मनात दरवळणारी गाणी

मनात दरवळणारी गाणी

गाणी सोबतीला कधी आली कळलंच नाही. आई पहाटे उठून सडा-रांगोळी अशी कामं करत असताना रेडिओवर लागलेली प्रभातगीतं लहानपणी कानावर पडायची. त्यातलं 
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठी उठी गोपाला.......

ही भूपाळी आवडायची. त्यानंतर सकाळचं जेवण झालं की मी आणि माझी बहीण रूपा दोघीही रेडिओवर लागलेली गाणी ऐकत सोफ्यावर बसल्या बसल्या झोपेच्या स्वाधीन व्हायचो. त्या वयातली सुषमा श्रेष्ठनं गायलेली: 
किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती फुलपाखरे वर भिरभिरती
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई

हे गाणं खूप आवडायचं. त्या गाण्यासारखंच दृष्य प्रत्यक्षात दिसावं वाटायचं. सगळी स्वप्ननगरी अलगद बोलावत राहायची. त्यानंतर 
विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा विहीणबाई उठा
भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा

हे गाणं तर मी सतत गायची. आमच्या शेजारी राहणार्‍या आणि माझ्यावर खूप माया करणार्‍या सांगवीकर काकू माझ्या हक्काच्या श्रोत्या होत्या. त्यांनी ‘दीपा गाणं गा’ असं म्हटलं की मी विहीणबाईंना साद घालायची, तर कधी 
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
आज गोकुळात सखी....

किंवा
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला

ही गाणी मन लावून गात असे. शाळेत असताना 
गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा
हैया हो, हैया हो....
.

या गाण्यावर आमचं कोळीनृत्य बसवलं होतं आणि ते नृत्य करत हे गाणंही मी गायलं होतं. त्यातली कोकणची माणसं डोळ्यासमोर येऊन कोकणातला हिरवागार निसर्ग कधी एकदा बघायला मिळेल असं वाटायचं. त्याच दरम्यान मनाला व्याकूळ करणारं, 
भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी

हे अरूण दाते यांनी गायलेलं गाणं ऐकताना आणि गाताना डोळे पाझरायला लागायचे. त्या वयात त्या गाण्याचा फारसा अर्थ कळला नव्हता, पण त्या गाण्यानं खूप बेचैन करून सोडलं होतं हे मात्र खरं.
माझ्या मोठ्या भावाला कव्वाल्या ऐकायला खूपच आवडायचं. धर्मा या चित्रपटातली,
राज की बात कह दू तो जाने महेफिलमे फिर क्या हो
राज खुलनेका तुम पहले जरा अंजाम सोचलो
इशारोको जरा समझो, राज को राज रहने दो.....

ही कव्वाली तो अनेकदा ऐकायचा. त्यातल्या टाळ्यांचा नाद कानात कितीतरी वेळ दुमदुमत राहायचा. तसंच त्या वेळी जगजितसिंहनं गायलेलं भक्तिगीत,
तू ही माता, तू ही पिता है, तू ही है राधा का शाम
हे राम, हे राम......

ही गाणी ऐकत असतानाच भावगीतांनी आयुष्यात प्रवेश केला.
जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते............
आणि 
जीवनात ही घडी अशीच राहू दे 
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे 

ही गाणी ऐकताना आणि गाताना अनामिक हूरहूर मनाला लागायची. 
घरात तिन्ही भावांना गाणी प्रचंडच आवडायची. त्यातही मधला भाऊ नंदू पैसे जमवून औरंगाबादच्या नरिमन या शहागंजमधल्या दुकानातून सतत ईपी, एसपी, एलपी अशा रेकॉर्डस विकत आणायचा. त्याने आणलेली सगळीच गाणी आवडायची. त्यानं घरातल्या जुन्या माठामध्ये स्पीकर लावला होता. त्यामुळे घरभर आणि घराबाहेरही आवाज सगळ्या वातावरणात पसरून जायचा. वसंत देसाईचं
आखियॉं भूल गयी है सोना, दिलपे हुआ है जादूटोणा
शहनाईवाले तेरी शहनाई करजवाको चिर गयी चिर गयी चिर गयी

हे गाणं तर मी शेकडो वेळा ऐकलं असेन. शाळेतल्या वयाकडून आता तारुण्याकडचा प्रवास करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती आणि त्याच वेळी कोरा कागजमधलं, 
मेरा पढने मे नही लागे दिल, दिल पे क्या पढ गयी ....
हे गाणं ऐकून त्या गाण्यातली जया भादुरी आपणच आहोत असं वाटायला लागलं होतं. त्याच वेळी प्रेमात पडल्यावर तर सगळीच प्रेमगीतं आवडायला लागली होती. गुरुदत्त कानात येऊन गुणगुणू लागला होता:
ए जी दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गयी
नजरे मिली क्या किसीसे के हालत बदल बदल गयी 

आणि मग 

मिलती है जिन्दगी मे मोहोब्बत कभी कभी 
हे गाणं ऐकून आपण याबाबतीत फारच नशीबवान आहोत असंही वाटून
पंख होते तो उड आती रे 
असं वाटण्याचे दिवस आले होते. त्यातही आवडती व्यक्ती दोन दिवस जरी दिसली नाही की, 
तेरा जाना दिल के आरमानोंका लूट जाना,
कोई देखे बन के तकदिरोका मिट जाना

या विरहाच्या ओळी कितिक वेळ आळवाव्या वाटायच्या. 
चुपके चुपके रातदिन आसू बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

गुलाम अलीनं देखील हळूच हाक दिली होती. त्याच्या या ओळी ऐकताना मग डोळे भरून यायचे. त्याच वेळी निकाहमधला सलमा आगाचा आवाजही हृदयाला कातर करून जायचा. 
दिल के अरमा आसूओमे बह गये
हम वफा करके भी तनहा रह गये 

असो वा प्रेमाला फूलस्टॉप देण्यासाठी घरातली सगळी मंडळी सज्ज झाल्यानंतर 
ये दुनिया ये महेफिल मेरे काम की नही
हे रफीच्या दर्दभर्‍या आवाजातलं गाणं किती जवळचं वाटायला लागलं होतं. प्रतीक्षा करून दमून गेल्यावरही प्रियकराचं न येणं सतावत राहिलं होतं आणि मग, 
पत्थर के सनम तुझे हमने मोहोब्बत का खुदा जाना
बडी भूल हुयी अरे हमने ये क्या समझा, ये क्या जाना

या गाण्याबरोबरच रफीच सोबत करायला धावून आला. 
जाने क्यू लोग मोहोब्बत किया करते है
दिल के बदले दर्दे दिल लिया करते है

असा प्रश्‍न मन विचारत राहिलं होतं आणि मग मनाची समजूत घालण्यासाठी

कभी किसी को मुक्कमल जहाँ नही मिलता
कहीं जमीं तो कही आसमॉं नही मिलता

या गाण्यानं मनाला समजवलं होतं. अशा वेळी मग 
छोड दे सारी दुनिया किसी के लिये, ये मुनासिब नही आदमी के लिए
प्यारसे भी जरूरी कई काम है, प्यार सबकुछ नही जिन्दगी के लिये

असं मनाला सांगत, पुन्हा नव्यानं जगणं सुरू करताना 
ओ मॉंझी चल, ओ मॉंझी चल
तू चले तो छमछम बाजे लहरोंकी पायल

हे गाणं मनाला दिलासा देत राहिलं. या काळात, किशोरच्या गाण्यांनी खूप साथ दिली.
ऑ चल के तुझे मै लेके चलू इक ऐसे गगन के तले
जहॉं गम भी न हो, आसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले

या गाण्यानं दुखर्‍या मनावर फुंकर घातली. 
राही तू रूक मत जाना, तुफॉंसे मत घबराना
कही तो मिलेगी तेरी मन्जिल कही दूर गगनकी छॉंवोमे

या गाण्यातून मनाला पुन्हा उभारी मिळाली. प्रवासातल्या चढ उतारांनी कधी कधी मन भूतकाळातही रमायला लागायचं. अशा वेळी कधीतरी तलद महेमूद येऊन
सिने मे सुलगते है अरमॉं ऑखो मे उदासी छायी है
ये आज तेरी दुनियासे हमे तकदीर कहॉं ले आयी है

म्हणायचा आणि आत्तापर्यंत सगळं आवरून धरलेलं गळून पडायचं. मन आणि डोळे पुन्हा काठोकाठ भरून यायचे. हळूहळू याच गाण्यांनी मनाला तटस्थ व्हायचं शिकवलं. सुखदुःखांकडे त्रयस्थ होऊन बघायला शिकवलं. मग एखादं गाणं मनाला हळुवार झोका द्यायला लागायचं. हेमंतकुमारची सगळीच गाणी झोका देणारी, त्यातही
बेकरार कर के हमे यू ना जाईये आपको हमारी कसम लौट आईये
या हेमंत कुमारच्या गाण्यानं तर माझा पालघर ते मासवण प्रवास सुसह्य करून सोडला होता. याच गाण्याच्या चालीवर मी मग माझ्या कार्यकर्त्यांसाठी गाणं तयार केलं होतं ः
मिळून सारे आपण आता काम करू काही, ग्रामशिक्षण समिती मजबूत करू बाई
हळूहळू या प्रवासात रोजच एक गाणं आकाराला येत गेलं. या गाण्याबरोबर राजकपूरही समोर येऊन उभा ठाकला आणि मुकेशच्या आवाजात,
किसीकी मुस्कराहटोपे हो निसार, किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल मे प्यार जिना इसीका नाम है

याची शिकवण देत राहिला. मेहंदी हसननं गायलेली 
रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए आ
ही गझल आता मनाला दुखवेनाशी झाली, तर त्या गाण्यातले स्वर, तो मेहंदी हसन आता त्याच्या गझलेचा आस्वाद घ्यायला शिकवू लागला. फरिदा खातूम
आज जाने की जिद ना करो युंही पहलू मे बैठे रहो
असं म्हणत राहिली. मीही मग माझ्या जगण्याचा भाग बनलेल्या शेकडो/हजारो गाण्यांना ‘आज जाने की जिद ना करो’ म्हणत राहिले. कारण बालपणापासून ते आजपर्यंत माझ्या मनात रेंगाळणारी, माझ्या मनात दरवळणारी आणि मला कायम सोबत करणारी, मला रिझवणारी, मला फुलवणारी  ही गाणीच तर आहेत! 
दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.