मी चित्रकार, पाककलातज्ज्ञ, सौंदर्यतज्ज्ञ आणि लेखकू व्हायचं ठरवते तेव्हा......हितगुज
तसं मी बरंच काही व्हायची स्वप्नं बघत असते. मी लैच आशावादी, सकारात्मक विचारांची व्यक्ती आहे. म्हणजे जसं की मी चित्रकार व्हायचं ठरवलं. मला चांगल्यापैकी नारळाचं झाड, ती कात्रीनं कापल्यासारखी तिरपट पानं, त्रिकोणी आकाराचे तीन-चार डोंगर, त्यातून उगवणारा किंवा मावळणारा सूर्य, आकाशात चार आकड्याच्या आकाराचे पक्षी उडताना आणि डोंगरासमोर उतरतं छप्पर असलेली झोपडी, समोर वाकडीतिकडी पाऊलवाट....असं चित्र काढण्यात माझा हातखंडा होता. आहेच काय कठीण त्यात? असं मला वाटायचं. या चित्रात डमरूला हातपायाच्या काड्या काढून वर एक गोल ठेवला की मुलं-मुलीही तयार व्हायची. त्यांच्या हातात फुगे दिले की ती बिचारी आनंदून जायची. आपण मोठेपणी चित्रकारच व्हायचं असं मी मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं. पण हाय रे माझ्या कर्मा! चित्रकलेच्या तासाला एकदा बाईंनी आम्हाला मुक्तहस्त चित्र काढायला सांगितलं. मला वाटलं मुक्त हस्त म्हणजे मनाला येईल तसा हात फिरवत चित्रं काढायचं. पण बाईंनी चित्रांचा अर्धा भाग काढला होता आता त्याच्याच बाजूला दुसरा भाग जशाला तसा काढायला सांगितला .....खूप प्रयत्न करूनही ते काही केल्या जमेना......मग बाईंनी मला वस्तूनिष्ठ चित्र काढायला सांगितलं. समोरच्या टेबलावर तांब्या, फुलपात्र, फ्लॉवरपॉट अशा बर्याच काही वस्तू ठेवल्या होत्या. त्या बघून जशाच्या तशा रेखाटायच्या होत्या. पण माझे आकार असे काही विचित्र येऊ लागले की अमिबासुद्धा लाजेल. त्यातच माझं चित्र बघून बाईंचा आणि इतर मुलींचा जो चेहरा झाला तो विसरण्याजोगा नव्हता. मग मी सरळ चित्रकलेचा नादच सोडून दिला.
आता काय शिकावं अशा विचारात असतानाच ‘आधी स्वयंपाक करायला शिका, नाहीतर नवर्याच्या घरी माझ्या नावाचा उद्धार होईल’ अशी दमदाटीवजा आईची बोलणी कानावर पडली. मग म्हटलं, 'ठीकय. हे स्वयंपाक करणं म्हणजे दायेबाये हात का खेल है. यात काय एवढं?' मी अति आत्मविश्वासानं स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. आईनं काही सूचना करायच्या आतच मी तिला ‘मला सगळं येतं, तू बाहेर जा’ असं सांगितलं. आता स्वयंपाकघर, त्यातले खचाखच सामग्रीनं भरलेले डबे आणि मी एवढेच काय ते होतो. राज्य माझ्या ताब्यात होतं. आईनं पोळ्यांची कणिक मळून ठेवलेली होती. ओट्यावर नुकतीच फ्रिजमधून काढून ठेवलेली भेंडी दिसत होती. मी आधी पोळ्या करायला घेतल्या. त्या कधी पोळपाटाला चिटकत होत्या, तर कधी तव्यावर टाकायच्या आधीच मी पोळीच्या डब्यात त्यांना टाकत होते. मग पुन्हा उचलताना नवीच कसरत करावी लागत होती. तवा जास्त तापल्यानं पोळ्या करपत होत्या त्या वेगळ्याच. एकाच वेळी लाटायचं आणि भाजायचं हे काम म्हणजे अन्यायकारक आहे असंच मला वाटायला लागलं. कशाबशा वेगवेगळ्या अनेक देशांचे आकार निर्माण करत मी त्या पोळ्या करणं संपवलं. कदाचित गडबडीत आईला कणिक नीट मळता आली नसावी. होतं कधी कधी ....आता माझ्यासमोर हिरवीगार, ताजी ताजी भेंडी मला खुणावत होती. मी छानपैकी तिच्या गोल गोल चकत्या केल्या आणि आता स्वच्छ धुवून घेऊया म्हणून नळाखाली चाळणी पकडली. आपण खूपच स्वच्छताप्रिय आहोत या समाधानानं मी गॅसवर निर्लेपचा पॅन ठेवत फोडणी तयार करून स्वच्छ धुतलेली आणि कापलेली भेंडी त्यात टाकली. काय झालं कुणास ठाऊक पण एकप्रकारचा चिकट लोळ तयार झाला. कितीही हलवलं, कितीही गॅस मोठा केला तरी ती चिकट तार जाण्याचं नाव घेईनाशी झाली. कदाचित ती भेंडीच बरोबर नसावी असं म्हणत मी त्यात तिखट-मीठ-हळद टाकून एकदाचा गॅस बंद केला. 'आज वरणभाताला सुट्टी पोळी भाजी तैयार है' असं म्हणत डायनिंग टेबलवर आणून ठेवली. घरातले सगळे कौतुकानं माझ्याकडे बघत जेवायला बसले. पोरीला चांगलं वळण लागतंय असे सात्विक भाव त्यांच्या चेहर्यावर झळकू लागले. मात्र पोळीचे आकार आणि भाजीची तार बघून त्यांचे चेहरे बघता बघता बदलले. कुठला बिकट प्रसंग ओढवण्याआधी मी तिथून पळ काढला हे सांगायला नकोच!
त्या दिवसानंतर मी कधीही स्वयंपाकघरात पाऊल टाकायचं म्हटलं की आईचे डोळे आपोआप वटारले जात. मलाही फार काही उल्हास नव्हताच. मग मी आईच्या मागे लागून मी ब्युटीशियनचा कोर्स करते असं सांगितलं. तिनेही आनंदानं परवानगी दिली. माझा क्लास सुरू झाला. सुरुवातीला शिकत असलेली थिअरी माझ्या डोक्यावरूनच गेली. त्यानंतर प्रॅक्टिकल सुरू झालं, तेव्हा मात्र मी गोंधळात पडले. रस्त्यावर कागदं, कचरा उचलणार्या मुली मला आठवायला लागल्या. त्यांच्या केसांच्या बटा आणि जटा मला दिसू लागल्या. अनेक दिवस तेल न लावलेले आणि निगा न राखलेले ते केस पिवळट तांबूस झालेले मला आठवले. इथं अनेक बायामाणसं मुद्दाम कुठलीतरी रसायनं डोक्यावर थापून त्या कचरावाल्या मुलींप्रमाणे केसांचे रंग बदलताना दिसली. कशासाठी हे काही मला कळलं नाही.
त्यानंतर इथं बेसनपीठ, बदाम, फळांचे रस, गुळाचा पाक, काकडी, हळदीकुंकवाला शिंपडतो ते गुलाबपाणी अशा गोष्टी मला दिसायला लागल्या. .'या बेसन पिठाची भजी करणार आहे की काय इथली बया?' असा मला प्रश्नच पडला. समोरची काकडी ...छान पातळ पातळ चकत्या केलेली बघून त्यावर मीठ टाकून खाण्याचा मोह मला आवरता येईना. मात्र माझ्या अगाध ज्ञानाचा सुतोवाच करताच समोरची बया आपल्या बारीक भुवया आणखीनच वक्र करत माझ्यावर डाफरली. 'हे सगळं खाण्यासाठी नसून चेहर्यावर लावण्यासाठी आहे' असं तिनं मला सांगितलं. त्या गुळाच्या पाकरूपी रसायनानं तिनं वॅक्सिंग कसं करायचं याचं प्रात्यक्षिक एकीवर द्यायला सुरुवात केली.....हे राक्षसी अघेारी प्रकार बघून मला चक्कर यायचं बाकी राहिलं, मी तिथून जराही मागे न बघता पळ काढला.
आता कुठलं क्षेत्र आपल्यासाठी योग्य आहे याचा मी विचार करू लागले आणि मला लेखनाचं क्षेत्र खुणावू लागलं. जरा गुगलवर सर्च मारल्यावर मोठमोठे गंभीर चेहर्यांचे लेखक मला फोटो के साथ दिसायला लागले. त्यांच्याच रांगेत मी जाऊन बसले आहे असाही भास मला होऊ लागला. हे क्षेत्र बरं आहे. एखादा विषय निवडायचा आणि त्यावर अगम्य भाषेत काहीतरी लिहून काढायचं. लोकांना समजलं नाही तर आपण जिंकलो. मग आपण मोठे विचारवंत, ज्ञानी लेखक म्हणून प्रसिद्ध पावू ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मी लगेचच उत्साहानं कागदाचे ताव आणि दोन-चार पेन विकत आणले. खरं तर प्रसिद्ध लेखकमंडळी म्हणे थंड हवेच्या ठिकाणी खास लिखाणासाठी जात असत. मला तशी संधी घरातले मुळीच उपलब्ध करून देणार्यातले नव्हते. त्यांना माझी किंमतच अजून कळलेली नाही असा उदात्त विचार करून मी आहे त्याच ठिकाणी लिखाण करायचं ठरवलं.
लिखाणासाठी विषय काय निवडावा यासाठी मला जरा डोक्याला ताण द्यावा लागला. मग पुन्हा मी गुगलला शरण गेले. कविता या विषयावर लेखन करावं असं मी ठरवलं. शाळेत शिकवलेल्या काही कविता पुसटशा आठवत होत्या, पण पूर्णपणे नाही. मग आपल्या मनानेच कवितेवर लिहायचं मी ठरवलं. यू टयूबवर विंदा करंदीकर, नारायण सुर्वे अशी मंडळी मला कविता वाचताना दिसू लागली. त्यात मला रामदास विसरले ही कवी व्यक्ती फारच भावली. या बाकी मंडळींपेक्षा हिची श्रेष्ठता जास्तच आहे असं माझं मन मला सांगू लागलं. मग एका सेकंदात मीही कवी झाले. मी लगेचच एक शिघ्र कविता करून टाकली.
मी आहे कवी, मी आहे कवी
ओळखतो मला शेजारचा रवी
अरे वा, कविता करणं फारच सोपं आहे.
आई, आई करू नको घाई
स्वयंपाकाला येणार आहे बाई
वा, वा आपल्याला ते काय साहित्य अकादमी वगैरे कायतरी असतंय ते मिळणार म्हणायचं बहुधा!
अशा पाच-दहा कविता एका झटक्यात मी लिहून काढल्या आणि कवितेवर विश्लेषणात्मक माझे विचारही थोडक्यात लिहिले. त्यात कविता ही नदीसारखी असते....वाहत जाते वाहत जाते....उन्हाळ्यात ती आटते. कविता ही कोणालाही करता येत नाही. ती फक्त प्रतिभा नावाच्या व्यक्तीलाच प्रयन्न होते. (माझं नाव आईनं प्रतिभा ठेवल्याचा आनंदही मला त्या वेळी झाला.) आपल्याला जे काय सांगायचंय ते सांगता येत नसल्यास कविता करावी आणि समोरच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवावं....असं आणखी काहीबाही लिहून मी माझं लेखन संपवलं.
दुसर्या दिवशी घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र करून मी काल्पनिक व्यासपीठावर जाऊन काल्पनिक माईक हातात घेतला. काल्पनिक पुष्पगुच्छानं मीच माझं स्वागत करून घेतलं आणि त्यानंतर मी आता लेखकू होणार असल्याचं जाहीर केलं. माझी पहिली साहित्यकृती बाहेर येतेय, श्वास रोखून बसा असं म्हणत मी माझ्या पाच-दहा कविता आणि विश्लेषणात्मक विचार वाचून दाखवले. माझं वाचन संपताच मी विजयी मुद्रेन वर मान केली. मात्र त्या वेळी हॉलमध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. माझं लेखकू होणं या व्यक्तींना बहुदा मानवलं नव्हतं. कोणी चांगलं करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचं नाही, त्याचे पाय मागे खेचायचे ही आपली भारतीय मानसिकता आहे असं काहीतरी आठवून मी मनाची समजूत घातली आणि आता आपण नवीन कुठलं क्षेत्र निवडावं बरं हा विचार मी करू लागले....तुम्हाला सुचतंय का काही?
दीपा देशमुख, पुणे
Add new comment