भीमथडी जत्रा- विनय नारकर आणि मासवण

भीमथडी जत्रा- विनय नारकर आणि मासवण

तारीख

विख्यात डिझायनर आणि माझे फेसबुक मित्र असलेले विनय नारकर यांना गेले तीन-चार वर्षांपासून भेटायचं ठरवते आहे, पण काही ना काही कारणांमुळे भेट राहून जात होती. त्यातच २५ तारीख नगरच्या कार्यक्रमात गेली आणि आज २६ तारीख भीमथडीच्या जत्रेचा शेवटचा दिवस! उद्या एसपी कॉलेजच्या हॉस्टेलवर कार्यक्रम....असं सगळं असताना विनयला भेटायचंच ठरवून मी भीमथडी जत्रेच्या विनय नारकर यांच्या स्टॉलवर पोहोचले.

विनयला या आधी कधी बघितलं नव्हतं, पण ताबडतोब ओळखता आलं. दाक्षिणात्य हिरोची पर्सनॅलिटी असलेला हा स्मार्ट मित्र सहजपणे ओळखता यावा असाच! भेटून खूप छान वाटलं. त्यानं तयार केलेल्या साड्यांमधला सुबकपणा आणि कल्पकता पाहून मन रमून गेलं. सगळ्याच साड्या गाठोड्यात बांधाव्यात आणि घरी घेऊन जाव्यात असा हट्ट मन करायला लागलं. मनाला दटावून गप्प बसवलं.....मात्र अपूर्वनं माझ्या हट्टी मनाची साद ऐकली आणि माझ्या आवडत्या हिरव्या रंगाची साडी मला ताबडतोब घेऊन दिली.

माझ्यातले रंगा आणि मोगॅम्बो एकदम खुश झाले. मग साडीसोबत विनयसह फोटो सेशन झालं. विनयने सोलापूरला त्याच्या घरी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. खुशीतच 'पुन्हा सोलापूरला लवकर भेटू' असं म्हणत मी विनयचा निरोप घेतला.

आता बाकी काहीही न बघता सरळ गेटबाहेर पडू असं म्हणत मी वळाले तर तेवढ्यात साधनाताई (साधना दधिच) आणि वर्षा (फातरपेकर) दोघीही माझ्याकडे बघत हसत येताना दिसल्या. मासवण आणि आदिवासी सहज शिक्षण परिवार इथलं कोणीही दिसलं किंवा आठवलं की मन फुलून येतं. साधनाताई आणि वर्षाला बघताच आपला स्टॉल कुठे असा प्रश्न पडला. साधनाताई आणि वर्षा यांच्याबरोबर आमच्या स्टॉलवर पोहोचले. प्रमोद, तारा आणि सगळ्यांनीच मला ओळखलं. माझ्यासारखाच त्यांच्याही चेहर्‍यावर आनंद झळकला. प्रमोदनं तर रानभाज्यांवर पुस्तक लिहिलं होतं आणि मला ते भेटही दिलं.

दिवसभर स्टॉलवरच उभं राहून सगळ्यांशी गप्पा मारायचा मोह होत होता, पण पुन्हा मनाला आवरलं. अपूर्वला त्याचे आवडते उकडीचे मोदक खायचे असल्यानं ते त्यानं खाल्ले आणि मी विनय नारकरच्या सुरेखशा रेशमी साडीचा सुखद स्पर्श अनुभवत आणि मासवणच्या माझ्या आदिवासी कार्यकर्त्या मित्र-मैत्रिणींच्या आठवणी आणि बोलके चेहरे आठवत घराच्या रस्त्याला लागले. 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.