घनगर्द - हृषीकेश गुप्ते
घनगर्द
रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेला हृषीकेश गुप्ते या लेखकाचा 'घनगर्द' हा कथासंग्रह आज वाचायला घेतला. लहानपणापासून मला गूढकथा, भयकथा, गुन्हेगारीकथा, रहस्यकथा, साहसकथा वाचायला आवडतात. अशा प्रकारचं लिखाण एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. म्हणूनच तर एडगर अलन पो, आर्थर कोनन डायल, नारायण धारप, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर हे सगळे लेखक आवडायचे आणि आवडतात. यांच्या यादीत हृषीकेश गुप्ते हे नाव कधी अॅड झालं हे मलाही कळलं नाही.
'घनगर्द'मधल्या कथा यापूर्वी वेगवेगळ्या दिवाळीअंकात आणि इतरत्र प्रसिद्ध झालेल्या असल्या तरी पुस्तकरुपात त्यांना एकत्रित पाहण्याचा/वाचण्याचा/अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच आहे. यातली पहिली कथा 'घनगर्द' याच शीर्षकाची! पौगंडावस्थेतल्या गार्गी नावाच्या एका मुलीची! या टप्प्यातल्या मुलीची मनोवस्था लेखकानं इतकी हुबेहूब चित्रीत केली आहे की मी कितीतरी वेळ स्तिमित झाले. त्या गार्गीच्या जागी मला मीच दिसू लागले. तिचे कितीतरी अनुभव, तिच्या मनात येणारे वेगवेगळे विचार माझेच झाले. शाळा, मैत्रीचं जग, पौगंडावस्थेतली बदलणारी शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरं, मनात येणारे लैंगिकतेविषयीचे विचार आणि कधी कधी त्यामुळे आलेली अपराधी भावना तर कधी त्यातूनही मिळालेला आधार, आई-वडिलांच्या भांडणांचे आपल्या परीनं लावलेले अर्थ, वडिलांविषयीचं जास्तीचं प्रेम, जवळीक असं खूप काही या कथेतून मिळत राहतं. स्वप्न, ग्लानी, वास्तव या सगळ्यांची सरमिसळ आणि त्यातून वास्तवाची जाणीव झाल्यानंतरची आलेली समज खूप तरल पातळीवर लेखकानं मांडली आहे. घनगर्द जंगलं केवळ झाडांचं, पशूंचंच नसतं, तर माणसांचंही असतं आणि तिथं मात्र एकट्यालाच सामोरं जावून मार्ग काढायचा असतो, हे खूपच भिडलं.
'पावसात आला कोणी' ही देखील अतिशय सुरेख अशी कथा आहे. यातही वास्तव आणि कल्पना यांच्यातला गुंता चित्रीत केला आहे. मनात उमटणार्या असंख्य कल्पना त्या अनेक ठिकाणी, अनेक मनांमध्ये उमटत असतात. मात्र त्यांना प्रत्यक्षात कागदावर आणणारे त्यातले मोजकेच असतात. ‘ओळखलत का सर मला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण देणाऱ्या ओळीनं या कथेची सुरुवात होते. उत्कंठा वाढत जाते. ‘विरून गेलेल्या कल्पना आणि सोडून गेलेली प्रेयसी - कधीच परत येत नसतात’ हे वाक्य मनाला स्पर्शून गेलं. यानंतरची कथा 'पानगळ' आहे. यातही लहानपणी आंब्याची चोरी केली याची टोचणी आयुष्यभर काय परिणाम करते याविषयी लेखकानं सांगितलं आहे. सत्य आणि कल्पना यांच्या एकत्रीकरणातून कधी कधी संभ्रमावस्था तयार होते. अनेकदा त्यांना वेगळं करता येत नाही. 'मुआवजा' या कथेत मनासारखं आयुष्य जगता येण्यासाठी द्यावी लागणारी किंमत यावर ही कथा बोलते.
'रमलवाटा' यात भीती, कल्पना आणि वास्तव यांच्या एकत्रीकरणातून भीतीचं स्पष्ट होत जाणारं रूप दाखवलं आहे. खरं तर या कथांबद्दलही विस्तारानं लिहिता येईल. पण वाचकांनी या कथा वाचून त्यांचं एक विश्व उभं करावं आणि त्याचा आनंद घ्यावा असं मनापासून वाटतं. हृषीकेश गुप्ते या लेखकाचं वैशिष्ट्य असं की कथा वाचताना कुठेही कथेची पकड सुटत नाही. मन रेंगाळलं तरी कथा कंटाळवाणी होत नाही. वास्तव आणि भ्रम यांच्यातलं द्वंद, त्यांची सरमिसळ माणसाला गोंधळवून कशी टाकते याचा विलक्षण प्रत्यय हृषीकेश गुप्तेंच्या कथा वाचताना येतो. बिभत्सपणा, किळस या गोष्टी शक्यतो हृषीकेश गुप्तेंच्या लिखाणात येत नाहीत यामुळे मला खूप हायसं वाटतं. भय, थरार सगळं काही मानसिक अवस्थेतून किंवा वातावरणातून निर्माण करण्यावर लेखकाचा भर दिसतो. आपण समृद्ध होण्यासाठी लिखाणाचा प्रत्येक प्रकार वाचनात आला पाहिजे. काही प्रकारात ज्ञान मिळेल, तर काही प्रकारात कल्पनाशक्तीला चालना मिळेल. काही प्रकारांमध्ये स्वप्नरंजन होईल तर काही प्रकारात जगण्यासाठीची दृष्टी लाभेल. हे पुस्तक लेखकानं गिरीश सहृस्त्रबुद्धे या कलाकाराला अर्पण केल्याचं बघून आनंद द्विगुणित झाला. रोहन प्रकाशनाचं@Rohan Champanerkar 'घनगर्द' हे नवं पुस्तक जरूर जरूर वाचा.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment