वहिदा - हितगुजातून उलगडलेली ...

वहिदा - हितगुजातून उलगडलेली ...

नुकतंच ‘वहिदा रेहमान’ हे रोशन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं. कुठलंही पुस्तक वाचण्यासाठी आधी नजर जाते ती त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि मग ते मुखपृष्ठ आपल्याशी काय बोलतं यावर ते पुस्तक हातात घ्यायचं की नाही ते अनेकदा ठरतं. या पुस्तकाचंही असंच झालं. कृष्णधवल चित्रातली वहिदाची बोलकी छबी लक्ष वेधून घेणारी वाटली. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची मांडणी करणारे प्रदीप चंपानेरकर आणि रेश्मा वाळुंज यांचं मनःपूर्वक अभिनंदन. 
'कॉन्व्हर्सेशन विथ वहिदा रेहमान’या इंग्रजीतून लिहिलेल्या पुस्तकाच्या लेखिका नसरीन मुन्नी कबीर असून त्या चित्रपटविषयक संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण लेखन करणार्‍या, लघुपट बनवणार्‍या लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या मूळ इंग्रजीतून असलेल्या पुस्तकाचा मराठीतला अनुवाद ‘वहिदा रेहमान - हितगुजातून उलगडलेली’ मिलिंद चंपानेरकर यांनी केला आहे. हे संपूर्ण पुस्तक म्हणजे दोन व्यक्तींमधला सुसंवाद आहे आणि यातूनच वहिदा रेहमान या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्रीची कारकीर्द आणि आयुष्य उलगडत जातं. 
‘प्यासा’, ‘गाईड’, ‘मुझे जीने दो’, ‘तीसरी कसम’, ‘खामोशी’ अशा अविस्मरणीय चित्रपटातून ठसा उमटवणारी सुजाण अभिनेत्री वहिदा रेहमान हिनं प्रेक्षकांच्या मनावर सहा दशकांहून अधिक काळ ठसा उमटवला. तिचं नाव घेतलं की समोर येतात तिचे बोलके डोळे, तिचा करारीपणा, तिच्यातली संवेदनशीलता ! मुळात मितभाषी असलेल्या आणि वाटणार्‍या वहिदाला बोलतं करणं हे कठीणच काम होतं आणि ते लेखिकेनं लीलया साधलेलं दिसतं. हे संपूर्ण पुस्तक अतिशय संयतपणे लिहिलेलं असून यात वहिदाचे चित्रपट, त्यातल्या तिच्या भूमिका, तिचे सहकलाकार, नंदासारखी जिवलग मैत्रीण अशा अनेक गोष्टी यात येतात. 
एका सनदी अधिकार्‍याची मुलगी असलेली वहिदा सुसंस्कृत वातावरणात वाढत असतानाच वडलांचा झालेला आकस्मिक मृत्यू तिच्या आयुष्याला नवं वळण देणारा ठरतो आणि ते वळण ती अतिशय खंबीरपणे, सावधगीरीने स्वीकारते. वहिदाची बुद्धिमत्ता, तिचं वाचन, तिची कलेतली जाण या पुस्तकामधून पदोपदी जाणवतं. तिचा साधा, सरळ आणि कुणाच्याही आयुष्यात विनाकारण न डोकावण्याचा स्वभाव खूप काही सांगून जातो. आपली प्रत्येक कृती आपल्याविषयी सांगत असते. तेच वहिदाच्या बाबतीत दिसून येतं. तिनं केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका बघितल्या तर या गोष्टीचा प्रत्यंतर येतो. 
गुरुदत्त या जाणत्या कसदार दिग्दर्शकामुळे जास्त प्रकाशझोतात आलेली वहिदा त्याच्याविषयीचे कृतज्ञभाव व्यक्त करताना जाणवते, मात्र त्याचबरोबर आपल्या आयुष्यातला नाजूक कोपरा त्यात कोणाला शिरकाव करण्याची ती संधी देत नाही. त्यामुळे या संवादातून, हितगुजातून ती संवादकर्तीला एक मर्यादा घालून देते. 
वहिदाची आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आपण स्त्री आहोत, स्त्री-वादी आहोत याचा कुठलाही अविर्भाव तिच्या बोलण्यातून दिसत नाही. एक सजग व्यक्ती म्हणूनच तिचं दर्शन होत राहतं. म्हणूनच देवआनंदचं मोकळंचाकळं वागणं तिला खटकत नाही. माणसांना पारखण्याचं कसब तिच्यात दिसतं. त्या काळात स्त्री-पुरुषांनी मोकळं वागण्याची मुभा नसताना देवआनंद हा एकमेव अभिनेता सगळ्यांशीच अगदी गळ्यात हात टाकून, खांद्यावर थाप मारून बोलत असे. अशा वेळी त्याच्या वागण्यातली डिसेन्सी कशी होती हे अतिशय सहजतेनं वहिदा व्यक्त करते. पण त्याच वेळी चित्रपटात काम करताना आपण नवोदित आहोत, वाट्टेल त्या अटी मान्य करणं तिच्या स्वभावात नाही. तिला न रुचलेले पोशाख तिनं घातले नाही आणि तशी स्पष्ट जाणीवही तिनं दिग्दर्शकाला करून दिली. स्वतःला ओळखणं, मूल्यांबाबत तडजोड न करणं, हवा तिथे स्पष्टवक्तेपणा दाखवणं असे तिच्या स्वभावातले अनेक पैलू या पुस्तकातून बघायला मिळतात.
एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगनंतर त्याविषयी मत विचारल्यावर आपलं प्रामाणिक मत देण्यावर तिचा भर दिसून येतो आणि त्या मतामधली तिची खोली देखील जाणवते. ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटाबद्दलचं आपलं प्रामाणिक मत व्यक्त करताना ती हा चित्रपट अतिच नाट्यमय केला असल्याचं सांगते. तसंच चित्रपट बघून प्रेक्षकांना रडायला उद्युक्त करायला हवं होतं, न की त्यात काम करणार्‍या कलाकारांना. असं ती स्पष्ट सांगते. भारतीय चित्रपट खूपच शब्दांचं पाल्हाळ लावणारे असतात. थोडक्यात अतिबोलके असतात असं दिग्दर्शकाला परखडपणे सांगू शकण्याची ताकद तिच्यात आहे. 
सत्यजीत रे यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली ही तिला खूप मानाची गोष्ट वाटते. मात्र त्याच वेळी बिमल रॉय सारख्या दिग्दर्शकाबरोबर चित्रपट करायचा राहून गेला याची खंतही ती व्यक्त करते. 
कुठलाही गाजावाजा न करता गेली चाळीस वर्षं स्त्री प्रश्न, अपंगत्व आणि प्रथमसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणावर काम करणार्‍या संस्थेबरोबर वहिदा काम करते आहे. यातूनही तिचं सामाजिक भान जाणवतं. आपल्या भौतिक गरजा मर्यादित ठेवून दुसर्‍यांचं दुःख आणि यातना समजून घ्यायला हव्यात आणि त्यासाठी मदतीची तयारी हवी असं तिला वाटतं. 
वहिदाचं जीवन आणि तिचा चित्रपट प्रवास उलगडणारं हे पुस्तक अनुवादक मिलिंद चंपानेरकर यांनी अतिशय सकस आणि तरीही त्यातली उत्कंठा न घालवता वाचकांसमोर आणून तिच्या या प्रवासाला योग्य न्याय दिला आहे. आपण समोरासमोर बसून जणूकाही वहिदाशी गप्पा मारतो आहोत असा फील मिलिंद चंपानेरकर वाचकांना देतात. सहजसोपी संवादी भाषा, पुस्तकातल्या आठवणींचा, प्रसंगांचा ओघ याचा समतोल साधण्यात लेखिकेचं आणि अनुवादकाचं कौशल्य आपल्याला बघायला मिळतं. जरूर वाचा.
दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.