बुद्धाचा र्‍हाट

बुद्धाचा र्‍हाट

बुद्धाचा र्‍हाट समोरच्या रॅकमधून ‘बुद्धाचा र्‍हाट’ या पुस्तकानं मला खुणावलं आणि बाकीची कामं बाजूला ठेवून मी हे पुस्तक वाचायला घेतलं. प्रथम ‘बुद्धाचा र्‍हाट’ या शीर्षकानं मनात कुतूहल निर्माण केलं. बुद्धाचा र्‍हाट यातला र्‍हाट म्हणजे काय, तर कदाचित रहाटगाडगं यातला रहाट शब्द असावा आणि त्याच शब्दाचा अपभ्रंश र्‍हाट, असं वाटून गेलं. पण तरीही बुद्धाचा र्‍हाट म्हणजे नेमकं काय या कुतूहलापोटी पुस्तक उघडलं आणि पूर्ण पुस्तक एका दमात वाचून काढलं. 'बुद्धाचा र्‍हाट’ ही कादंबरी आहे की दीर्घ कथा याबद्दल अनेकांची अनेक मतं असू शकतील. मात्र हे पुस्तक हातात घेतलं की लगेच वाचून होण्यासारखं आहे.

यातलं उत्तम कांबळे यांचं सुरुवातीचं मनोगत जरूर जरूर वाचायला हवं. मला पूर्वी वाटायचं, की धर्म का बदलायचा? धर्म बदलल्यानं आतला माणूस थोडीच बदलतो? मग पहिलं लेबल काढून दुसरं लेबल चिटकवण्याला काय अर्थ? वगैरे वगैरे. मात्र उत्तम कांबळे यांचं हे पुस्तक या प्रश्नाचं उत्तर देतं. मुळातच जर तुम्ही उच्च जातीत, उच्च धर्मात जन्माला आला असाल तर या प्रश्नाची तीव्रता, दाहकता लक्षात येतच नाही. विद्या बाळ एकदा म्हणाल्या होत्या...त्या वेळी राखीव जागांबद्दल काही सवर्ण मैत्रिणी नकारात्मक सूर काढून बोलत होत्या. त्यांना त्यांच्या मुलाबाळांवर अन्याय होतोय असं वाटत होतं. त्या वेळची ही गोष्ट! अमूक एका जातीत किंवा धर्मात जन्मल्यामुळे अनेक गोष्टी कशा आपसूकच मिळाल्यात आणि त्यामुळे इतर जातीं-धर्मांमधल्या समस्या, प्रश्न, अडथळे यांची दाहकता कशी लक्षात येत नाही याबद्दल विद्या बाळ यांनी सांगितलं होतं. खरोखरंच या साध्या वाटणार्‍या गोष्टी पण त्यांनी सांगेपर्यंत लक्षातच आल्या नव्हत्या. भाषेपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत, मान-सन्मानापासून ते आर्थिक स्तरापर्यंत अनेक गोष्टी कशा विनासायास मिळाल्या होत्या. त्या वेळी मैत्रिणींच्या मनातल्या शंका दूर झाल्या होत्या. आपण चुकलो असं मोकळया मनानं त्यांनी मान्यही केलं. धर्म का बदलायचा या प्रश्नाचं उत्तर बुद्धाच्या र्‍हाट मधून मिळतं.

पिढ्यानं पिढ्या माणूस म्हणून नव्हे तर जनावरापेक्षाही बत्तर जीवन जगणार्‍या माणसाला बाबासाहेबांनी 'तू माणूस आहेस' याची जाणीव करून दिली. त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली; त्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगितला आणि स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून आपल्याबरोबर लाखो बांधवांना त्याची दीक्षा दिली. बौद्ध धर्माच्या दीक्षेमुळे काय घडलं, तर महार, मांग, दलित, हरिजन आणि तत्सम नावानं चिटकलेली, इतरांच्या द़ृष्टीनं विटाळलेली ती जात गळून पडली. या पुस्तकातला नायक रानबा म्हणतो, 'मी बुद्ध झालो'...दीक्षा घेतल्यापासून त्याचं मन गुणगुणत राहतं, 'मी बुद्ध झालो’ त्याच्यात एक आत्मविश्वास संचारतो, त्याच्या चेहर्‍यावर माणूसपणाचं तेज झळाळतं, त्याला त्याच्यातल्या आत्मसन्मानाची जाणीव होते. हो, बौद्ध धर्माच्या दीक्षेनं काय घडलं, तर लाखो वंचितांना आत्मसन्मानानं जगण्याची जाणीव दिली. 'बुद्धाचा र्‍हाट' या पुस्तकातला नायक रानबा हा बाबासाहेब नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा देणार असल्याचं समजताच नागपूर गाठतो. अकोले गावाजवळ असलेल्या औरंगपूर नावाच्या दोन-तीनशे वस्ती असलेल्या गावातून मजल-दरमजल करत नागपूरपर्यंत पोहोचणं त्याच्यासारख्या गरिबाला अजिबातच शक्य नसतं. मात्र माणसातली तीव्र इच्छाशक्ती असाध्य ते साध्य कशी करून दाखवते याचं उदाहरण रानबाच्या या प्रवासातून कळतं. घरातली भांडीकुंडी विकून प्रवासासाठी गोळा केलेले अपुरे पैसे, बरोबर भाकरी आणि ठेचा, अशा परिस्थितीत कधी चालत तर कधी रेल्वेनं तो नागपूरपर्यंत पोहोचतो. बाबासाहेबांनी दिलेली बौद्ध धर्माची दीक्षा तो घेतो, त्या २२ प्रतीज्ञांची शपथ घेतो. जुनी कात टाकून एक नवा जन्म घेतलेला रानबा आपल्या गावाकडे नव्या ओढीनं परततो. जाताना आणि येताना कुठलेच शारीरिक श्रम त्याला जाणवत नाहीत. परतल्यानंतरचा रानबा कोणी वेगळाच झालेला असतो. परत आल्यानंतर त्याच्या हातून घडलेल्या एका प्रसंगानं अख्खा गाव हादरून जातो. सवर्ण आणि इतर असे दोन तट पडतात. युद्धसदृश्य परिस्थिती तयार होते. गावचा पाटील संयमानं हा प्रसंग हाताळतो. कथेचा किंवा कादंबरीचा शेवट वाचून आपणही सुटकेचा निश्वास सोडतो.

या पुस्तकातून बौद्ध धर्मानं बौद्ध धर्म स्वीकारणार्‍यांना काय दिलं आणि इतर समाजालाही काय दिलं या प्रश्नांची उत्तर मिळतात. 'बुद्धाचा र्‍हाट’ या पुस्तकात दलितांचं जगणं, सवर्णांची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी, बाबासाहेबांमुळे दलित-पीडित लोकांमध्ये संचारलेलं चैतन्य, बदलाचे वारे, अशा अनेक गोष्टी समोर येत राहतात. उत्तम कांबळे यांची भाषा अत्यंत रोचक असून ते वाचकाला शेवटपर्यंत आपल्या प्रवासात गुंतवून ठेवतात. वाचकही त्या प्रवासाचा, त्या परिस्थितीचा भाग बनतो. रावसाहेब कसबे यांच्या वडिलांची खरं तर ही कथा! एके दिवशी त्यांच्या तोंडून ही कथा उत्तम कांबळे यांनी ऐकली आणि ते अस्वस्थ झाले. त्यांनी रावसाहेबांना यावर लिहावं अशी विनंती केली. मात्र रावसाहेब कसबे यांनी तुम्हीच लिहा असं सांगितलं आणि उत्तम कांबळे यांच्या ओघवत्या लेखणीतून बघता बघता ‘बुद्धाचा र्‍हाट’ आकाराला आला.

या पुस्तकाचे प्रकाशक आहेत मनोविकास प्रकाशन! मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर आणि आशिश पाटकर यांनी नेहमीच अंधश्रद्धेच्या विरोधातल्या, पुरोगामी, विज्ञाननिष्ठ अशा लिखाणाला प्रोत्साहन दिलं आहे. हेही पुस्तक त्यांच्या विचारांचं साक्षी आहे. जरूर वाचा, ‘बुद्धाचा र्‍हाट!’

दीपा देशमुख, पुणे.

deepadeshmukh7@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.