उंदराची शेपटी आणि जावेद हबीब

उंदराची शेपटी आणि जावेद हबीब

तारीख

उंदीरसुद्घा माझ्या केसांपुढे दिमाखात आपली शेपटी नाचवत फिरेल, असे माझे छटाकभर केस...त्यातच कोरोना काळात मला हुक्की आली, की आपण आपला हा विपुल केशसंभार आणखी वाढवूया. केस चांगले वीतभर वाढले, पण रोज प्रत्येक रुममध्ये प्राजक्ताच्या फुलांसारखा सडा पडायला लागला. त्यातच नुकतीच नव्‍यानं मिळालेली एक मैत्रीण काल काही वस्तू द्यायला माझ्याकडे आली. कोरोनामुळे मास्क लावलेल्या अवस्थेत ती गाडीत आणि मी गेटजवळ अशा भेटलो. वस्तू आणि गरमागरम मटार करंज्या देवून ती काहीच वेळात गेली. पोहोचल्याचा फोन करत तिनं मला आदेश दिला, ‘अग, कशी आजारी पडल्यासारखी दिसते आहेस दीपा? ताबडतोब हेअर कट कर.  हेअर कट करायला माझी हेअरड्रेसर पाठवू का?’ मी ‘नको नको’ असं कोरोनाच्या भीतीनं म्हणत ‘उद्याच मी हेअर कट करते’ असं सांगितलं.
सुवर्णसंध्या या माझ्या सल्लागार मैत्रिणीनं ग्रीन सिग्नल देताच मी अपूर्वसह जावेद हबीबकडे पोहोचले. पीपीई किटमधले कोरोनायोद्घे तिथे स्वागताला उभे होते. कोण स्त्री, कोण पुरुष काहीही कळायला मार्ग नव्‍हता. अर्थात कळून घेण्यात काही रसही नव्‍हता. 

अपूर्वचे केस कापणारा सुमीत यानं मला खूण करताच मी समोरच्य खुर्चीत जाऊन बसले. एखाद्या गोष्टीतलं कौशल्य तुम्ही मन लावून आत्मसात केलं असेल तर ते तुमच्या कृतीतून लक्षात येतं. सुमीतनं माझ्या ५० ग्रॅम केसांकडे बघत किती केस कमी करायचे याचा निर्णय घेतला. केसांना खेचत ओढत दुखावत तो कधीच काम करत नाही. अतिशय हळुवारतेनं त्यानं केसांच्या बटा घेत चिमटे लावले. काही वेळा साडीच्या दुकानात जावं, तेव्‍हा साड्या दाखवणारा तुमची उंची कमी तुम्हाला अमूक साडी चांगली दिसणार नाही म्हणतो, किंवा एखादी ओळखीची कोणीएक भेटल्यावर, ई किती केस पातळ ग तुझे असं म्हणते. पण हा सुमीत कधीही माझ्या ५० ग्रॅम केसांविषयी मला न्यूनगंड देत नाही. उलट तुमचे केस किती स्ट्रेट आहेत, सिल्की आणि सॉफ्ट आहेत असंच म्हणतो. खरं तर आपल्यातल्या उणिवा, कमतरता आपल्याला ठाऊक असतातच, पण त्याचा इश्यू न करता समोरच्याशी वागणं हेही कौशल्याचं काम आहे आणि ते त्या सुमीतच्या बोलण्यातूनच नाही तर कृतीतूनही प्रत्येक वेळी जाणवतं. 

सुमीत ज्या कौशल्यानं माझे केस कापत होता, त्या वेळी मला मी लहानपणात गेल्याचा भास झाला. लहानपणी माझी अंबुआत्या माझ्या दोन वेण्या घालून द्यायची. तिरपा भांग असल्यानं एक वेणीचे पेड जाड आणि दुसऱ्या वेणीचे पेड पातळ यायचे. मग मी निषेध नोंदवायची आणि आत्या न कंटाळता पुन्हा काहीतरी शक्कल लढवून माझ्या दोन्ही वेण्या सारख्या जाडसर दिसतील अशा बेतानं घालून द्यायची. मग रंगाखुश व्‍हायचा.

माझ्या स्वप्नरंजनातून बाहेर आले कारण सुमीत मला ‘झालं’ म्हणून आरसा दाखवत होता, आवडलं का विचारत होता. (जावेद हबीबमध्ये पीपीई कीट, प्रत्येक ग्राहकाला नवीन ॲप्रन, कात्रीपासून हेअरब्रशपर्यंत सगळं काही वेगळं, गडबडीत मी मास्क विसरले होते, तर ताबडतोब मला मास्कही देण्यात आला. बरं ते हातावर फवारण्याचंही तिथं होतंच. त्यामुळे काळजी नसावी.)
मी हसून आरशाकडे बघितलं. मैत्रिणीनं म्हटलेलं आजारपण दूर झालं होतं. मलाच मी फ्रेश वाटले. मी सुमीतला थँक्यू म्हटलं. निघताना पुन्हा एकदा आरशात बघून नव्‍यानं झालेल्या मैत्रिणीला अरुंधतीला आणि सुवर्णसंध्यालाही थँक्यू म्हटलं आणि डौलात तिथून बाहेर पडले.

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.