जीवन फुलवणाऱ्या अनोख्या नात्यांचा शोध!

जीवन फुलवणाऱ्या अनोख्या नात्यांचा शोध!

तारीख

थिंक पॉझिटिव्‍ह - दिवाळी 2021 - नातं तुझं नि माझं
आज सकाळीच पुण्याबाहेरचा एक कार्यक्रम होता, तो आटोपून येता येता संध्याकाळ झाली आणि पुढल्या कार्यक्रमांसाठी कसं पोहोचायचं याचा विचार करत असतानाच यमाजीचा फोन आला आणि त्याच्या सोबतीमुळे शनिवारवाड्यावर कसंबसं जाता आलं. शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ नेहमीच उत्साही असलेला प्रभाकर भोसले, नीलेश चौधरी, ममता, रेश्मा, अमृता, अर्चना आणि स्नेही मंडळी प्रतीक्षा करत असलेली दिसली. आज औचित्य होतं - थिंक पॉझिटिव्‍ह दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचं!
प्रभाकर हा हाडाचा कलाकार तर आहेच, पण त्याच्या डोक्यात सतत नावीन्यपूर्ण कल्पना जन्म घेत असतात आणि मग त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. थिंक पॉझिटिव्‍ह दिवाळी अंक आणि मासिक ही त्यातूनच साकारलेली अपत्यं....थिंक पॉझिटिव्‍हचा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रभाकर आणि टीम प्रत्येक महिन्यात निरनिराळे उपक्रम राबवत असते. कधी ते ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात, तर कधी कष्टकरी वर्गाला सन्मानित करण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जातात. 
आजच्या दिवाळी अंकाचं प्रकाशनही तसंच हटके होणार होतं...आम्ही पोहोचताच सगळेजण शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर उभे राहिले, प्रत्येकाच्या हातात थिंक पॉझिटिव्‍हचा अंक होता आणि चेहऱ्यावर दिवाळीचा तेजस्वी आनंद! 
त्याच वेळी माझ्या मनात कवयित्री शांता शेळके यांच्या ओळी किलबिल करू लागल्या:
त्या गावाची गंमत न्यारी
तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाती नाचती, कोणी रडके नाही
या ओळी मनात येण्याचं कारण म्हणजे ‘थिंक पॉझिटिव्‍ह‘ चा दिवाळी अंकाचं हे प्रकाशन कुण्या एका मान्यवराच्या हस्ते होणार नव्‍हतं, तर आम्हा सगळ्यांच्याच हस्ते होणार होतं आणि तसंच झालं. आम्ही सगळेच मोठे होतो आणि सगळेच लहान! मज्जाच मज्जा!
प्रमुख संपादक या नात्याने यमाजी मालकर या मित्राने थिंक पॉझिटिव्‍ह या दिवाळी अंकामागची आपली भूमिका सांगितली. हा अंक वेगळा कसा हेही त्यातून उलगडलं गेलं. अभिजीत, पराग, प्रभाकर यांनी अगदी दोन मिनिटांत अंकाची निर्मिती प्रक्रिया विशद केली. या अंकाचा विषय प्रत्येकाच्या जिव्‍हाळ्याचा - नातं तुझं नि माझं. नात्याची उकल करताना २१४ जण/जणींच्या लेखण्या धावत सुटल्या आणि त्यातून साकारली वेगवेगळी नाती. मग ते नातं जोडीदाराबरोबरचं असेल किंवा आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या बॉसचं असेल, ते नातं मुक्या प्राण्याबरोबरचं असेल किंवा एखाद्या रोजच्या वापरातल्या वस्तूंबरोबरचं असेल....या नात्यांनी नवनवे रंग आयुष्यात भरलेले दिसले आणि ते सगळेच रंग खूप सकारात्मकता देणारे, भरपूर ऊर्जा बहाल करणारे... अगदी निरक्षर असणाऱ्या व्‍यक्‍तींच्या मनातली नाती देखील संपादकीय टीमने त्यांच्याजवळ पोहोचून त्यांच्याशी बोलून शब्दांकन करून यात सामील केली आहेत.
यमाजी मालकर, प्रभाकर भोसले, पराग पोतदार, अभिजीत सोनावणे, नीलेश चौधरी, ममता झांजुर्णे यांच्या परिश्रमातून साकारलेला ‘थिंक पॉझिटिव्‍ह‘चा हा अंक खूपच देखणा झाला आहे. विशेष म्हणजे या अंकाची अनुक्रमणिका - यात सुरुवातीची काही पान त्याचे आणि तिचे म्हणजे लेखकांचे चक्क फोटो आहेत. फोटो खाली नाव आणि लेखाचा पान क्रमांक .. लै लै लै झ्याक वाटलं .. अगदी दहावी, बारावी मध्ये गुणवत्ता यादीत आल्यासारख .. त्यानंतर थिंक पॉझिटिव्ह अंकाचं  मोरपंखी साज चढवलेलं मुखपृष्ठ म्हणजे प्रभाकर भोसलेमधल्या कलाकाराला ‘वा, क्या बात है’ ची दाद देणारं! गुलाबी, तरल, सोन्यासारखं किमती असं नातं साकारण्यासाठी या टीमने दिग्गज लिहिणारे, कधीच न लिहिणारे, अशा सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांच्या भावनांची जपणूक करत या नात्यांचा गोफ विणला आणि तो दिवाळी अंकाच्या रुपात वाचकांसमोर आणला. खऱ्या अर्थाने हा अंक सर्वसमावेशक असा झाला आहे!
मी खूपच उत्सुक आहे, पूर्ण अंक वाचण्यासाठी. आणि हो, माझं माझ्या कँडीबरोबर असलेलं नातंही या दिवाळी अंकात आहे. इतर सगळ्या लेखांबरोबर तुम्ही हे नातंही जरुर वाचा आणि आपापल्या नात्यांचा शोध घ्या.
थँक्यू, यमाजी, प्रभाकर, पराग, अभिजीत, नीलेश, ममता, रिच्या आणि उपस्थित सर्व!
दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.