एकटी स्त्री आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशन!
एक पुरूष हवा आहे
या घराला एक आडदांड पुरूष हवा आहे
बटनं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करत घर डोक्यावर घेणारा
आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून हुशारून जाणारा,
केसातून बोटं फिरली की बाळ होऊन कुशीत घुसणारा,
दमदार पावलांनी तिन्हीसांजेचा केविलवाणा अंधार उधळून टाकणारा
पुरूष हवा आहे
हे मी म्हणत नाहीये,
या घराच्या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून!
नुकतीच कवयित्री अनुराधा पोतदार यांची ही कविता वाचण्यात आली. स्त्रीच्या आयुष्याला पुरूषानं किती व्यापून टाकलंय हे कविता वाचताना लक्षात आलं. स्त्रीच्या बाबतीत तर धर्मग्रंथांमध्येच म्हणूनच ठेवलं गेलं, की लहानपणी वडील, तरूणपणी पती आणि वृद्धावस्थेत मुलाने स्त्रीला सांभाळलं पाहिजे. एकूणच आयुष्यभर ती पुरूषाच्या आधारेच जगली पाहिजे किंवा त्याच्या आधाराविना ती जगू शकणार नाही हे गृहीत धरलं होतं. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने स्त्री घराबाहेर पडली. तिचं एक स्वतंत्र अस्तित्व तयार होऊ लागलं. अनेक प्रश्नांना ती सक्षमपणे सामोरं जाऊ लागली आणि सुरूवातीला पुरुषाचा आधार मागणारी स्त्री स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी सहजपणे करू लागली. आज स्वतंत्र झालेली स्त्री - तिच्या आयुष्याला वळण लागणारा एक महत्त्वाचा टप्पा होता आणि आहे - तो म्हणजे लग्न! त्या लग्नासंबंधीही ती गंभीरपणे विचार करू लागली. जोडीदाराबाबतचे निर्णय स्वत: घेऊ लागली आणि त्यातल्या कोणी रूढींना बाजूला सारून आपण आपलं आयुष्य पुरूषाशिवाय आनंदात काढू शकतो असं स्वतःला जोखलं. व्यक्ती म्हणून उभं राहण्याचा आत्मविश्वास तिला मिळू लागला आणि त्यातूनच एकटं राहून आयुष्य जगण्याचा पर्याय काही प्रमाणात स्त्रिया स्वीकारताना दिसू लागल्या.
अशा एकटं राहणार्या स्त्रियांच्या आयुष्यात पुरुष नाहीत असंही नाही. सहकारी, मित्र, बॉस, भाऊ, वडील अशा वेगवेगळ्या नात्याने ते आसपास आहेत. मात्र आयुष्यभरासाठी लग्नाच्या बंधनात बांधून घ्यायचं की नाही हा निर्णय आजची स्त्री घेत असलेली दिसते. काही प्रसंगी तिला तिच्यातल्या मातृत्वाची ओढही वाटू लागली. मात्र त्यासाठी त्या मातृत्वावर क्लेम करणारा पुरूष तिला नको असल्यास त्यासाठी तंत्रज्ञानानं देऊ केलेल्या सुविधा तिच्या समोर होत्याच. कृत्रिम गर्भधारणा करता येऊ शकते हा पर्याय तिच्यासमोर येताच तिनं त्या पर्यायाचं स्वागतच केलं. आज मोठ्या शहरापासून ते तालुक्यापर्यंत सर्वत्र या सुविधा सहजपणे उपलब्धही झाल्या.
कृत्रिम गर्भधारणा ही अनेक परिस्थितीत स्त्रीला एकप्रकारे वरदान देणारी ठरली आहे. उदाहरणार्थ, एखादी जोडी शारीरिकदृष्ट्या अतिशय फिट असून दोघांमध्येही प्रजननक्षमता उत्तम आहे. त्यांच्यात निरोगी आणि सशक्त स्पर्म आणि अंडी निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र काही कारणांनी ते इंटरकोर्स करू शकत नाहीत. अशा वेळी ही कृत्रिम गर्भधारणा त्यांना अतिशय उपयुक्त ठरू शकते. तर कधी कधी एकट्या स्त्रीला मूल हवंय तेव्हा स्पर्म डोनरद्वारे कृत्रिमरीत्या तिच्यात हे स्पर्म इन्सर्ट करून गर्भधारणा करता येऊ शकते. अनेकदा स्त्रीला अनेक गर्भधारणेसंबंधी समस्या असतात. कधी कधी तर गर्भ फेलोपियन ट्यूबमध्येच वाढायला लागतो आणि परिणामी गर्भपाताची शक्यता वाढते. अशा स्थितीत कृत्रिम गर्भधारणा ही या परिस्थितीत यशदायी ठरते. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या स्त्रीला अशा स्पर्म (सिमेन) ची ऍलर्जी असू शकते. त्या स्पर्ममधले काही प्रोटिन त्या स्त्रीमध्ये ऍलर्जिक रिऍक्शन निर्माण करू शकतात. अशा वेळी टेस्टट्युब बेबीचा पर्याय वापरता येऊ शकतो. कधी कधी तर त्या स्त्रीचा जोडीदार गर्भधारणेइतपत स्पर्म तयार करण्यात अयशस्वी ठरतो. तर कधी कधी जोडीदार पुरूषांमध्ये नंपुसकत्व असल्यामुळे ते गर्भधारणेसाठी असमर्थ ठरतात. काही मेडिकल उपचारांनी इन्फर्टिलिटीची शक्यता जास्त निर्माण होते. उदा. रेडियोथेरॅपी. त्यामुळे उपचारांपूर्वी त्या पुरुषाला त्याचे काही स्पर्मस गोठवून ठेवण्याची संधी दिली जाते. दोन स्त्रिया एकत्र राहत असतील आणि त्यांना मूल हवं असेल तर त्यांच्यासाठी डोनरकडून स्पर्म उपलब्ध करून कृत्रिम गर्भधारणा हा त्यांच्यासाठी पर्यायी उपाय आहे.
ही कृत्रिम गर्भधारणा कशी होते? निरोगी पुरूषांच्या शारीरिक चाचण्या घेऊन नंतर त्यांचे स्पर्म हे स्पर्म बँकेत जमा केले जातात. हे स्पर्म गोठवलेल्या स्थितीत ठेवले जातात. यासाठी cryoprotectant हे केमिकल स्पर्म गोठवून आहे त्या स्थितीत राहण्यासाठी वापरलं जातं. हे स्पर्मस कसे मिळवले जातात, तर हस्तमैथुनाद्वारे (मास्ट्रबेशन), निरोध वापरून (शारीरिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरून त्यात हे सिमेन गोळा करून), एकदा हे सिमेन सॅम्पल उपलब्ध झालं की कृत्रिम गर्भधारणेची तयारी करता येते. स्त्रीचं अंड त्या वेळी अंडाशयातून (ओव्हरी) गर्भाशयात (युटेरस) येतं त्या वेळी ही प्रक्रिया केली जाते. योनिमार्ग स्पेक्युलम या साधनाच्या सहाय्याने ओपन ठेवला जातो. हे स्पर्म डायरेक्टली कॅथेटरद्वारे त्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. या प्रक्रियेनंतर कमीत कमी अर्धा तास त्या स्त्रीनं आडव्या स्थितीतच आराम करायचा असतो.
कृत्रिम गर्भधारणेचं यश: उपचार सुरू केल्यानंतर आणि गर्भधारणा झाल्यानंतर आत्तापर्यंत सुमारे ६५% केसेसमध्ये यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. कृत्रिम गर्भधारणेचा फायदा कोणाला आहे असं पाहिलं तर प्रौढ वयातल्या स्त्रीला मूल हवं असल्यास, ती स्त्री सशक्त अंडी निर्माण करू शकत नसल्यास, पुरूषांचे स्पर्मस कमकुवत असल्यास, गर्भाशयाच्या मार्गात इन्फेक्शन असल्यास, फेलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस असल्यास कृत्रिम गर्भधारणा वरदान देणाराच उपाय आहे.
आज पुरुषांच्या बरोबरीनं आणि काही क्षेत्रात तर पुरुषांना ओलांडून पुढे स्त्रिया कामं करू लागल्या आहेत. त्यातही एकटं राहणार्या स्त्रियांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. नवे बदल त्या स्वीकारत पुढे वाटचाल करताहेत. या नव्या बदलाबरोबर जुन्या परंपरा, रुढी आणि विवाहससंस्थेच्या चौकटीलाही तडे जाताहेत. नवरा-बायकोचं न पटणं, कलह, इतकंच नव्हे तर लग्नानंतर केवळ दोनच महिन्यात होणार्या घटस्फोटांचंही प्रमाण वाढतं आहे. त्याच बरोबर अनेक तरूण मुलं-मुली आपल्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, कामात अडथळे येऊ नयेत या भावनेतून एकटं राहण्याचा मार्ग स्वीकारताहेत. लग्न न करता एकटे राहणार्यांची संख्या विशेषतः शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.
युरोपमध्ये एकटं राहणार्या स्त्रियांचं प्रमाण १००च्या मागे २.९% आहे. १९६० ते २००२ या कालावधीत ते २०%नं वाढलं आहे. २००१च्या जनगणनेनुसार भारतात एकट्या राहणार्या स्त्रियांचं प्रमाण ३.६ कोटी आहे. ही सं‘या अधिकही असू शकते. यात ज्यांचे नवरे सोडून गेले आहेत किंवा मिसिंग आहेत अशी संख्या धरलेलीच नाहीये. युनायटेड स्टेट्सच्या नॅशनल सेंटर फॉर हेल्थच्या आकडेवारीनुसार ४०% स्त्रिया लग्न न करता राहतात. युएसएच्या एका अहवालाप्रमाणे १९९५ मध्ये ३८% स्त्रियांनी लग्न केलेलं नव्हतं. कृष्णवर्णीयांमध्ये लग्न न केलेल्या महिलांचं प्रमाण ५५% होतं. तसंच एकटं राहणं म्हणजे सेक्सपासून दूर असणं किंवा सेक्स वर्ज्य असणं असं मुळीच नसून एका सर्व्हेक्षणात असंही दिसून आलंय की एकटं राहणार्या स्त्रिया नियमितपणे सेक्सलाईफचा आनंद लुटतात. यात त्यांना जवळचा मित्र किंवा प्रियकर असू शकतो. ४३% स्त्रियांनी आपण हा आनंद नियमित घेत असल्याचं मान्य केलं. नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या प्रथितयश वृत्तपत्रात याच विषयाच्या अनुषंगाने एक बातमी प्रसिद्ध झाली. एकटी राहणारी बंगाली दिग्दर्शिका आनंदिता सर्बाधिकारी हिनं आपण कृत्रिम गर्भधारणेतून गर्भवती असून २० जानेवारीला आपण एका बाळाला जन्माला घालणार असल्याचं जाहीर केलं. काळ बदलतोय तसं स्त्रीही अतिशय धीटपणे, मोकळेपणे आपल्या मनातले निर्णय, भावना जाहीर करू लागल्याचं हे लक्षण आहे. त्याच बरोबर समाजाकडूनही तिला एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. नव्या विचारांचं आणि कृतीचं तो स्वागत करतो आहे हे आपल्या लक्षात आलं असं ती म्हणते. आनंदिता हिच्या म्हणण्यानुसार तिला या बातमीनं जगभरातून, आसपासच्या तिला ओळखणार्या न ओळखणार्या सर्कलमधून अभिनंदनाचे, शुभेच्छांचे आणि तब्येतीची काळजी घेण्याविषयीचे अनेक कॉल्स आले. आपण जसं पुढारतो आहोत, तसे बदल समाजही स्वीकारत बदलत पुढे चालला आहे असं मत आनंदिता हिनं व्यक्त केलं आहे. आनंदिता हिनं या गर्भधारणेमुळे आपल्याला किती आनंद वाटतोय हे जाहीररीत्या शेअर केलंय.
आनंदिता हे एक उदाहरण झालं. पण आज अनेक एकट्या राहणार्या स्त्रिया या प्रक्रियेतून जात आहेत. मात्र आनंदिताप्रमाणे त्या या कृत्रिम गर्भधारणेची वाच्यता करत नाहीयेत. एवढंच काय पण हा स्पर्म डोनर कोण आहे हे अनेकदा गुप्त ठेवलं जातं. त्याच्याविषयी त्या स्त्रीलाही ती कल्पना दिली जात नाही. तसंच पुरूष डोनर्सना काही ठिकाणी आपले स्पर्मस कोणाला डोनेट केले जाताहेत हेही माहीत असतं. त्यांना एकट्या राहणार्या स्त्री पेक्षा एखाद्या कुटुंबात आपलं मूल वाढत असेल तर ते जास्त चांगलं असं वाटतं. मात्र त्यासाठी ते अद्यापतरी आग‘ही नाहीत, हे फक्त त्यांचं मत आहे. अशा स्पर्मस डोनर्सचे फोन नम्बर्स उपलब्ध असतात. तसंच त्यांची सविस्तर माहिती इंटरनेटवर मिळणं सहजशक्य आहे. झारखंडचे डॉ. असलम खान यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक महिन्यात माझ्याकडे चार-पाच एकट्या महिलांकडून विचारणा होते. अशा कृत्रिमगर्भधारणेतून त्यांना त्यांचं स्वतःचं कुटुंब हवं असतं. अशा वेळी त्या स्त्रीची आर्थिक स्थिती उत्तम असायला हवी, जेणेकरून जन्म घेणार्या बाळाचं संगोपन नीटपणे होऊ शकेलं असं मात्र नक्कीच वाटतं. मुंबईचा स्पर्म बँकेचा टेक्निशियन प्रशांत सुवर्णा याच्या म्हणण्यानुसार एकट्या राहणार्या स्त्रियांची अशा स्पर्मसाठी मागणी वाढते आहे. पूर्वी अशा गर्भधारणेसाठी जोडीदाराला क्लिनिकमध्ये सोबत घेऊन यावं लागायचं. मात्र आता त्यासाठी पुरुषाची गरज नसून स्पर्मडोनरद्वारा आपल्याला आईपण मिळू शकतं हे आजच्या स्त्रीच्या लक्षात आलं आहे. तो मुंबईतल्या अशा स्पर्म बँकेचं काम गेली दोन वर्ष बघतो आहे. त्याच्या मतानुसार एकट्या राहणार्या स्त्रीला मूल हवं असल्यास पूर्वी दत्तक घेणं हा एकमेव उपाय होता. मात्र आता मात्र कृत्रिम गर्भधारणेमुळे ती आई होण्याची पूर्ण प्रकि‘या अनुभवू शकते.
डॉ. पाटील यांच्या मतानुसार एकट्या राहणार्या स्त्रिया अतिशय क्वालिफाईड पुरुषाच्या स्पर्मची मागणी करतात असं आढळून आलं आहे. त्यांना आपलं होणारं मूल अतिशय बुद्धिमान आणि स्मार्ट असावं अशी इच्छा असते. अर्थात हेही लक्षात घ्यायला हवं की जास्त क्वालिफाइड असणं म्हणजे असा पुरुष बुद्धिवंत मुलाला जन्म देईलच असं नाही. अशा स्त्रियांकडून बाळाचे डोळे कसे असावेत, रंग कसा असावा अशीही इच्छा व्यक्त केली जाते. पाश्चात्य देशात सुरू झालेला हा डिझायनर्स बेबीचा ट्रेंड भारतात केव्हाच येऊन पोचला आहे असं यातले तज्ज्ञ डॉ. सौरव प्रसाद यांचं मत आहे. समजा मला निळ्या डोळ्यांचं मूल हवं आहे, तर निळ्या डोळ्यांच्या पुरूषाचे स्पर्मस मी त्या बँकेकडून मागवते. तिला सोनेरी केसांची, बुद्धिमान मुलगी हवी असेल तर तिची मागणी त्याप्रमाणे असेल. मात्र यातच धोका आहे की त्या पुरुषाचे स्पर्मस जन्म कशा प्रकारच्या मुलाला घालू शकतील हे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही.
या स्पर्म डोनर्सवरून युजेनिक्स संकल्पना आठवली. युजेनिक्स ही संकल्पना १८८३ मध्ये फ्रान्सिस गॅल्टन यानं सर्वप्रथम मांडली. या संकल्पनेची मुळं फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथे १८६०-७० या कालावधीत सापडतात. त्याच्या या संकल्पनेप्रमाणे जगातल्या अतिशय बुद्धिमान पुरुषांचे जिन्स वापरून अनेक असामान्य कलावंत, बुद्धिवंत, शास्त्रज्ञ याची मुलं जन्माला घालणं आणि याउलट कमी बुद्धीचे, सर्वसाधारण पुरुषांच्या जिन्सद्वारा त्या प्रकारची मुलं जन्माला येऊ नयेत याची काळजी घेणं. ही संकल्पना जगभरात इतकी लोकप्रिय झाली की त्यावर आधारित अनेक चित्रपटही निघाले. अमेरिकत स्टार ट्रेक या चित्रपटात युजेनिक्सची संकल्पना वापरली होती. येत्या ५० वर्षांत हव्या त्या गुणांची (रंग, रूप, आवाज, बुद्धिमत्ता, अंगभूत कौशल्य वगैरे) मुलं जन्माला घालणं, होणारं मूल मुलगा असावा की मुलगी हे सगळं ठरवता येणं शक्य होणार आहे. मात्र युजेनिक्सच्या आधारावर संशोधनं अजूनही सुरू आहेत. प्रत्यक्षात ‘युजेनिक्स’चं हे स्वप्न साकार झालं तर अनेक गंभीर धोके उदभवतील आणि प्रत्येक स्त्रीं शास्त्रज्ञ, कलावंत, बुद्धिवंत यांच्यासार‘याच मुलांची मागणी करतील. सर्वसाधारण माणसांसारखी मुलं जन्माला येणं बंद होईल आणि निसर्गातलं एकूणच सगळ्याच बाबतीतलं वैविध्य आहे ते कोलमडून पडून काय हाहाकार माजेल याची कल्पनाच न केलेली बरी!
या माहितीनं अनेक प्रश्न आणि त्यांची अनेक उत्तरं मनात येऊन गेली. एका मैत्रिणीशी गप्पा मारताना तिच्या बोलण्यातून आलं की एका टप्प्यावर आणि आजही बहुतांशी घरांमधून मुलगी वयाच्या २०च्या पुढे गेली की तिच्या लग्नाचे वेध तिच्या घरच्या मंडळींना लागतात. लग्न ही त्या मुलीच्या जीवनातली जणूकाही एक अविभाज्य घटना आहेच किंवा असते. त्यामुळे एकदा करियर, शिक्षण या गोष्टींचं बस्तान बसलं की मुलीच्या आयुष्याची घडी बसली पाहिजे असं तिला आणि तिच्या आई-वडिलांना वाटू लागतं. मात्र आज करियर करणार्या मुलींना लग्नानंतर पुढे जाण्याऐवजी अनेक गोष्टींमध्ये मागेच पाऊल पडतं आहे असं लक्षात येऊ लागलं आहे. लग्नानंतर मूल, त्याचं संगोपन, कुटुंबाच्या जबाबदार्या आणि नोकरी किंवा व्यवसाय या सगळ्या कसरती सांभाळता सांभाळता तिची तारांबळ उडते आहे. त्यामुळे लग्नाच्या आधीचं आयुष्यच बरं की काय असा विचार करण्याची पाळी तिच्यावर येते आणि तिचं आयुष्य पाहून इतरांना किंवा तिलाही या बंधनातून मुक्त व्हावं आणि एकटीनं मोकळा श्वास घेत जगावं असं वाटू लागलं आहे. कदाचित म्हणूनच अनेक तरुणी आज लग्नाच्या बंधनात अडकायला नाखुश असलेल्या दिसत आहेत.
आज अनेक स्त्रिया आपल्याला आनंदी रहायचं असेल तर लग्नानंतर बदलणारं आयुष्य आणि जबाबदार्यांचा अतिरिक्त ताण नको म्हणताहेत, तसंच काही स्त्रिया आपल्या आयुष्यात पुरूष नकोच या विचारांवर आल्या आहेत असं एका सर्वेक्षणात दिसून आलंय. कुठल्यातरी खोलवर झालेल्या आघातामुळे किंवा अनुभवांमुळे पुरुषांचा कायम तिरस्कार वाटल्यामुळे त्यांना एकटं राहाणं हवं आहे. नवर्याच्या डावीकडून, उजवीकडून असं झुलत राहण्यापेक्षा आपल्या करियरवर त्या खुश आहेत. लग्नासारखं ओझं स्वतःहून लादून घेण्यात त्यांना रस नाही. काही स्त्रियांना परीकथेतल्या पांढर्याशुभ‘ घोड्यावरून येणार्या राजपुत्राद्घी स्वप्नं पडतात. पण प्रत्यक्षात तसं चित्र न सापडल्यामुळे त्या एकटं राहाणं पसंत करताहेत, तर काही स्त्रियांना पुरुष आपल्या आयुष्यात आल्यानं आपल्यावर बंधनं येणार आणि आई होण्याच्या प्रक्रियेत सहन कराव्या लागणार्या त्रासापेक्षा एकटं राहिलेलं काय वाईट असं वाटून त्या एकटं राहणं स्वीकारत आहेत असं दिसून आलंय.
एखाद्या पुरुषाच्या सहवासापेक्षा अमेरिकेत पाळीवप्राण्यांचा केअरटेकर रिचर्ड ड्युरान्ट याच्या म्हणण्यानुसार एकटं राहणार्या स्त्रिया एखाद्या पुरुषाऐवजी कुत्र्याची कंपनी जास्त पसंत करतात. हा चार पायाचा प्राणी त्यांना एखाद्या पुरुषापेक्षा जास्त एकनिष्ठ आणि प्रामाणिक वाटतो. मागच्या वर्षी झालेल्या व्यवसायात जवळजवळ ६०% बिझिनेस हा तरूण आणि एकटं राहणार्या स्त्रियांकडून कुत्र्यांच्या मागणीनं झाला असं तो आवर्जून सांगतो आणि हे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढतच चाललं आहे. यातल्या बहुतांशी स्त्रिया करियरिस्ट आहेत असंही दिसून आलंय.
काही एकटं राहणार्या स्त्रियांशी बोलल्यावर त्यांच्याशी झालेल्या संवादातून काही मुद्दे पुढे आले. ते म्हणजे एकटं राहण्याचे अनेक फायदे स्त्रीला समोर दिसताहेत, ते असे की मु‘य प्रश्न लग्नानंतर जी अनेक बंधनं तिच्यावर येऊन पडतात ती लग्न न केल्याने पडत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की तिला काय करायचं, काय करायचं नाही, तिला कुठे जायचं, कुठे जायचं नाही हे सगळं ठरवण्याची मोकळीक तिची आणि तिलाच असते. लग्नांनंतरच्या अनेक जबाबदार्यंपासून सहजच सुटका होते. आधी जसं आयुष्य जगत होती तसंच किंवा त्यापेक्षाही मोकळेपणे आयुष्य जगण्यातला आनंद मिळणं हे तिला महत्त्वाचं वाटतं. आयुष्यात एका पुरुषाचं असणं आणि त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्या पुरुषाच्या मक्तेदारीत जगणं काही स्त्रियांना नकोसं वाटू लागलं आहे. मात्र स्वतःचं स्त्री असणं, आई होण्याचा आनंद घेणं हे तिला हवा आहे आणि त्यासाठी पुरूषाचा संपर्क, सहवास या गर्भधारणेसाठी आवश्यकच आहे असंही आता नाही. तर कृत्रिम गर्भधारणेसारख्या उपायांनी तिला हे सहज शक्य आहे. आता पुरुष डोनर्सची स्पर्मस बँक उपलब्ध असून पुरूषाशी सेक्स केल्याशिवाय ही गर्भधारणा होऊ शकते. शिवाय त्यातही आपल्या मुलावर केवळ आपलाच हक्क हवा अशाही भावना तिच्या या गर्भधारणेमागे असू शकतात.
अशा प्रकारच्या एकट्या राहणार्या स्त्रीला हवं तेव्हा हे मूल जन्माला तर घालता येतंच. पण त्याला वाढवण्याचा आनंद, स्वतःचं मूल म्हणून निर्माण होणार्या नात्याचा आनंद निश्चितच मिळू शकतो. मात्र जन्माला येणार्या मुलाला वडिलांचं नाव काय लावायचं हा प्रश्न तिच्यापुढे असू शकतो. पण काही ठरावीक शहरं सोडल्यास अजूनही अनेक ठिकाणी आपल्या समाजाची मानसिकता अशा प्रकारचं मूल स्वीकारण्याची कितपत आहे ही शंकाच आहे. मुलाला जन्म देण्याच्या आधीपासून ते नंतर त्या एकट्या स्त्रीला हे सगळं करणं कशा प्रकारे साध्य होणार आहे हाही प्रश्न आहे.
तसंच एकटी राहणारी स्त्री तिच्या शरीरात ही गर्भधारणा करण्यास असमर्थ ठरत असेल तर तिच्या शरीराच्या बाहेर किंवा सरोगेट मदर हाही पर्याय तिच्यापुढे उपलब्ध आहे. मात्र या पर्यायात त्या सरोगेट मदरशी योग्य प्रकारचा कायदेशीर करार करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या प्रकि‘येत जेव्हा नऊ महिने मूल त्या सरोगेट मदरच्या पोटात वाढतं, तेव्हा तिचं भावविश्व त्या होणार्या बाळाभोवती नकळत गुंफलं जातं. त्यानंतर कायद्यानं जरी ते मूल कायदेशीर आईकडे गेलं तरी जन्म दिल्यामुळे पुढील आयुष्यात सरोगेट मदर आणि बाळ आणि कायदेशीर आई यांच्यात कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असतेच.
जागतिकीकरणामुळे माणूस आत्मकेंद्री होत चालला असून वंश, कुटुंब या गोष्टींशी त्याचं फारसं देणंघेणं राहिलं नाही आणि कदाचित पुढेही ते कमी कमी होत जाण्याची शक्यताच अधिक वाटते. नव्या बदलाचे नवे गतीचे वारे प्रचंड वेगात आपल्याला बरोबरीनं घेत जाताहेत. या वेगाशी जुळवणी करताना आपली दमछाक होते आहेच. आजच्या जागतिकीकरणाचे परिणाम कुटुंबसंस्थेवर, विवाहसंस्थेवर पडताहेत. व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होतो आहे. पण त्याच बरोबर मूल्यव्यवस्था पोखरली जातेय. एकीकडे स्त्री व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे श्वास घेते आहे, पण त्याचबरोबर तिच्यावर अवलंबून असलेली कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था उदध्वस्त होण्याच्या मार्गाकडे वाटचाल करते आहे. अशा परिस्थितीत मी आणि माझं एकमेव मूल हे आजच्या एकट्या स्त्रीसाठी आशादायी आणि तिच्या सुखकर भविष्यासाठी पर्यायी चित्र तिला कदाचित वाटू शकेलही. पण सोयीसाठी शोधलेला प्रत्येक पर्याय हा विधायकच असेल असं नाही. आज प्रगती करत असतानाच माणूस निसर्गावर मात करू पाहातोय.
खरंतर निसर्गाने स्त्री आणि पुरुष ही परस्परपूरक अशी जोडी बनवली. स्त्री-पुरूष हे नातं नितांत सुंदर आणि नैसर्गिक आहे. त्यांच्या मीलनातून एका नव्या जिवाची निर्मिती होते. परस्परांना बांधून ठेवणार्या एका कुटुंबाचा जन्म होतो. हा पायाच कमकुवत झाला तर कुटुंबव्यवस्थेलाही हादरे बसतील. पुरूषाशिवाय मूल हवं असं जेव्हा एखादी स्त्री ठरवते, तेव्हा तिची मानसिकता तशी होण्यामागची कारणं शोधायला हवीत आणि ती बदलण्यासाठीचे प्रयत्न करायला हवेत. आज काही ठरावीक स्तरातल्या, ठरावीक शहरांमधून राहणार्या स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकणार्या, एकट्या स्त्रिया हा निर्णय घेताना दिसत आहेत. अपवादात्मक पातळीवर तो पर्याय कदाचित योग्यही असू शकेल. मात्र यापुढे या प्रकारचे प्रयोग मर्यादित पातळीवर राहतील किंवा कदाचित त्यांचं प्रमाण वाढेलही. त्यासाठीचे पर्यायही त्यातून निर्माण होत राहतील. मात्र पुरुष नको अशी भूमिका या मागे असेल तर पुरूषी व्यवस्था, पुरूषी मानसिकता बदलण्याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यासाठी माणसांमाणसांमधला संवाद वाढला पाहिजे. या संवादातून प्रगल्भता वाढली पाहिजे. तंत्रज्ञान येतंय ते मानवी संबंध चांगले सुदृढ होण्यासाठी हेही लक्षात घेतलं पाहिजे. पण हे तंत्रज्ञान आपण कशासाठी वापरतो आहोत याच्या पर्यायांवर नियंत्रण देखील असणं गरजेचं आहे. अन्यथा गर्भलिंग निदानाच्या बाबतीत समाजात जे थैमान घातलं गेलं तशी परिस्थिती निर्माण होईल. तंत्रज्ञानानं समतोल राखला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर आणि तरच आपण सुसंस्कृत समाज घडवण्याची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत असं म्हणता येईल.
दीपा देशमुख
Add new comment