पॉप संगीताचा बादशहा - मायकेल जॅक्सन
पॉप संगीताचा बादशहा - मायकेल जॅक्सन
लवकरच येत असलेल्या आमच्या 'सिम्फनी' या पुस्तकातून ...... आज २९ ऑगस्ट....याच दिवशी १९५८ साली पॉप संगीताचा बादशहा - मायकेल जॅक्सन याचा जन्म झाला. आज तो असता तर जगभर त्याचा वाढदिवस प्रचंड उत्साहात साजरा झाला असता.
.... एकदा शिकागोमध्ये एक मोठा टॅलेंट शो आयोजित केला गेला होता. मायकेल जॅक्सन त्या वेळी खूप लहान होता. तो आणि त्याचे भाऊ कार्यक्रमासाठी मेकअप रूममध्ये तयार होत होते. त्याच वेळी दोन गौरवर्णीय कलाकार आपल्या भावांची कुचेष्टा करत उभे असलेले मायकेलला दिसले. ‘कृष्णवर्णीय कसे अडाणी असतात, त्यांना गाण्यातलं काय ढेकळं कळतं?’ असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. मायकेलला काहीच क्षणात स्टेजवर जायचं होतं. पण त्या गोर्यांचं बोलणं त्याच्या जिव्हारी लागलं. आपण कृष्णवर्णीय आहोत हा आपला दोष आहे का असा त्याच्या बालमनाला प्रश्न पडला. अपमान आणि कुचेष्टा सहन न होऊन तो हमसून हमसून रडायला लागला. त्याच वेळी तिथे असलेल्या त्याच्या वडलांनी त्याला जवळ घेत समजवलं. यशस्वी होताना असे अनेक काटे पदोपदी बोचणार याची जाणीव त्याला करून दिली. वडलांच्या शब्दांनं मायकेल क्षणात शांत झाला आणि दुसर्याच क्षणी आपले डोळे पुसून जणू काही घडलंच नाही अशा रीतीनं स्टेजवर असा काही गायला आणि नाचला की ते दृश्य बघून सगळेच चकित झाले.
पॉप सम्राट मायकेल जॅक्सन हे संगीतातलं एक विलक्षण व्यक्तिमत्त्व! मायकेल जॅक्सननं आपल्या संगीतानं आबालवृद्धांना वेड लावलं नाही तर त्याची हॅट, त्याचे शर्ट्स, त्याची पँन्ट, त्याचे बूट, त्याचं जॅकेट आणि त्याच्या अंगठ्या या सगळ्यांचीच एक फॅशन झाली होती आणि त्याचं अनुकरण तरुणाई करायला लागली होती. मायकेल जॅक्सननं कृष्णवर्णीय तरुणांना प्रचंड आत्मविश्वास दिला. कायम उपेक्षा झालेल्या, अव्हेरल्या गेलेल्या आणि हे जग तुमच्यासाठी नाही असा न्यूनगंड मिळालेल्या कृष्णवर्णीय तरुणांना, ‘हे जग आपलं असून ते आपण बदलू शकतो’ असं आपल्या बंडखोर गाण्यांमधून मायकेल जॅक्सन सांगत राहिला.
मायकेलनं धर्म, भाषा, प्रांत, रंग यांच्यातले भेद आपल्या कलेतून मिटवण्याचा प्रयत्न केला होता. जगभरातल्या लाखो करोडो चाहत्यांच्या गळ्यातला तो ताईत बनला होता. २५ जून २००९ या दिवशी दुपारी तीन वाजता पॉप संगीताचा बादशहा मायकेल जॅक्सन या जगातून कायमचा निघून गेला. त्याच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते, ‘अमेरिकन तरुणांचा आयकॉन असलेला मायकेल जॅक्सन याच्या कलेनं माणसाला वर्ण, धर्म, लिंग, आणि राष्ट्र यांच्या पलीकडे नेण्याचं काम केलं. त्याच्या गाण्यानं आणि नृत्यानं माणसाचं जगणं सुंदर केलं. त्याच्या अकाली जाण्यानं पॉप संगीतातली एक जादू देखील कायमची संपली. काळ्यागोर्याचा भेद संपवणारा एक थोर कलावंत आपल्यातून निघून गेला.’
दीपा देशमुख
२९ ऑगस्ट २०१७.
Add new comment