बघता बघता वर्ष झालं की!!!
आमच्या सजल-अमृता यांचं शुभमंगल!
सकाळी श्रुती मंगल कार्यालय, आपटे रोड इथे पोहोचले आणि गेटमधून दोन पांढर्याशुभ्र गाड्या बाहेर येताना दिसल्या. आतून सजलेला सजल माझ्याकडे बघत ओरडला, दीपाताई, सेंट्रल पार्कला ये....जवळच असलेल्या सेंट्रल पार्कला मी रस्ता क्रॉस करून पोहोचले तर काय तिथे गाडीतून उतरून नवरदेव पांढर्याशुभ्र तगड्या घोड्यावर विराजमान झालेले! (घोडा जास्त देखणा की सजल असा मला क्षणभर प्रश्न पडला!) समोर सगळे नातेवाईक, मित्र आनंदानं नाचताहेत. यात सजलचे बाबाही मागे नव्हते. सजल एकदम राजबिंडा दिसत होता....आमची ही मिरवणूक वाजतगाजत श्रुती मंगल कार्यालयात पोहोचली, तर प्रवेशद्वाराजवळ प्रधान कुटुंबीयातल्या स्त्रिया सजलला औक्षण करायला उभ्या होत्या. आम्ही हॉलमध्ये पोहोचलो, तर हॉल सुंदर रेशमी वस्त्रांनी नटलेल्या स्त्री-पुरुषांनी खच्चून भरलेला!
नवरीच्या रुपातली अमृता खरोखरंच परीसारखी दिसत होती. मंगलाष्टक सुरू झाली आणि संपली. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले, टाळ्यांच्या कडकडाटात सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. सजल आणि अमृता यांना भेटण्यापूर्वी आम्ही सगळे एकमेकांना भेटलो. कितीतरी दिवसांनी, महिन्यांनी आणि वर्षांनी देखील!
हेमंत शिंदे- बुद्धिमान आणि समंजस ल्योक! फेसबुकवर रोजच भेट होते, पण प्रत्यक्षात झालेली भेट वेगळाच आनंद देऊन जाते हे मात्र खरं. हेमंतनं हातात हात घट्ट धरून ठेवला, तेव्हा वाटलं, अरे खूप दिवस झाले आपण खरेखुरे भेटलोच नव्हतो. हेमंतच्याच बाजूला श्रुती आणि अमित दिसले. श्रुती गळ्यात पडली. सगळे तिला जोशीबाई म्हणतात. आणि अमित हा जाकीट आणि झब्बा यात नेहेमीप्रमाणे स्मार्ट दिसत होता. अमित आणि श्रुती यांची रुहा देखील धारवाडी खणाच्या परकर पोलक्यात नटून तयार होती. माझ्याजवळ चटकन आली, कारण मी तिला ढमढम जिकडे वाजवताहेत तिकडे नेण्याचं कबूल केलं. धनंजय मुळी आणि भक्ती बर्वे समोर आले तर त्या दोघांनाही बघून वाटलं, खूप वर्षं झालीत भेटून. लवकर लवकर भेटायला हवं. खरं तर बाणेरला ही दोघं राहत असताना भेटण्याच्या अनेक संधी होत्या, पण आता तो दूर गेलाय. कसं जमणार कोणास ठाऊक! श्वेता आणि आनंद भेटले. श्वेताकडे बघितलं की नंदिता दासची हटकून आठवण येते. दोघीत साम्य वाटतं ते सावळ्या तजेलदार कांतीचं आणि बुद्धीचं! आनंद श्वेता यांची रेवाही हजर होतीच. सचिन आणि शैलजा भेटले, तेही काही वर्षांनी! शैलजा गोड दिसत होती. अतुल आणि मुक्ता नावरेकर भेटले. दोघंही गुणी आणि गोड! प्राथमिक शिक्षणावर काम करणारी जोडी! प्राजक्ता आणि अभिजीत आले. अभिजीत पहाडासारखा आणि प्राजक्ता नाजूकशा फुलासारखी! दोघांचही अर्थातच लव्हमॅरेज, एक छान समंजस जोडी आणि त्यांचं पिल्लू देखील बरोबर होतंच. आश्विनी महाजन देखील धावतपळत आली. ही एक गोड गोड डॉक्टर मुलगी! नंदाकाका (नंदा खरे) विद्याकाकू आणि अमिताभ लग्नाला आवर्जून उपस्थित होते. हसतमुखानं ते सगळ्यांशी बोलत होते, सगळ्यांचं स्वागत करत होते. नाशिकहून अश्विनी ताई आणि मिलिंद मुरुगकर आले होते. तसच विवेक सावंत, उदय पंचपोर आणि गौतम देखील शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सीए असलेली वेदवती लेले आणि बायफची राजश्री यांची देखील या प्रसंगी भेट झाली.
तेवढ्यात धावतपळत शास्त्र्या आणि तृप्ती आले. कधीही शांतपणे वावर न करणारा शास्त्री आला आणि वातावरण आणखीनच दणाणून टाकलं. तो आल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम संपन्न झालाय असं वाटत नाही. तृप्ती मात्र त्याच्या उलट- एकदम शांत आणि नावाप्रमाणेच तृप्त! प्रज्ञा थोडी उशिरा येणार असल्यानं कल्याण (टांकसाळे) हजर होता. नुकताच वर्ष दीड वर्षांनी परदेशातून आल्यामुळे त्याची भेट जरा दुर्मिळ झाली. कल्याण आणि शास्त्री या दोघांना इतके गुणी जोडीदार (प्रज्ञा आणि तृप्ती!) मिळाले आहेत की बस्स! पीएचडी झालेला शंकर हाही गुणी मुलगा. जास्त बोलका नाही, पण त्याचा शांत वावर खूप काही बोलून जातो. हृषिकेश व्यवसायानं वकील - अतिशय धडपड्या, मेहनती आणि सुस्वभावी. त्याचं असणं सुखावून गेलं. समोर प्रियदर्शन म्हणजेच आमचा पीडी दिसला. अर्थातच त्याच्याबरोबरही गळ्यात पडणं झालं. आमच्या अख्ख्या ग्रुपमधला हा गुणी मुलगा! दिसणं, वागणं, गाणं सबकुछ याला भरभरून मिळालंय. आणि सगळं असूनही डाऊन टू अर्थ! तो आला की वातावरण प्रसन्न होतं. आता तर तो दिसला तरी त्याची गाणी मनात दरवळायला लागतात. सगळ्यांचा लाडका! चारूता गोखले सुरेखशा साडीत मला हात करत होती आणि मी तिला सुरुवातीला ओळखलंच नाही. म्हणजे ती आधीही गोड दिसायची, पण आधी जरा बारीक होती आता अगदी छान वाटत होती. ती नेहमीच प्रसन्न, टवटवीत असते. त्यामुळे तिला भेटून मीही ताजीतवानी होऊन गेले. चारुता अतिशय सुरेख गाते. तेवढ्यात ब्लॅक पेहरावातलं एक जोडपं नजरेला पडलं. काळ्या लखनवी ड्रेसमधली मुक्ता गुंडी आणि काळ्याच शर्टमधला सागर अत्रे! आता नुकतेच दिल्लीला स्थायिक झालेत. मुक्ता आणि सागर दोघंही खूप चांगलं लिहितात. त्यांना भेटूनही दिल एकदम एकदम खुश हो गया. सुखदा तर सावलीसारखी अमृताच्या सोबतच होती. ही देखील आपली एक लईच गुणाची गोड कार्टी आहे. तिचं मालेगावमधलं मुलांचं काम बघायला जायचं आहे. सगळ्यात शेवटी एक देखणं जोडपं धावत आत आलं. तो आमचा लाडकादोडका पवन्या, पिवळ्या रंगाच्या झब्ब्यात खूपच क्यूट दिसत होता! डॉक्टर असला तरी मला मात्र त्याच्यातला चित्रकार आणि एक भाबडा मनस्वी हळवा मुलगा खूप जास्त आवडतो. त्याची जोडीदार शांभवी सिंह ही देखील माझ्या आवडत्या हिरव्या रंगाच्या साडीत त्याच्या तोडीसतोड गोड दिसत होती! दोघांबरोबरची आठवण जेव्हा फोटोत बंदिस्त झाली तेव्हा दिल गार्डन गार्डन हो गया!
आता बोलायचं ते सजल बद्दल! सजल न बोलताही खूप समजून घेणारा मुलगा! कधीही मनात कुठला राग न ठेवणारा, माझ्या प्रत्येक घराच्या शिफ्टिंगच्या वेळी धावत आलेला, माझी सुखदुःख ऐकून घेणारा, प्राण्यांवर प्रेम करणारा...नुसतच प्रेम नाही तर त्यांच्यावर संशोधन करणारा! आमची द्वाड कार्टी त्याला त्याचं प्राणिप्रेम बघून पोळ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आणि अमृता! चित्रकार, आर्किटेक्ट असलेली ही पोर सामाजिक काम तर करतेच, पण त्याशिवाय ती लिहिते देखील उत्तम! गुणी, समंजस, प्रेमळ, कोणालाही न दुखावणारी! आज सजल आणि अमृता यांचं लग्न म्हणजे आमच्यासाठी देखील एक खूप मोठा आनंदाचा क्षण होता. त्या दोघांना सजलेल्या पेहरावात बघून, आनंदी बघून खूप खूप छान वाटत होतं.
आज सगळ्यांना भेटून वाटलं, आपल्याकडे हिरे, माणिक, मोती, पाचू, सोनं-चांदी या पेक्षाही मौल्यवान खजिना आहे! खरं तर तिथून पाऊल निघत नव्हतं, पण दिल पे पत्थर रखकर निघावं लागलं!
सजल आणि अमृता, तुमच्या या पुढल्या प्रवासासाठी खूप खूप आणि खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment