अभी ना जा मेरे साथी.............फर्माईशे

अभी ना जा मेरे साथी.............फर्माईशे

तारीख

फर्माइर्शेचे निर्माते आणि माझे मित्र प्रवीण गोखले यांना मी आज प्रेमपुजारी कार्यक्रमाला येणार असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे पाचचा कार्यक्रम असताना चार वाजून चाळीस मिनिटांनी मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पोहोचले. पाचच मिनिटांत आसावरीची स्कुटरही पोहोचली. वेगवेगळ्या सुरेख पेहरावातल्या स्त्री-पुरुषांनी परिसर फुलून गेला होता. सगळेचजण आत जाण्यासाठी आतुर झाले होते आणि पाच वाजताच सगळे आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. 

समोरच्या पडद्यावर फर्माईशे कार्यक्रमाचं बॅनर, त्या खाली प्रेमपुजारी देवआनंदची प्रसन्न मोहून घेणारी छबी, आसपास बसलेला प्रसन्न वाद्यवृंद, कार्यक्रम लगेचच सुरू झाला. 
कार्यक्रम देवआनंदच्या गीतांवर होता. देवआनंद २६ सप्टेंबर १९२३ साली जन्मला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यानं ६५ वर्षं गाजवली. ११४ चित्रपटांमधून अभिनय केला. ३५ पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. २००१ साली भारत सरकारनं देवआनंदला पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवलं, तर २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. काला पानी आणि गाईड चित्रपटातल्या अभिनयाबद्दल त्याला अभिनयाचा सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 

केसांचा तुरा, देखणा लोभस चेहरा, मान कलती करण्याची खास लकब, खांद्यापासून हात सैल सोडत चालण्याची सवय....असा हा देवआनंद चॉकलेट हिरो म्हणून गाजला. हॉलिवूडमधला गे्रगरी पॅक या अभिनेत्याशी त्याची तुलना केली जात असे.  फर्माईशेचे निवेदक संदीप पंचवाडकर म्हणाले, प्रेम करावं तर राजकपूरसारखं, प्रेम करावं वाटत असेल तर देवआनंद सारखं आणि प्रेमात विफलता आल्यावर वागावं तर दिलीपकुमार सारखं! खरोखरंच, आई-वडिलांच्या काळातला हा नायक, पण प्रत्येक पिढीला तो आपल्याच काळातला वाटावा असा! त्याच्या प्रत्येक चित्रपटातली गाणी ही केवळ त्याचीच आणि त्याच्यासाठीच वाटावीत अशी, एकापेक्षा एक अवीट! अर्थातच त्यात त्याच्या संगीतकारांचं म्हणजे एसडी, ओ.पी. नैय्यर, शंकर जय-किशन यांचं नीरज, साहीर, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी यांच्यासारख्या दिग्गज गीतकारांचं आणि त्याच्यासाठी त्याच्याच शैलीचा आवाज देणार्‍या किशोर कुमार, मं. रफी, तलत महेमूद, हेमंतकुमार या गायकांचं तितकंच मोलाचं योगदान होतं.

 
२०११ साली डिसेंबर महिन्यात वयाच्या ८८ व्या वर्षी देवआनंदचा मृत्यू झाला. अखेरपर्यंत त्याच्या डोक्यात चित्रपटनिर्मितीचाच विचार होता. कामाच्या बाबतीतलं झपाटलेपण, निष्ठा आणि वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा त्यानं आयुष्यभर पाळला. वहिदा रहेमाननं त्याच्या बाबतीत म्हटलं होतं, की तिनं अनेक अभिनेत्यांबरोबर काम केलं असलं तरी देवानंदच्या स्पर्शातून एक आधार, विश्वास आणि आश्वासकता जाणवायची. त्याच्या वागण्यातला सच्चेपणा त्याच्या बोलण्यातून, त्याच्या कृतीतून आणि त्याच्या स्पर्शातूनही जाणवायचा. संदीप पंचवाडकर हा तरूण म्हणाला, देवआनंदचं वैशिष्ट्य असं होतं की सर्वसामान्यता मुलगी रुसते आणि मुलगा तिचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतो. पण देवआनंदच्या बाबतीत मात्र हिरॉइन्स त्याला मनवण्याचा प्रयत्न करत आणि अशा हिरॉईन्स की ......उदा, मधुबाला (अच्छा जी मै हारी..), हेमामालिनी (ओ मेरे राजा)! संदीपने देवानंद आणि गुरुदत्त यांच्या मैत्रीचे हृद्य असे किस्सेही सांगितले.

संदीप पंचवाडकर या तरूणाच्या सहज ओघवत्या निवेदनातून देवआनंदच्या आयुष्याचा पट उलगडला जात होता, पण त्याचबरोबर त्याची एकापेक्षा एक अशी सरस गाणी कानावर पडत होती. पडद्यावरची देवआनंदची छबी प्रत्येकाला आपापल्या भूतकाळात घेऊन जात होती. प्रशांत नासीर, धवल चांदवडकर आणि रसिका गानू यांनी आपल्या आवाजाचा साज चढवत या मैफिलीमध्ये बहार आणली होती. प्रशांतमध्ये तर देवआनंद आणि किशोरकुमार अक्षरशः संचारले होते. खरंच, इतकं झपाटल्याशिवाय, त्यात झोकून दिल्याशिवाय त्या गोष्टीचा आनंद, त्याची मजा कळतच नाही.

 
माना जनाबने पुकारा नही हे गाणं गाताना तर प्रशांतनं धमाल उडवून दिली. धवलचं दिन ढल जाये, रात न जाये या गाण्यानं वेदनेला जागं केलं, तर रसिका ही इतकी गोड मुलगी की ती पहिल्यांदा अशा जाहीर कार्यक्रमात गात होती यावर विश्वासच बसू नये! ती जितकी गोड दिसत होती, तितकीच ती सफाईनं अतिशय उत्कृष्टपणे गात होती. तिच्या आवाजात तिने त्या त्या गाण्याचे भावही ओतलेले होते.  वाद्यवृंदामध्ये बासरीनं तर जादूई कमाल केली होती. तसंच गिटार असो वा इतर वाद्यं सगळीच पूरक आणि अप्रतिम अशी साथ देत होती. प्रतीक गोखलेनं पडद्यावर देवानंदच्या वैविध्यपूर्ण प्रतिमा दाखवल्या होत्या. मात्र एक सूचना अशी की त्या त्या चित्रपटातल्या प्रसंगांची छबी आली असती तर अधिक छान वाटलं असतं. तसंच दिन ढल जाये या गाण्याच्या वेळी सॅड मूडच्या वेळी देवआनंदची हसरी छबी दाखवली हे जरा विसंगत वाटत होतं!

खोया खोया चाँद, खुला आसमाँ, दिल पुकारे आरे आरे, फुलोंके रंगसे दिल की कलमसे, पन्ना की तमन्ना है के, दिल आज शायर है गम आज नगमा है, ओ मेरे राजा खफा न होना, अच्छा जी मै हारी, ये रात ये चाँदनी फिर कहाँ, आखो ही आखो मे इशारा हो गया, जिया हो जिया हो जिया कुछ बोल दो, ऐसे तो ना देखो, जाये तो जाये कहाँ, ख्वाब हो तुम या कोई हकिकत, अभी ना जाओ छोडकर अशी सगळी धुंद करणारी गाणी की प्रत्येक गाणंच पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटत होतं. कार्यक्रम संपूच नये अशी ही फमाईंश होती. अर्थात, कार्यक्रम संपला तरी त्या अवीट अशा गाण्यांची गोडी मनावर ठेवूनच तो संपला!
धन्यवाद फर्माईंशे, धन्यवाद प्रवीण गोखले! आणि धन्यवाद पल्लवी!!!!

दीपा देशमुख, पुणे 
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Categories