डोन्ट लूक अप

डोन्ट लूक अप

अमेरिकेत घडणारं कथानक दाखवलं असलं, तरी ते आपल्याही देशाला लागू पडतय  असं वाटावं अशी ही गोष्ट म्हणजे डोन्ट लूक अप हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट!अमेरिकेतल्या मिशिगन स्टेट युनिव्‍हर्सिटी मध्ये खगोलशास्त्रात पीएचडी करणारी विद्यार्थिनी केट डिबियास्की (जेनिफर लॉरेन्स) दूरवरचं निरीक्षण करू शकेल अशा दुर्बिणीने अंतरिक्षाचा अभ्यास करत असताना तिला एक धूमकेतू दिसतो. हा धूमकेतू बराच मोठा असतो. जवळजवळ 10 किमी व्‍यासाचा धूमकेतू वेगाने पृथ्वीकडे येताना तिला दिसतो. धूमकेतू हा उल्केसारखा असणारा एक खगोलशास्त्रीय पदार्थ असून ते सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्सॉईड, मिथेन, पाणी आणि इतर अनेक क्षार असतात. या धूमकेतूच्या पृथ्वीकडे येण्याच्या वेगाचा अभ्यास करताना केटला तो 6 महिने 14 दिवस या कालावधीत पृथ्वीवर आदळणार आणि पृथ्वीवरची जीवसृष्टी नष्ट होणार ही गोष्ट लक्षात येते. ती आपले मार्गदर्शक प्रोफेसर रांडाल मिंडी (लिओनार्दो दी कॅप्रिओ) यांना तसं सांगते आणि आपली निरीक्षणं दाखवते. या गोष्टीमागचं गांभीर्य लक्षात येताच ती दोघं ही बातमी नासामधल्या डॉ. टेडी ओगल्थोर्प (रॉब मॉर्गन) एका वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञाला सांगतात आणि ती ऐकून तिघेही चर्चा करतात. खरं तर तिघेही या बातमीने हादरून जातात. 
इतक्या कमी वेळात काय करता येईल, पृथ्वीला कसं वाचवता येईल याबद्दल चर्चा करण्यासाठी प्रोफेसर रांडाल मिंडी, केट आणि डॉ. टेडी ओगलेथोर्फ अमेरिकेच्या ओर्लिन (मेरिल स्ट्रीप) या राष्ट्राध्यक्षांकडे जातात. इथूनच खरी गोष्ट सुरू होते. सत्तेसाठी वेगवेगळ्या युक्त्याप्रयुक्त्या करून खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी धडपडणारी ओर्लिनसारखी स्वार्थी अध्यक्ष, तिचं लांगूलचालन करणारा वरिष्ठ पदावर असलेला तिचा मुलगा जेसन (जोनाह हिल) अध्यक्षावर वर्चस्व ठेवून प्रत्येक गोष्टीत स्वत:चं हित पाहत हस्तक्षेप करणारा उद्योगपती, गांभीर्य नसलेले आणि फालतू गोष्टीत गुंतलेले नागरिक, त्यातच इंटरनेटच्या आहारी गेलेली तरुणाई, या सगळ्यांना काय दाखवायचंय हे स्वत: ठरवणारी प्रसार माध्यमं या कचाट्यात हे शास्त्रज्ञ सापडतात. शास्त्रज्ञ सोडल्यास कोणालाही या संकटाशी काहीही घेणंदेणं नसतं, ते आपल्यातच मश्गुल असतात.
या बातमीचा फायदा स्वत:साठी कसा करून घ्यायचा हे ओर्लिन ठरवते. कारण त्याच वेळेस तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींवरून तिच्याबद्दल वादंग उठलेलं असतं. या गोष्टीचा फायदा विरोधी पक्षाचे लोक घेत असतात. तेव्‍हा येणाऱ्या निवडणुकीत आपली प्रतिमा साफसुथरी करून निवडून कसं येता येईल याचा विचार ती करत असते. उद्योगपतीच्या मदतीने आपण देशावर आलेलं संकट दूर कसं करणार आहोत हे नागरिकांवर ठसवण्याचा प्रयत्न करते. या तीन शास्त्रज्ञांपैकी एकाला सरकारच्या बाजूने पोपटपंची करायला लावण्यात येते. तोही प्रसिध्दी आणि इतर अमिषांना बळी पडतो. 24 तास मनोरंजनात गुंग असलेली प्रसारमाध्यमं विनाशाचं गंभीर संकट समोर असतानाही उथळपणाने हाही प्रश्न लोकांसमोर आणतात. त्या वेळी झापडबंद, निर्बुध्द लोक त्याकडे तितक्याच सहजपणे बघतात आणि ओ, वॉव करत प्रतिक्रिया देतात.
डोळ्यावर पट्टी बांधणारा समाज असला की काय होतं, आपल्याच मस्तवालपणामुळे आपण आपलंच नव्‍हे तर संपूर्ण मानवजातीला विनाशाकडे कसं नेत आहोत याचं दर्शन ‘डोन्ट लूक अप’ हा चित्रपट घडवतो. चित्रपटात अंधभक्‍त डोन्ट लूक अप चे नारे लावतात आणि पृथ्वी नष्ट होणार असं म्हणणं म्हणजे विरोधकांचं षडयंत्र असल्याचं पध्दतशीरपणे पसरवलं जातं. शास्त्रज्ञांचं भाकित खरं ठरतं का, तंत्रज्ञान काही ठोस उपाय शोधू शकतं का, सत्ताधाऱ्यांचे आणि उद्योजकाचे डोळे उघडतात का, असं सगळं चित्रपटाच्या शेवटाकडे जाताना पुढे काय घडतं हे बघणं खूपच रंजक आणि उत्कंठावर्धक आहे. ‘डोन्ट लूक अप’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलेली उपदेशाचे डोस पाजत किंवा विदारक वास्तव दाखवत हा चित्रपट पुढे सरकत नाही, तर व्‍यंगात्मक रीतीने ब्लॅक कॉमेडीच्या साहाय्याने चित्रपट वेग घेताना दिसतो. मात्र असं असलं तरी प्रत्येक क्षणी प्रेक्षकांना त्या मागचं सत्य कळून तो अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. 
लिओनार्दो दी कार्पिओ, मेरिल स्ट्रीप यासारख्या कलाकारांनी अतिशय कसदार आणि जिवंत अभिनय केला आहे. मेरिल स्ट्रीप या अभिनेत्रीचं तर ऑस्करसाठी तब्बल 21 वेळा नामांकन झालं होतं. तिने तर ट्रम्पची हुबेहूब नक्कल केल्याचं म्हटलं गेलंय. चित्रपटाचा निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक ॲडम मॅक्काय असून या चित्रपटाला क्रिटिक्स चॉईस मूव्‍ही ॲवार्ड बेस्ट कॉमेडीसाठी मिळालेलं आहे.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.