अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल
मेरे पिया गये रंगून, किया हे वहाँसे टेलिफोन
तुम्हारी याद सताती है, जियामे आग लगाती है....
१९४९ साली प्रदर्शित झालेल्या ‘पतंगा’ या चित्रपटातल्या गाण्यानं त्या काळी अक्षरशः धुमाकूळ घातला आणि आपल्या जीवनात टेलिफोननं! टेलिफोनचं सुधारित रूप म्हणजे मोबाईल, ज्याच्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणार्या टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल हा एक स्कॉटिश संशोधक होता.
टेलिफोन हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आला आहे. त्याचा शब्दश: अर्थ म्हणजे दूर अंतरावर आवाज पोचवणं! ‘टेलिफोन’ या शब्दाचा वापर प्रथमत: १७९६ मध्ये जर्मनीत केला गेला. चार्लस् व्हीटस्टोन आणि बेलचा समकालीन एलिशा ग्रे यांनीही टेलिफोनच्या शोधात खूप मोठी मजल मारली होती. मात्र बेलचा पेटंटविषयक अर्ज ग्रेच्या अर्जाच्या फक्त काही तासच आधी पोचला. पण त्या काही तासातच बेल आणि ग्रे यांची आयुष्यं पूर्ण बदलून गेली!
३ मार्च १८४७ या दिवशी स्कॉटलंडमध्ये एडिंबरा या ठिकाणी अॅलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा जन्म झाला. बेलच्या वडिलांनी बहिर्या मुलांसाठी ‘दृश्य भाषा’ या नावाची एक पद्धत सुरू केली होती. बेलची आई एलिझा हिला नीट ऐकायला येत नसे. तिला ऐकू यावं यासाठी बेल आपल्या ओठांच्या हालचाली करून आणि हातांचा वापर करून अक्षरांचा अंदाज एलिझाला देत असे. वेगवेगळ्या चमत्कारिक गोष्टी यांचा शोध घेणं तसंच बोलण्याची वेगवेगळ्या प्रकारची यंत्रं तयार करणं यात बेलला शाळेतल्या अभ्यासापेक्षा जास्त रस होता. त्यामुळे बेल १४ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी एडिंबरोच्या शाळेमधून बेलचं नाव काढून घेतलं आणि त्याला लंडनमध्ये असलेल्या त्याच्या आजोबांकडे पाठवलं. आजोबांकडे असताना बेल संगीत शिकला. तसंच बेल धडाधड शेक्सपिअरच्या स्वगताचे उतारेच्या उतारे म्हणून दाखवायचा.
या सगळ्या काळात बेल कुटुंबावर अनेक संकटं आली. आपण वडिलांवर आर्थिक भार टाकू नये यासाठी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी बेलनं एका शाळेत वर्षाला २५ पौंड पगारावर नोकरी पकडली.
याच वेळी एकीकडून दुसरीकडे आवाज कसा नेता येईल याविषयी बेलचा अभ्यास सुरू झाला. पण त्यासाठी विजेविषयीचा अभ्यास असणं आवश्यक होतं. बेलचा विजेविषयी अजिबात अभ्यास नव्हता. त्यानं ‘हार्मोनिक टेलिग्राफ’ तयार करायचं ठरवलं. या हार्मोनिक टेलिग्राफची कल्पना साधीच होती पण ती व्यवहारात आणणं कठीण होतं. टेलिग्राफला तारेतून आत्तापर्यंत फक्त डॉट (.) आणि डॅश (-) याच भाषेतून विजेचे संकेत पाठवले जात असत. पण यांच्याऐवजी जर आवाज पाठवला तर काय होईल याचा बेलनं या हार्मोनिक टेलिग्राफमध्ये विचार केला होता. बेलनं टेलिग्राफचा अभ्यास करून त्यात सुधारणा आणि बदल करायचं ठरवलं. मात्र एकाच वेळेला अनेक गोष्टींच्या मागे लागल्यानं त्याचा हार्मोनिक टेलिग्राफ मधला रस अचानक कमी झाला. टेलिफोन सोडून तो मोनोमॅट्रिक कॅपसुल आणि फोनोग्राफ या दोन उपकरणांच्या मागे लागला. या दोन्ही उपकरणांचा बहिर्या मुलांना बोलताना शब्दांना आकार देण्यासाठी उपयोग होणार होता. बहिर्या मुलांना जे शब्द उच्चारायचे आहेत ते शब्द त्यांना ‘दिसले’, तर त्यांना ते उच्चारणं सोपं जाईल - हीच या दोन उपकरणांमागची कल्पना होती. या काळात बेलनं पहिला मेटल डिटेक्टरही शोधला.
बेलचे प्रयोग सुरू असताना आवाज आणि वीज यांच्यामधला संबंध त्याला प्रथमच जाणवला होता. आवाज आणि वीज दोन्ही ऊर्जाच आहेत. पण फक्त त्याचं स्वरुप वेगळं असतं असं बेलला वाटलं. आवाजानं कानाचा नाजुक पडदा कंप पावतोच तसंच त्यानं कानातली तुलनेनं जड असणारी हाडंही हलतात हे बेलला माहीत होतं. आता हे सर्व समजा एका विजेच्या सर्कीटमध्ये जोडलं तर या हालचालीप्रमाणे विजेचा प्रवाह कमी जास्त करणं शक्य होईल; म्हणजे आवाजाच्या चढउताराप्रमाणे विजेच्या प्रवाहात चढउतार होईल. हा विजेचा बदलता प्रवाह दूर अंतरावर नेऊन त्याचं परत आवाजाच्या चढउतारात रुपांतर केलं की झालं काम असं बेलला वाटत होतं. थोडक्यात, १८७४ च्या जुलैमध्ये टेलिफोनचं हे मूलतत्व बेलला सापडलं होतं!
मे १८७५ मध्ये बेलला शाळेतली नोकरीही सोडावी लागली होती. मात्र हार्मोनिक टेलिग्राफवर काम करणं बेलसाठी आवश्यक होतंच. बेल आणि त्याचा सहकारी वॉटसन अक्षरश: रोज १८ तास प्रयोगशाळेत काम करत. १८७६ च्या मार्चमध्ये बेल आणि वॉटसन यांचे प्रयोग सुरू असताना अचानक ‘वॉटसन इकडे ये, मला तुझी गरज आहे.’ हे बेलनं उच्चारलेले शब्द दुसर्या खोलीत असलेल्या वॉटसननं ऐकले. बेलनं दुसर्या खोलीत उच्चारलेले शब्द चक्क एका तारेवाटे वॉटसनपर्यंत पोहोचले होते आणि वॉटसनला ऐकूही आले हेाते. जगातलं ते टेलिफोनवर केलेलं पहिलंवहिलं संभाषण होतं!
सुरूवातीच्या काळात टेलिफोनचं प्रात्यक्षिक बेलनं युरोप आणि अमेरिका इथे करायचं ठरवलं. पहिलं प्रात्यक्षिक लवकरच फिलाडेल्फियात भरणार्या जागतिक प्रदर्शनात करायचं ठरलं. उद्घाटनाच्या दिवशी आकर्षक आकाराचा टेलिफोन बनवून बेल एका टेबलापाशी बसला. गंमत म्हणजे येणार्या जाणार्या हजारो लोकांपैकी एकाही माणसानं बेल आणि त्याच्या टेबलावरच्या टेलिफोनकडे ढुंकूनही बघितलं नाही.
त्या प्रदर्शनाला ब्राझीलचे राजाराणी, विजेच्या घंटीचा शोध लावणारा प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ हेन्री आणि सर विल्यम थॉमसन भेट देणार होते. नेमकी त्याच क्षणाला हॅालमध्ये गडबड सुरु झाली. ब्राझीलचा सम्राट ‘दुसरा डॉम पेड्रो’ हा त्याच्या लवाजम्यासकट हॉलमध्ये आला आणि अचानक बेलच्या टेबलासमोर येऊन उभा ठाकला! बेलनं लगेच टेलिफोनचा रिसीव्हर पेड्रोला दिला आणि तो कानाला लावून ऐकायला सागितलं. दुसर्या टोकाला बेलनं ‘टु बी ऑर नॉट टु बी’ हे शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातले अमर झालेले शब्द हळूच बोलून नंतर पेड्रोला विचारलं,‘तुम्हाला त्यातून काही ऐकू येतयं का?’ पेड्रोला ते शब्द चक्क ऐकू आले होते. ‘अरे बापरे! हे यंत्र चक्क बोलतंय!’ असं तो चक्क किंचाळायला लागला.
त्या क्षणापासून बेलचा टेलिफोन म्हणजे त्या प्रदर्शनातल्या चर्चेचा प्रचंड मोठा विषयच होऊन गेला. प्रोफेसर हेन्रीनं त्या टेबलापाशी जाऊन त्या उपकरणासाठी तासन्तास काढले आणि परीक्षकांनी देखील टेलिग्राफनंतरचा तो जगातला सर्वात मोठा शोध असल्याचं मान्य केलं! त्या प्रदर्शनात आलेल्या सर विल्यम थॉमसननं बेलची भरभरून प्रशंसा केली. पुढे सर विल्यम थॉमसननं युरोपमधल्या टेलिफोनच्या प्रसारात खूप मोठा हातभार लावला.
नंतर मग बेल आणि वॉटसन यांनी बॉस्टन आणि मॅसॅच्युसेटस मधल्या इतर ठिकाणीही टेलिफोनची प्रात्यक्षिकं केली. बॉस्टन ग्लोब या वर्तमानपत्रात त्याबद्दल बातम्या छापून आल्या आणि बेल रातोरात स्टार झाला. यानंतर बेलनं ‘बेल लॅबोरेटरीज’ नावाची कंपनी सुरु केली. वॉटसनही नोकरी सोडून त्याच्याबरोबर सामील झाला. वॉटसन लोकप्रिय अमेरिकन गाणी टेलिफोनद्वारे गाऊन एकत्र धमाल उडवून देई. वॅाटसननं दुरून गायलेली गाणी आणि इतर वाद्यं हॅालमध्ये बसणार्यांना ऐकू येत. एवढ्या दुरून फक्त तारेतून दुसर्याचा आवाज कसा ऐकू येणं शक्य आहे असंच सगळ्यांना वाटायचं. एवढंच नव्हे तर ‘टेलिफोन म्हणजे सैतानाचंच काम आहे’ असं काही वर्तमानपत्रांतही छापून आलं होतं.
टेलिफोनचा शोध लागल्यावर १ वर्षानंतर व्हाईट हाऊसमध्ये टेलिफोन बसवला गेला. रुदरफोर्ड हेस या अमेरिकन राष्ट्राध्यक्षानं पहिल्यांदा फोन वापरला. ३ एप्रिल १८७७ मध्ये टेलिफोनचा वापर वृत्तपत्रासाठी बातमी मिळवण्यासाठी प्रथमच केला गेला. जून १८७७ मध्ये एक टेलिफोन एक्सचेंज बॉस्टनमध्ये सुरु करण्यात आलं. या सगळ्या यंत्रणेत आपल्याला फोन आलाय हे माणसाला कळण्यासाठी, जेव्हा फोन येईल तेव्हा एक घंटा वाजण्याची पद्धत वॉटसननं शोधून काढली. तसंच फोनवरचं बोलणं झालं की तो रिसीव्हर ठेवण्यासाठी बेल आणि वॉटसन यांनी हूकसारखी एक यंत्रणा तयार केली. त्यामुळे फोन संपल्यावर या हूकवर रिसीव्हर अडकवल्यानंतर फोनकॉल आपोआप बंद होण्याची सोय झाली.
९ जुलै १८७७ रोजी ‘बेल टेलिफोन कंपनी’ची स्थापना झाली आणि टेलिफोनचं जाळं ब्रिटनमध्येही पसरलं. अमेरिकेत या काळात १८७८ मध्ये कनेटिकटमध्ये ५० नावं असलेली पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रसिद्ध झाली. टेलिफोनच्या शोधानंतर टेलिफोन एक्स्चेंजचा शोध हा अतिशय महत्वाचा टप्पा होता. एमा नट ही तरुणी बेल टेलिफोन कंपनीची आणि जगातलीही पहिली स्त्री टेलिफोन ऑपरेटर ठरली. स्वयंचलित टेलिफोन एक्स्चेंज येईपर्यंत टेलिफोन ऑपरेटर ही फारच महत्त्वाची व्यक्ती असे. १८८१ सालच्या जानेवारीत महिन्यात बॉस्टन आणि प्रॉव्हिडन्स ही एकमेकांपासून ४५ मैल दूर असलेली शहरं टेलिफोननं जोडली गेली. बेल कंपनीची टेलिफोनविषयीची दोन पेटंट्स ३० जानेवारी १८९४ या दिवशी सर्वांना खुली झाली. बेल टेलिफोन सुरवातीला आल्यानं तो समाजातल्या उच्चवर्गीयांकडेच होता.
अखेरीस २५ जानेवारी १९१५ रोजी न्यूयॉर्क आणि सॅनॉन्सिस्को यांना जोडणार्या टेलिफोनच्या तारेचं उद्घाटन झालं. त्या टेलिफोन्सवर न्यूयॉर्कवरून बेल तर सॅनफ्रॅन्सिस्कोवरून वॉटसन बोलत होता. टेलिफोनचा प्रसार आणि प्रगती अमेरिकाच नव्हे, तर युरोपमधल्या सर्व देशांत कमी अधिक प्रमाणात सुरु झाली होती. १६ जुलै १९१८ मध्ये टेलिफोनच्या राष्ट्रीयीकरणाचं बिल पास झालं. टेलिफोनच्या शोधानं सर्व जग प्रचंड जवळ आणलं होतं.
टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्रॅहेम बेलचा मृत्यू ४ ऑगस्ट १९२२ या दिवशी झाला. तेव्हा केवळ त्याला आदरांजली म्हणून सार्या अमेरिकेतले आणि कॅनडातले सर्वच्या सर्व फोन एक मिनीट बंद ठेवण्यात आले होते. एरवी हजारो लाखो आवाजांनी आणि घंटांच्या नादानी किलबिलून टाकणारे असंख्य फोन ४ ऑगस्ट १९२२ रोजी मूकपणे आपल्या जनकाला श्रद्धांजली वाहात होते!
२०१० सालानंतर भारत सरकारनं अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल याच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतातल्या आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रातल्या संशोधकांना प्रोत्साहित करण्यासाठी बेलच्या नावानं पुरस्कार द्यायला सुरुवात केली. महेंद्र टेक कंपनी, डाटा इन्फोसिस, सीडीओटी, इन्फोसिस या कंपन्यांनी ही पारितोषिकं पटकावली आहेत. १९३९ साली ‘द स्टोरी ऑफ अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल’ हा आयुष्य आणि कार्य यावर चित्रपट बनवण्यात आला. तसंच १९९२ साली ‘द साउंड अँड द सायलेन्स’ हा दूरदर्शननं माहितीपट बनवला.
Add new comment