्दे ते सांगत असत. प्रिंटिंगच्या सर्व टप्प्यांबाबत त्यांचा आशीशवर विशेष विश्वास असल्याने त्याबाबतीत ते दखल घेत नसत. आशीशने निश्चित केलेलं पुस्तकाचं लेआउट, मुखपृष्ठ, सर्व बाबतीत त्यांची संमती असे. पुस्तक पुर्णत्वाला जात असताना अनेकदा आशीश आणि माझे तांत्रिक बाबतीतल्या गोष्टींवर मतभेद होत, पण अरविंद पाटकर कधीच मध्ये हस्तक्षेप करत नसत. आमच्या दोघांकडूनच ते सुटावेत असं त्यांचं मत असायचं.
नव्या पुस्तकांचं लेखन, विषय, प्रकाशन अशा कुठल्याही बाबतीत आमची मिटिंग असली, की दोघंही पितापुत्र ठरलेल्या ठिकाणी येत आणि मग खाण्यावर विशेष प्रेम असलेले पाटकर आलेलं बिल कधी देऊन टाकत समोरच्याला कळतही नसे. समोरच्याला खाऊ घालणं ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप आनंददायी होती. तेच गुण आशीशनेही उचलले आहेत हे सांगायला नकोच.
अरविंद पाटकर हे जगन्मित्र होते. होते म्हणताना मनाला अतिशय वेदना होतायेत. दोन दिवसांपूर्वी भेटलेला माणूस आज दिसत नाही ही गोष्ट खूप त्रासदायक आहे. त्यांचा लोकसंग्रह इतका होता, की त्याची मोजदाद करणं कठीण आहे.
आज मनोविकास प्रकाशन स्थिरावलं असलं, आर्थिक बाजू उंचावली असली, तरी त्यांच्या राहणीत, वागणुकीत कधीच फरक पडला नाही. त्यांची सामाजिक बांधिलकी, त्यांच्यातला सच्चा कार्यकर्ता सतत जागा असे. मला ते म्हणत, चांगली सामाजिक संस्था, चांगलं काम करणारी माणसं यांच्याबद्दल मला सांगा. मी त्याबद्दल सांगताच ते स्वत: त्या त्या ठिकाणी जात, त्या गोष्टी बघत, अनुभव घेत आणि मग त्यांना आर्थिक, शैक्षणिक अशी सढळ हाताने मदत करत. ती मदत केली म्हणून मग आपला फोटो, आपलं नाव त्यांना काहीही नको असे. त्यांनी कधीही तोंडातून त्याबद्दल अवाक्षर काढल्याचं मला आठवत नाही. जणूकाही ते करणं ते आपलं कर्तव्य समजत.
अरविंद पाटकर यांना भटकंती करण्याची खूप आवड होती. अविनाश दुधे, अरूणा सबाणे आणि विदर्भातली अनेक मित्रमंडळी यांच्याबरोबर त्यांनी लेहलडाखपासून मेळघाटपर्यंत प्रवास केला होता. प्रवासातून आल्यावर प्रवासातली ठिकाणं, घडलेल्या गमतीजमती, खाल्लेले पदार्थ, यावर ते भरभरून बोलत असत. गेली तीन-चार वर्षं मीही डॉ. महेश गायकवाड या पर्यावरणतज्ज्ञ मित्राने आयोजित केलेल्या सहलींबरोबर भारतभ्रमण करते आहे. ते प्रवासवर्णन वाचल्यानंतर/ऐकल्यानंतर त्यांनी महेश गायकवाड यांच्याबरोबर माझी ओळख करून द्या आणि यापुढे मीही तुमच्या ग्रुपसोबत प्रवासाला येणार अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
लेखकाने फक्त लिहून आपली जबाबदारी संपली असं न समजता, आपल्या पुस्तकांवर बोललं पाहिजे असं त्यांना वाटत असे. त्यातूनच ते आपल्या ओळखीतून पुस्तकांसंबंधी कार्यक्रम आयोजित करत. आमच्या जीनियस या विज्ञानविषयक मालिकेच्या वेळी तर महाराष्ट्रभर आम्ही फिरलो. शाळा, कॉलेजेस, संस्था इथे जाऊन अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पुस्तकविक्रीविषयी ते खूप सकारात्मक बोलत. वाचणारे वाचत राहतात आणि न वाचणारे ‘आता पुस्तकं कोणी वाचत नाहीत’ अशी बोंब मारत फिरतात असं ते म्हणत असत.
आपल्याला माहीत असलेली अनोखी ठिकाणं, पदार्थ आणि जगावेगळी माणसं यांची ओळख आपल्या वर्तुळातल्या लोकांना करून देण्यासाठी ते आतुर असत. रत्नागिरीचे अभिजीत हेगशेट्ये असोत, की देवरूखच्या मामी, रविंद्र तांबोळी असोत, की सेवादलाचे देवदत्त परूळेकर असोत, फुलपाखंराचा अभ्यासक तरूण असो, की लातूरचे युवराज पाटील किंवा दत्तप्रसाद दाभोळकर असोत, या सगळ्यांच्या भेटी त्यांनी खूप अगत्याने करून दिल्या होत्या. कुठल्याही गावी माझं भाषण असलं, आणि जाताना मी त्यांना फोनवर त्याबद्दल सांगितलं, की ते वाटेत लागणाऱ्या गावातल्या त्यांच्या ओळखीच्या लोकांना कळवत आणि आमची भेट कशी होईल, तिथेही एखादा कार्यक्रम कसा करता येईल याबद्दलची काळजी घेत. तुमची आणि सदानंद कदम यांची भेट झाली पाहिजे, त्यांना अमूक अमूक विषयातली किती माहिती आहे याबद्दल बोलताना ते थकत नसत. इंदूमती जोंधळे यांचं आणि त्यांचं बहीणभावाचं नातं शब्दांपलीकडलं होतं. ते सतत इंदुताईंची चेष्टामस्करी करत आणि महावीरभाईंची बाजू घेत.
अरविंद पाटकर यांनी कधीही कोणाविषयी चकार नकारात्मक शब्द काढल्याचं मी बघितलं नाही. त्यांना एखाद्याचा कटू अनुभव आला, तर ते त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून वजा करत, पण त्याच्याविषयी कधीही चांगलीवाईट चर्चा करत नसत. कशाला त्यात वेळ घालवायचा, आपण आपली ऊर्जा कामात घालवू असं ते म्हणायचे.
पुस्तक प्रकाशनाच्या बाबतीत पुरोगामी विचारांची, अंधश्रद्धेला खतपाणी न घालणारी, विज्ञान-कला-संगीत-तंत्रज्ञान, इतिहास, शिक्षण, आरोग्य अशा विषयांवरची 1500 च्या वर पुस्तकं त्यांनी काढली. धार्मिक तेढ वाढणारे विषय त्यांना वर्ज्य असत. आपल्या आयुष्यात कुठल्याही कर्मकांडांना त्यांनी स्थान दिलं नाही. आपली मूल्यं, आपले विचार यांच्याबाबत ते ठाम होते. त्यात कुठलीही तडजोड ते करत नसत.
पुस्तकाशिवाय त्यांना तरुणाईसोबत राहून खूप उपक्रम राबवायचे होते. आम्ही काही समविचारी लोक एकत्र येऊन चर्चाही करत असू. आमच्या विचारांना मूर्त स्वरूप देत आम्ही जानेवारी 2026 पासून मनोविकास आणि सृजनसंवाद या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून संवाद कट्टा हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबवायचा ठरवलं आणि 24 जानेवारीला पहिला संवाद कट्टा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर विवेक सांवत यांना बोलावून यशस्वीरित्या पार पाडला होता. या दिवशी अरविंद पाटकर येऊ शकले नव्हते. मात्र त्यांचे कान आणि डोळे कार्यक्रमाकडे लागले होते. कार्यक्रम संपल्यावर विवेक सावंत यांना आम्ही निरोप दिला आणि पहिला फोन अरविंद पाटकर यांना केला. कार्यक्रम कसा झाला हे सांगताच ते समाधानी झाले. त्यांना झालेली कावीळ, त्यांचा थकवा आणि तरीही आराम न करण्याचा त्यांचा हट्टी स्वभाव, याचाच परिणाम म्हणजे अरविंद पाटकर आज आपल्यात नाहीत.
आपल्या दोन्ही मुलांचा अभिमान बाळगणारे, दोन्ही सुनांना मुलीचं प्रेम देणारे, आपल्या नातींचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करणारे, शेकडो तरुणांना गुपचूप मदत करणारे, प्रोत्साहन देणारे, अनेक उत्तमोत्तम लेखक घडवणारे, त्यांना संधी देऊन त्यांच्याकडून लिहून घेणारे, भेटलेल्या प्रत्येकाचा दृष्टिकोन विज्ञानवादी आणि विवेकवादी कसा होईल याची दक्षता घेणारे, मैत्रीचं मोल जाणणारे आणि ती जपणारे, रेल्वेस्टेशन असो वा मेट्रोस्टेशन, शासकीय कार्यालयं असो वा हॉस्पिटल्स, प्रत्येक ठिकाणी पुस्तकं असावीत याबद्दल आग्रही असणारे अरविंद पाटकर, अजून पाचपंचवीस वर्षं तुम्ही या महाराष्ट्राला हवे होतात. का घाई केलीत? तुमच्या चळवळीतल्या कामाबद्दलचं लिखाण असो, वा इतर लेखनप्रकल्प, अनेक गोष्टी तुम्ही अर्धवट सोडून गेलात, त्याचा राग येतोय. तुमच्यासारख्या माणसाने प्रकृतीच्या बाबतीत इतकी हेळसांड करायला नको होती, स्वत:च्या हट्टी स्वभावाला थोडी मुरड घालायला हवी होती. असो. कुठलाही त्रास न होता, शेवटपर्यंत काम करत करत तुम्ही गेलात अशी समजूत आता मनाची घातली आहे.
अखेरचा लाल सलाम स्वीकारण्याआधी तुम्ही ‘अरविंद पाटकर’ या तुमच्या दारावरच्या चमकणाऱ्या नेमप्लेट लावलेल्या घरात आलात, घरी जमलेली अलोट गर्दी, कॉ. लता भिसे यांनी दिलेली सलामी, तुमच्या अंगावर पांघरलेला लालध्वज, धाय मोकलून रडणारे लोक, डोळ्यांत पोरकेपण घेऊन उभी असलेली तुमची मुलं, आधार हरवलेल्या तुमच्या शोकाकुल सुना, आजोबा आता दिसणार नाहीत म्हणून कासावीस झालेल्या तुमच्या नाती, आपल्या लिखाणाला आता कोण प्रोत्साहन देणार हा प्रश्न घेऊन उभे असलेले अनेक तरूण लेखक, डोळ्यातल्या आसवांना तसंच ओघळू देणारे तुमचे शेकडो स्नेही यांच्याकडे विद्युतदाहिनीकडे जाताना तुम्ही एकदा तरी वळून बघितलंत का कॉ. अरविंद पाटकर?
दीपा देशमुख
Add new comment