शब्दांपलीकडला माणूस - डेव्हिड अटेनबरो
सध्या मला डेव्हिड अटेनबरोनं वेड लावलंय. कसला गोड माणूस आहे हा! कॅनव्हास लिहिताना मी रेम्ब्रॉं, रोदयापासून ते गोगँपर्यंत सगळ्यांच्याच प्रेमात पडले होते. पण त्यानंतर जीनियस सुरू झालं आणि रिचर्ड फाईनमन मला जळी, स्थळी, काष्ठी दिसू लागला. या फाईनमनच्या प्रेमातून बाहेर येण्यासाठी मला मदत केली ती भारतीय जीनियस विश्वेश्वरैयानं. हा माणूस तर कसला ग्रेट, १०० वर्षं झाली तरी काम करतच राहिला. आणि तेही शिक्षण, शेती, पाणी, उद्योग सगळ्याच क्षेत्रात! मी तर नतमस्तक झाले त्याच्यासमोर!
खरं तर सध्या आमचं पाश्चिमात्य संगीतावर आधारित ‘सिंफनी’ पुस्तकावरचं शेवटचं हात फिरवणं सुरू आहे आणि शांतपणे काम पूर्ण व्हावं असं वाटत असतानाच डेव्हिड अटेनबरो यानं असा काही मनावर कब्जा केलाय की ‘सिंफनी’च्या मध्ये मध्येही तो येऊन लुडबूड करतोय. फक्त लुडबूड नाही तर ते काम काही काळ बाजूला टाकायला लावतोय.
आज डेव्हिड अटेनबरो ९० वर्षांचा असूनही कार्यरत आहे. त्याचं काम बघितलं तर तोंडाचा ‘आ’ झालेला तसाच राहतो! ब्रिटननं तर त्याला आपली 'राष्ट्रीय संपत्ती' म्हणूनच जाहीर केलंय इतका हा गुणी माणूस! (त्याला स्वतःला मात्र हे विशेषण जराही पसंत नाही.) याचे भाऊ जॉन अटेनबरो आणि रिचर्ड अटेनबरो- पैकी रिचर्ड अटेनबरोनं काढलेला 'गांधी' हा चित्रपट सगळ्यांना आठवत असेलच.
बीबीसीत काम करताना १९७९ साली डेव्हिड अटेनबरोनं ‘लाईफ ऑन अर्थ’ हा पहिला माहितीपट बनवला. त्यानंतर त्यानं प्राणी असो वा वनस्पती, शहरं असो वा वाळवंट, पर्वत असो वा पाण्याखालचं जग.....अनेक माहितीपट बनवले. त्याचं आयुष्य त्यानं निसर्गाला, पर्यावरणाला ज्या प्रकारे वाहिलंय तिथे त्याच्याबद्दलची ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुठलेच शब्द समर्पक ठरू शकत नाहीत इतका तो सार्या शब्दांपलीकडला माणूस आहे.
सध्या हा डेव्हिड अटेनबरो आणि त्याचं निसर्गवेड मला त्याच्याकडे खेचतं आहे हेच खरं!
दीपा देशमुख २० मार्च २०१७.
Add new comment