आता थांबायचं नाय
आता थांबायचं नाय
एके दिवशी अपूर्व आणि सायली यांची सकाळी सकाळी लगबग दिसली. तुम्ही कुठे जाताय असं विचारल्यावर कळलं, आमच्या सोसायटीत स्विमिंग शिकण्याचे वर्ग सुरू झालेत आणि त्यासाठी दोघं चाललेत. हे कधी ठरलं असं विचारताच, सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तसा मेसेज आला होता आणि आम्ही नाव नोंदवलं असं दोघांनी सांगितलं. मी लहान मुलीसारखी फुरंगटून बसले, ‘मला का नाही सांगितलं आणि माझं नाव का नाही नोंदवलं?’ असं मी विचारताच अपूर्वने, ‘तुला पाण्याची किती भीती वाटते आणि आजवर तू मला देखील कधी पाण्यात उतरू दिलं नाहीस, मग तुझं नाव कसं नोंदवणार?’ असं म्हटलं. त्याचं म्हणणं बरोबरच होतं. माझ्याकडे यावर उत्तर नव्हतं. पण मला स्विमिंग शिकायचं होतं. पाण्याबद्दल वाटणारी प्रचंड भीती घालवायची होती.
उदय हा आमच्या सोसायटीत राहत असून तो एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण त्याचबरोबर तो राष्ट्रीय स्तरावरचा विजेता जलतरणपटू (स्विमिंग चॅम्पियन) आहे. मागच्या वर्षांपासून दर उन्हाळ्यात तो आमच्या सोसायटीमध्ये दहा व्यक्तींना मोफत स्विमिंग शिकवतो. अपूर्वच्या मागे लागून मी स्विमिंगसाठी उदयकडे नाव नोंदवलं. 10 लोकांची नोंदणी आधीच झालेली असून देखील त्याने उदार मनाने मला यायला परवानगी दिली. मग अत्यंत उत्साहाने शक्ती स्पोर्ट्समध्ये जाऊन पोहण्यासाठीचा पोशाख, टोपी आणि गॉगल विकत आणला. जय्यत तयारीनिशी मी दुसऱ्या दिवशी सकाळी स्विमिंग पूलवर पोहोचले.
उदयने हसून स्वागत केलं. 15 मिनिटांचा वॉर्म-अप करायला लावला. त्यात भराभर चालणं, शारीरिक हालचाली, व्यायाम असं समाविष्ट होतं. वॉर्मअप का करायचं याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर मी चेजिंग रूममध्ये जाऊन शॉवर घेतला. थंडगार पाण्याने शरीर शहारलं. मग हळूच स्विमिंगपूलच्या आत उतरले. माझ्याच वयाचे काहीजण होते. काही लहान होते, तसंच अपूर्व आणि सायलीही अर्थातच होते. उदयने सर्वप्रथम बबलिंग कसं करायचं हे सांगितलं. तोंडाने श्वास घ्यायचा आणि पाण्यात जाऊन मग नाकाने श्वास सोडत पाण्याबाहेर यायचं. हे सगळं करताना मी तोंडाने श्वास घेत मारूतीसारखं तोंड फुगवून ठेवायची आणि मग नाकाने श्वास सोडत बाहेर यायची. नंतर ही चूक सुधारली. कधी पाण्याखाली न गेल्यामुळे मजा वाटत होती. त्यानंतर किकिंग कसं करायचं हे त्याने शिकवलं. गुडघ्यातून पाय न वाकवता पाण्यात पाय खालीवर मारायचे होते. किकिंग करताना थकून गेल्यासारखं व्हायला लागलं. कारण सवयच नव्हती. त्यानंतर किकिंग करत तोंड वर करून तोंडाने श्वास कसा घ्यायचा हेही शिकले.
नंतरची स्टेप होती, थर्माकोलचा बोर्ड घेऊन संपूर्ण शरीर पाण्यात तरंगत फ्लोट ठेवायचं. सुरुवातीला खूप भिती वाटत होती, पण बुडत्याला काडीचा आधार प्रमाणे हा बोर्डच आपला तारणहार आहे हे लक्षात आलं होतं. एवढं अवजड शरीर पण पाण्यात तरंगत आहे हे बघून बरं वाटत होतं. यानंतर बोर्ड घेऊनच किक करणं, हात मारणं असंही सुरू झालं. प्रत्येक हात पाण्यातून खाली जाताना तो मांडीपर्यंत गेला पाहिजे आणि वर येताना कानाच्या वर आला पाहिजे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली.
एके दिवशी उदयने हातातला बोर्ड काढून घेतला आणि सांगितलं, ‘आता किक करत, श्वास घेत-सोडत, हात पाण्यात व्यवस्थित मारत या, मी समोर उभा आहे.’ मला प्रचंड भिती वाटली. आपण आता बोर्डचा आधार गेल्यामुळे पाण्यात गटांगळ्या खात बुडणार, नाकातोंडात पाणी जाणार या भीतीने जीव कासावीस झाला. पण उदय हसत समोर उभा होता. मी ‘उदयभरोसे’ शरीराला पाण्याच्या हवाली केलं. पण मनातल्या भीतीने शरीरावरही राज्य केलं होतं. मला जसं वाटलं तसंच झालं, मी गटांगळ्या खाऊ लागले, उदयने मला हात दिला, माझ्या पाठीवरून हात फिरवला. ‘होतं सुरूवातीला असं’, असं म्हणत धीरही दिला. आपल्याला इतकी साधी गोष्ट जमत नाही या विचाराने खूप लाज वाटली.
आता रोजच सुरुवातीचा सराव झाला, की उदय दोन चार वेळा बोर्ड सोडून मला पाण्यात पोहायला सांगायचा. तो समोर उभा असल्याने तो आपल्याला वाचवणार ही खात्री असल्याने मी तो सांगेल तसं करायची. पण कधी थकायची, कधी घाबरून भराभर हात मारायची, कधी किक मारायला विसरून जायची आणि मग पाण्यात पाय खाली खाली जायचे, तर कधी तोंड वर काढून तोंडाने श्वास घेताना तोंडात हवेऐवजी पाणीच जायचं. असं सगळं होत असतानाच माझ्या लक्षात आलं की मी बोर्ड हातात असल्यावर पाण्याच्या मधोमध कुठेही उभी राहू शकते, पण बोर्ड नसेल तर मला कोणाचा तरी आधार लागतो.
आता मी दोन हात मारेपर्यंत पोहू शकत होते. पण पाण्यात कुठल्याही आधाराशिवाय उभं राहता येत नव्हतं. तसंच प्रत्येक वेळी उजवा हात मागे गेल्यावर तोंड वर काढून श्वास घेताना मी शरीर कमरेपासून पाण्याच्या वर उचलत होते. इच्छा ही की चुकूनही पाणी तोंडात जाऊ नये. जेवढं डोकं आणि शरीर मी पाण्याबाहेर काढत होते, तेवढे माझे पाय पाण्यातून जमिनीकडे खाली खाली जात होते. आणि अखेर मी थकून जात असे. या सगळ्या प्रयत्नांत असताना उदयची बायको सुप्रिया आणि नव्याने झालेली मैत्रीण मोहिनीसुवर्णा यांनी, ‘दोन हात मारल्यावर तू पाण्याबाहेर तोंड काढून श्वास घेत जा’ असा सल्ला दिला. मग काय पहिलं सगळं विसरून मी तशी प्रॅक्टिस करायला लागले. पण तरीही पहिलं विसरणं इतकं सोपं नाही असं लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी उदयने प्रत्येक वेळी उजवा हात मागे गेल्यावरच तोंड वर काढायचं असं सांगितलं. उदय हा पर्फेक्शनिस्ट असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे शॉर्टकट्स आवडत नाहीत. आणि अर्थातच मलाही अचूकपणेच शिकायचं असल्याने मी आदल्यादिवशीचं विसरून तो म्हणतो तसं करायला सुरुवात केली.
एके दिवशी उदयने आपण युरोपला जात आहोत असं सांगितलं. आपल्याला अजून पूर्णपणे स्विमिंग येत नाही आणि हा तर चालला असं वाटून थोडी निराश झाले. पण उदयने सांगितलं, मी परत आल्यावर पुन्हा आपण भेटूच, तुम्हाला स्विमिंग येतंय, प्रॅक्टिस करत राहा.
उदय युरोपला गेल्यावरही मी नेटाने रोज स्विमिंग पूलवर जात राहिले. कधी शेजारच्या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याने खूप धूळ पूलाच्या पाण्यात शिरायची, तर कधी फिल्टर बंद पडायचे. कधी पूलाच्या देखरेखीसाठी नेमलेला मुलगाच अनुपस्थित असायचा. अशा अडथळ्यांना सामोरं जात माझं स्विमिंग सुरूच होतं. अशा वेळी मोहिनीसुवर्णा हिने मला पाण्यात एकटीने उभं राहण्याची हिम्मत दिली. ती मला पोटाजवळ पाय घेऊन डोकं कसं पाण्याच्या वर काढायचं हे दाखवत होती, पण काही केल्या मला जमत नव्हतं. तिला आपण किती त्रास देतोय, साधीशी गोष्ट जमत नाही या विचारानं खूप कसंतरी व्हायचं. पण ती खूपच हसतमुख आणि मदतीला नेहमीच तत्पर असल्यामुळे तिने माझा पिच्छा सोडला नाही. सुवर्णामोहिनी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सीए म्हणून काम करते. तिच्यामुळे दोन दिवसांत माझी मी पाण्यात कुठेही उभी राह्यला शिकले. या गोष्टीने मला खूपच फायदा झाला. माझी पाण्याची, त्यात बुडण्याची, नाकातोंडात पाणी जाण्याची भीती कमी झाली.
आता उदयही नाही, सुप्रियाही नाही आणि मोहिनीसुवर्णाही नाही अशा परिस्थितीत माझा सराव सुरू होता. माझ्याकडून होणाऱ्या चुकांचा मी शांतपणे विचार करायला सुरुवात केली. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या मनात सतत विचार सुरू असतात. त्यामुळे मी पोहोताना एकाग्र चित्त ठेवू शकत नाही. तसंच माझी किक कमी पडते, त्यात जोर नाही. पाण्यात फ्लोट झाल्यावर हात मारताना मी खूप घाबरते आणि भराभर हात मारायला लागते, त्यामुळे मनाचा आणि शरीराचा तोल बिघडतो आणि मी थकूनही जाते. मग आहे तिथेच पाण्यात उभं राहायचा प्रयत्न करते आणि उभी राहतानाही जिवाच्या आकांताने पाण्यात दोन्ही हात मारत कशीबशी उभी राहते. यात स्विमिंग पूलाचं पूर्ण अंतर कापणं दूरच राहतं. पूलाच्या मध्यावर असलेल्या झाडापर्यंतच मी कशीबशी पोहोचू शकत होते.
एक एक चूक दुरूस्त करायची मी ठरवली. आधी मन शांत करणं, सगळ्या विचारांना पिटाळून लावायचं. फक्त आणि फक्त स्विमिंग पूल, पाणी आणि मी. त्यानंतर मी उदयने सांगितल्यानुसार पाण्यात उतरल्यानंतर सुरूवातीचा अर्धातास फक्त किकिंगची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर शांतपणे पूलाचं पूर्ण अंतर कापायचा निर्णय घेतला. आधी झाडापर्यंत, मग साठ टक्के, सत्तर टक्के, ऐंशी टक्के अंतर पार करायला मी शिकले. यात डोकं जास्त वर काढणे, किकिंगचा जोर कमी पडणे, पाय पाण्याखाली जाणे हे दोष दुरूस्त होत गेले. आता आठवड्याभरात आपण शंभर टक्के अंतर पार करू अशी खात्री वाटायला लागली.
स्विमिंग शिकत असताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. श्वासावरचं नियंत्रण किती महत्वाचं आहे हे समजलं. पाण्याशी मैत्री करताना, इतर सगळे विषय बाजूला ठेवून फक्त त्याच्याचबरोबर राहिलं तर ही कला शिकता येते हेही कळलं. थोडक्यात, तुम्ही पाण्याबरोबर एकरूप व्हावं लागतं. ज्या दिवशी मनात इतर विचार येतात, त्या दिवशी खूप चुका व्हायला लागतात. जितके तुम्ही रिलॅक्स व्हाल, तितकी त्यातली मौज कळायला लागते. आधी भेडसावणाऱ्या, भीती दाखवणाऱ्या गोष्टी हळूहळू त्या गोष्टीतला आनंद दाखवायला लागतात. मनाबरोबरच शरीरामध्ये प्रमाणबद्घता, लवचिकता यायला लागते. मला ठाऊक आहे, काहीच दिवसांत मी एखाद्या पाण्यातल्या माशाप्रमाणे आनंद घेत, सहजपणे पोहू शकेन.
आणि मग आजचा दिवस उजाडला, 18 मे 2025. मी नेहमीप्रमाणे सकाळी एकटीच स्विमिंग पूलावर पोहोचले. आनंदाची गोष्ट म्हणजे कालच सायंकाळी उदय युरोपहून आल्यामुळे माझी आणि त्याची ओझरती भेट झाली होती. तो दोन दिवसानंतर स्विमिंगला येणार असं त्याने सांगितलं. मी आता ऐंशी-नव्वद टक्के स्विमिंग करताना अंतर पार करतेय असं सांगताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. आता दोनएक दिवसांत तुम्हाला पूर्ण जमेल असं त्याने म्हटलं होतं. उदयसारखा प्रशिक्षक मिळणं ही खूप मोठी गोष्ट मला आयुष्यात मिळाली आहे. संयम कसा असावा हे त्याच्याकडून शिकावं. एका चांगल्या शिक्षकाचे सगळे गुण त्याच्यात एकवटलेले आहेत. नेहमी हसतमुख, प्रसन्न. ‘जमणार नाही, तुम्हाला येणार नाही’ असे शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीत. येतंय, छान जमतंय, तुम्ही आता स्पर्धेत भाग घेऊन जिंकू शकता असं बोलून नेहमी कौतुक करणं, प्रोत्साहित करणं, अतिशय अचूक मार्गदर्शन, समोरच्याबद्दलची आपुलकी आणि आत्मीयता ही त्याची काही वैशिष्ट्यं. कधीही चेहऱ्यावर त्याने आठी आणलेली नाही, सतत शांतपणे समजावूनच सांगितलं. खरं तर हे सगळं घडलंय, घडतंय ते उदय आणि उदय मुळेच. आज - आज उदयमुळे पाण्याची भीती मनातून जवळपास गेली आहे. पाण्याबरोबर मैत्री झाली आहे. आता सकाळ कधी होते आणि आपण पाण्यात कधी जातो असं वाटतं. सोमवारची सुट्टी देखील असह्य होते. उदयसारखा प्रशिक्षक मिळाल्यामुळे ही किमया करता आली. त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तो परत आलाय या विचारामुळे जास्तच खुश झाले.
रोजच सगळे येण्याआधी मी पूलावर पोहोचत असल्यामुळे निवांत प्रॅक्टिस करू शकत होते. आजही मी पाण्यात एकटीच होते. नेहमीप्रमाणे अर्धातास किकिंग केलं. मन स्थिर, शांत ठेवता येत असल्याने खूप छान वाटत होतं. आता जेवढं काही अंतर पार करता येईल तितकं शांत चित्ताने करायचं असं ठरवून मी शरीराला पाण्यात सोडलं. किकिंग सुरू झालं, हात सवयीप्रमाणे मागेपुढे, मांडीला टेकत, कानावरून पुढे येत होते. उजवा हात मागे गेल्यावर मान उजवीकडे वळून तोंडाने श्वास घेत होते. पाण्यात पोहत पुढे पुढे जात होते आणि पोहता पोहता लक्षात आलं, चक्क मी दुसऱ्या टोकाच्या कठड्याला हात लावलेला होता. मी स्विमिंग पूलाचं संपूर्ण अंतर न थकता, न गडबडता, अतिशय शांतपणे पार केलं होतं. माझा माझ्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मग मी बबलिंग करत पुन्हा त्या टोकापासून या टोकापर्यंत परत निघाले. हेही अंतर मी तसंच पार केलं. आता मात्र हे स्वप्न नाही खरंच आपण सगळं अंतर पार केलंय यावर माझा विश्वास बसला.
मी अत्यानंदाने पाण्यात नाचत ‘युरेका युरेका’ म्हटलं. मन आणि शरीर यांचा समन्वय झाल्याने ही किमया घडली होती. पण मी थोडीशी मनातून खट्टू झाले. कारण माझं हे यश बघायला उदय, मोहिनीसुवर्णा, सुप्रिया आणि इतर कोणी कोणी नव्हते. तरीही मी मान वर करून आसपास बघितलं. संपूर्ण रोहन लेहेर सोसायटीतली जास्वंदाची लाल, पांढरी, गुलाबी, चाफयाची लाल, पांढरी, पिवळी आणि वेलीवरची जांभळीनिळी अशी सगळी फुलं डोलत माझं स्वागत करताना मला दिसली. एकाएकी सगळीकडे रंगीबेरंगी पताका, तोरण आणि उभारलेल्या गुढ्यांसह आतिषबाजीही दिसू लागली. माझ्यासमोर महाभारतातला रेशमी वस्त्रात, गळ्यात फुलांच्या माळा आणि माथ्यावर मुकूट धारण केलेला नीतीश भारद्वाज कृष्णाच्या रूपात प्रसन्न हास्य करत उभा होता. हळूहळू त्याचा चेहरा बदलत गेला आणि तिथे मला उदयचा चेहरा दिसू लागला, उदय हसून म्हणत होता, ‘जमलं की काकू तुम्हाला, आता थांबायचं नाय!’
दीपा देशमुख
adipaa@gmail,com
Add new comment