वोपामुळे ऑनलाईन शाळा आणि शिक्षण - तेही चकटफू - व्ही स्कूल
कोरोनानं आयुष्याची सगळी गणितंच बदलून टाकली. या संकटातून बाहेर आल्यावर आपली अर्थव्यवस्था, रोजगार, मानसिक आरोग्य, उद्योग, पर्यटन, मनोरंजन क्षेत्र, शेती, शिक्षण या सगळ्यांचं नुकसान किती झालेलं असेल याची कल्पनाच करवत नाही. स्वप्नातही कधी वाटलं नाही की प्रत्येक माणसाला सक्तीचा तुरुंगवास भोगावा लागेल. आर्थिक परिस्थितीला कंटाळून रोज कुटुंबांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण वाचतो आहोत, जिवलगांचे मृत्यू बघतो आहोत आणि अशा वेळी आपण हतबल आहोत, हळहळ करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही आहोत.
अशा वेळी काही युवा खचून न जाता मुलांचं याही काळात शिक्षणाचं नुकसान होवू नये यासाठी जिद्दीने edu.vopa.in नावाची एक वेबसाईट तयार करतात, व्ही स्कूल नावाचं एक ॲप तयार करतात आणि महाराष्ट्रातल्या पहिली ते दहावी इयत्तेतल्या सगळ्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून द्यायचं ठरवतात. हो मोफत!
ऑनलाईन शिक्षण सुरू राहिलं तरी आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना व्ही स्कूल नावाचं हे ॲप खूप खूप महत्वाचं ठरणार आहे. कुठल्याही अँन्ड्रॉईड स्मार्ट मोबाईल फोन मधून मुलं या ॲपचे सदस्य होऊ शकतील. म्हणजे रजिस्ट्रेशन करता येईल. तेही इतकं सोपं की रजिस्ट्रेशन करताना ओटीपी येईल आणि तो टाकला की झालं तुमचं रजिस्ट्रेशन. एकाच घरातल्या वेगवेगळ्या इयत्तेत असलेल्या मुलांना हे ॲप वापरता येणार आहे. शिक्षक असोत वा पालक त्यांच्यासाठी देखील अनेक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत इथे दिलेल्या आहेत. मुलांनी किती वेळ अभ्यास केला, कोणता अभ्यास केला, कुठल्या शाळेतली मुलं कोणत्या विषयात थोडी कच्ची आहेत, कुठल्या विषयात जास्त सरस आहेत ते सगळं इथे मोजताही येणार आहे. ज्यामुळे कमी तिथे कार्यशाळा असंही करता येईल.
इंटरनेट नसेल तेव्हाही अभ्यास करता येणार आहे कारण मुलांना इंटरनेट असतानाच त्यांचा अभ्यासाचा धडा डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मुलांना अभ्यास करताना काही अडचणी येत असतील, शंका असतील तर ते उपलब्ध चाट रुममधून मित्रांना, शिक्षकांना प्रश्नही विचारण्याची सोय आहे. व्ही स्कूलतर्फे नवीन उपक्रम, कार्यक्रम, याबद्दल काही सूचना असल्या तर त्याही या ॲपमधल्या मेसेज बोर्डवर दिसणार. जास्त अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुकही इथे होणार आहे. इतकंच नाही तर माझा आत्ताच्या वर्गाचा अभ्यास झालाय आणि मला पुढल्या वर्गात काय काय धडे असणार आहेत याची उत्सुकता असेल, तर मला पुढल्या वर्गाचा अभ्यासक्रम देखील बघता येणार आहे, अभ्यासता येणार आहे.
खरं सांगू का वोपा किंवा व्ही स्कूलची वेबसाईट तर दोन वर्षांपासून कार्यरत होतीच, पण आता या व्ही स्कूलच्या ॲपनं दुनिया मेरी मुठ्ठीमेचा फिल आपल्याला येणार आहे. शाळा, अभ्यास नको वाटणाऱ्यांना देखील खेचून घेईल असं हे ॲप आहे. अत्यंत देखणं, आकर्षक आणि दर्जेदार असं.
आज जवळ जवळ १ कोटी २० लाख लोकांनी व्ही स्कूलचं पेज व्ह्यू केलं आहे आणि आज याचे जवळजवळ १७ लाख युजर्स आहेत.
तर हे सगळं करणारे युवा म्हणजे वोपाची टीम - ज्यात आहे प्रफुल्ल, ऋतुजा, आदिती आणि टीम. त्यांचं पालकत्व घेणारे दीपक पळशीकर सर, अनेक दाते, स्नेही, जळगाव प्रशासन .. मला माझ्या या मुलांचं खूप खूप कौतुक वाटतंय, किती झटताहेत, किती परिश्रम करताहेत. अशा वेळी मला माझं आवडतं चळवळीतलं गाणं आठवतं, आपल्या परिश्रमानं आपण खरंच काय निर्माण करू शकतो :
तू जिंदा है तू जिन्दगी की जीत पर यकीन कर,
अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर....
तर, लवकरच या सुरेख शाळेत सामील व्हा, अर्थात मीही होणार आहे.
दीपा देशमुख, पुणे.
Blog comments
Thanking you.
खूप खूप धन्यवाद दीपाताई. तुम्हाला भेटून बोलून नेहमीच छान वाटतं. आज तुम्ही केलेलं कामाचं कौतुक पाहून आमच्या संपूर्ण टीमलाही नक्कीच 'भारी' वाटेल.😊
समाजसेवा
दिपा देशमुख आणि सर्व टिम आपण गेली वर्षभर मोफत आॉनलाईन शिक्षण देता आहात या कार्याबद्दल आपले खुप खुप आभार.
Add new comment