ये जो पब्लिक है...
ये जो पब्लिक है...
राजेश खन्नाच्या ‘रोटी’ या चित्रपटातलं किशोर कुमारच्या आवाजातलं गाणं ‘ये जो पब्लिक है ये सब जानती है’ हे गाणं आठवत असेलच. तर आज पुण्याच्या श्रीराम लागू रंग-अवकाश इथे, (ज्योत्स्ना भोळे सभागृह) महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ‘ये जो पब्लिक है’ हे प्रायोगिक नाटक बघितलं.
बॉस, हे नाटक एकदम हटके होतं. म्हणजे कलाकार स्टेजवर, प्रेक्षक सभागृहातल्या खुर्च्यांवर असं हे नाटक नव्हतं. म्हणजे थोडंसं तसंही होतं. कलाकार स्टेजवरच होते आणि आम्ही प्रेक्षक सभागृहातल्या खुर्च्यांवरच होतो. पण इथे दोघांमध्ये परस्परसंवाद होता आणि सभागृहातले सगळे प्रेक्षक जो कौल देतील त्यावर हे नाटक पुढे पुढे सरकणार होतं. थोडक्यात, रिमोट हा पब्लिकच्या हातात होता.
मी, रेणुका आणि रेणुकाच्या ननंदबाई आम्ही आमच्या खुर्च्यावर स्थानापन्न होण्याआधीच आमच्या हाती टेनिसच्या रॅकेट असाव्यात तशा रॅकेट देण्यात आल्या. सभागृहात पाऊल टाकलं, तर सभागृहातल्या सगळ्या खुर्च्या रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या. आम्ही कसंबसं आमच्या जागेवर बसून हुश्श केलं आणि नाटक सुरू झालं.
यापूर्वी मी प्रदीप वैद्य यांचं काजव्यांचा गाव हे नाटक बघितलं होतं. सगळ्या बाजूंनी प्रेक्षक आणि त्यामध्येच हे नाटक घडलं होतं. वेगळं असं स्टेज या नाटकात नव्हतंच. त्यानंतर मी फ्लेमिंगो टीमचं अक्षय संत लिखित ‘कारवाँ गुजर गया, गुबार देखते..’, हे इमर्सिव्ह थिएटर संकल्पनेतलं नाटक कोरोनापूर्व काळात बघितलं होतं. हे नाटक तर चक्क एका बंगल्यात घडलं होतं. तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला, टेरेस...प्रेक्षक आणि पात्रं ही सगळीच त्या बंगल्यात वावरत होती, मात्र नाटकातल्या पात्रांच्या दृष्टीने प्रेक्षक नव्हतेच.
आणि आता हे प्रेक्षकांच्या मतांवर घडणारं नाटक - ये जो पब्लिक है...!
‘ये जो पब्लिक है’ हे नाटक बघणं, अनुभवणं आणि त्याचा आस्वाद घेणं ही नितांत सुंदर गोष्ट आहे. स्टेजवर वावरणारी पात्रं म्हणजे आपल्यातलंच काहीतरी तिथंही आहे याची जाणीव करून देणारी. विषय वेगळा नाहीच. बहुतांश सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग असलेला...मग यात वेगळं ते काय? तर या नाटकातली खरी पात्रं, खरे कलाकार हे सभागृहातले प्रेक्षक आहेत. नाटक सुरू होतं आणि प्रेक्षकांवर मतं देण्याची जबाबदारी येऊन पडते. ही मतं ते कशी देतात? आपल्या जवळ असलेल्या रॅकेटवर एका बाजूने हिरव्या रंगाचा बॉल आहे, तर दुसऱ्या बाजूने लाल रंगाचा बॉल. आपलं जे मत असेल, त्या रॅकेटमधून तो रंग कलाकारांना दाखवायचा. आपलं मत देताना खूप जबाबदारीने द्यायला हवं. प्रेक्षक हे मत कसं देतात? तर प्रत्येक प्रेक्षकाची/व्यक्तीची, मग ती स्त्री असेल, पुरूष असेल, तरुण असेल, वृद्ध असेल एका विशिष्ट वातावरणात जडणघडण झालेली असते. घरातलं वातावरण आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना यातून त्या त्या व्यक्तीचा एक स्वत:चा दृष्टिकोन तयार होतो. त्याची काही मतं ठाम असतात. या सगळ्यांमधून तुम्ही कसे आहात हे ठरतं. तुमच्यावर ग्लोबलायझेशनचा, चंगळवादी संस्कृतीचा, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा कसकसा परिणाम होतोय, तसंच इथे नाटकातही तुम्ही कसे आहात, तुमची मतं काय आहेत यावर ते नाटक पुढे सरकतं. तुमच्या मतांचा, निर्णयाचा, दृष्टिकोनाचा परिणाम या नाटकावर होतो.
संपूर्ण नाटक म्हणजे स्टेजवर कलाकार आपापल्या भूमिका रंगवताहेत आणि इकडे सभागृहातले प्रेक्षकही त्यात सामील होतायेत हे पहिल्यांदाच घडताना दिसत होतं. परस्परांशी चाललेला तो संवाद एक वेगळाच आनंद देत होता आणि सभागृहात एक चैतन्याचं वातावरणही निर्माण करत होता. काही वेळेस तर आपण सगळे मिळून एखादा गेम/खेळ खेळतो आहोत असंही वाटत होतं.
खरं तर ‘ये जो पब्लिक है’ हे नाटक म्हणजे वा, चला मस्त मनोरंजन झालं, छान पंचेस कलाकार काढताहेत, इतकं म्हणण्यापुरतं मर्यादित मुळीच नाही. जरी या नाटकात प्रेक्षक आणि कलाकार हे सगळे एकजीव झालेले दिसत असले, तरी नाटककार आणि दिग्दर्शक यांना यातून आपल्या आसपास काय घडतंय, आपल्याला त्याची जाणीव आहे का, आपण किती भाबडे आहोत/नाही आहोत, आपल्यात निर्णयक्षमता आहे का, आपण डोळस आहोत का, आपल्यातल्या विसंगती आपल्याला ठाऊक आहेत का, असे अनेक प्रश्न उभे करणारं आहे.
नाटकाचा लेखक, दिग्दर्शक विवेक बेळे यांच्या लिखाणाबद्दल काय बोलावं? ॲब्स्ट्रॅक्ट तऱ्हेने लेखणी चालूनही ती सर्वसामान्यांनाही समजणारी आणि गंभीर/तात्विक विचार करणाऱ्यांनाही कळणारी आहे. आनंद इंगळे, सुनील अभ्यंकर, गायत्री तांबे-देशपांडे आणि अमोल टापरे यांची कामं अप्रतिम. खरं तर ते मुद्दाम अभिनय करताहेत असं वाटत नव्हतंच. गंधार संगोराम याचं संगीत, अपूर्व साठ्ये याचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना आणि वेशभूषा स्मिता तावरे एकदम समर्पक होती.
एक वेगळ्या प्रकारचा विलक्षण प्रयोग अनुभवण्यासाठी ‘ये जो पब्लिक है’ हे दोन अंकी नाटक आवर्जून बघायलाच हवं!
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
Add new comment