द लॉस्ट सपर
द लॉस्ट सपर
डॉ. आनंद नाडकर्णी या माणसाची प्रशंसा करायला प्रत्येक वेळी शब्द आणायचे कुठून हा प्रश्न मला पडला आहे. सगळे शब्द वापरून झाले आहेत. नवीन शब्द शोधल्यानंतर करूयात या माणसाची तारीफ, असं मी आता ठरवलं आहे. तर, सांगायचा मुद्दा हा, की तीन दिवसांपूर्वी मी डॉ. श्रीराम लागू रंग अवकाश, पुणे इथे सायंकाळी सात वाजता ‘द लॉस्ट सपर‘ हे दोन अंकी नाटक बघितलं.
नाटकाची पार्श्वभूमी अशी : काही महिन्यांपूर्वी डॉ. आनंद नाडकर्णी प्रवासातून परत येत असताना त्यांना एक विषय सुचला आणि त्यांनी तो विमानात असतानाच झपाटल्यागत लिहायला सुरुवात केली. परत आल्यावर त्यांनी मला फोन केला, लिहीत असलेल्या विषयाने ते इतके भारावून गेले होते की बस्स. त्यानंतर पुण्याला आल्यावर ते ब्रेकफास्टसाठी घरी आले असताना त्या वेळी त्यांच्या हातात मोठ्ठं बाड होतं, त्यात छापील कागदपत्रं होती, स्वत:चं हस्तलिखित होतं आणि बरंच काही. खाण्याकडे कमी आणि सांगण्यात त्यांचं जास्त लक्ष होतं.
काहीच दिवसांत त्यांनी मला लिखाण पूर्ण झाल्याचं सांगितलं आणि अभिवाचन करतोय असं म्हणत आमंत्रणही दिलं. त्याच वेळी त्यांनी प्रत्यक्ष नाटकाच्या प्रयोगाची 4 जुलै 2025 ही तारीखही जाहीर केली. 4 जुलै 1902 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या दिवसाचं औचित्य साधून डॉक्टरांनी ठाण्यामध्ये 4 जुलैला पहिला आणि दादर मध्ये 6 जुलैला दुसरा असा ‘द लॉस्ट सपर’ चा प्रयोग सादर करायचं ठरवलं.
नाटकाचा तिसरा प्रयोग पुण्यात झाला तो 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी. नाट्यगृह पूर्णपणे भरलं होतं. (माझा या सगळ्या प्रवासातला खारीचा वाटा म्हणजे डॉक्टरांनी या नाटकाविषयी सांगताच माझ्या डोळ्यासमोर या भूमिकेला शोभेल असा एकच अभिनेता आला, तो म्हणजे गिरीश परदेशी. त्याचं इंग्रजीतून असलेलं चे गव्हेरा हे नाटक मी बघितलं होतं आणि आवडलंही होतं. डॉक्टरांना मी त्याचे काही फोटोग्राफ्स पाठवले आणि पुढे प्रतिमाताईंनीही त्या नावावर शिक्कामोर्तब केलं हे विशेष.)
‘द लॉस्ट सपर’ या नाटकाचा विषय नेमका काय आहे? स्वामी विवेकानंद या जगातून जाण्याआधीचे 48 तास, काय काय घडलं यावर आधारित हा नाट्यप्रयोग आहे. विवेकानंद आणि त्यांची शिष्या भगिनी निवेदिता यांच्यातला संवाद हा या नाटकाचा मुख्य विषय. विवेकानंद यांनी भगिनी निवेदिताला जेवणासाठी बोलावलं होतं. त्या वेळी दोघांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. बुद्धिमान, कार्याप्रती वाहून घेतलेल्या, अलौकिक प्रतिभेच्या दोन व्यक्तींमधला तो संवाद होता, त्यामुळेच त्या संवादाला, त्यांच्या भावनेला महत्वही होतं.
नाटक सुरू होताच स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांचा वावर रंगमंचावर सुरू झाला. दोघं बोलत होते, भारताच्या परिस्थितीवर, स्त्रियांच्या स्थितीवर, शिक्षणावर, देशावर, देशप्रेमावर.....त्यांच्या मनातली तळमळ त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होती, त्यांच्यातलं उत्कट नातं, त्या नात्याची उंची मनाचा तळ गाठत होती. ‘द लॉस्ट सपर’ या नाटकामधून वेदांत विचार, अद्वैताचं चिंतन, जगण्याचं तत्वज्ञान, शिक्षण, कृष्ण आणि बुद्ध यांची शिकवण, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रप्रेमाची व्यापक व्याख्या आणि मानवतावाद असे अनेक विषय विवेकानंद आणि निवेदिता यांच्या संवादातून पुढे येत राहतात. त्याचबरोबर दोघांमधल्या नात्यांचे विविध पदर जाणवत राहतात. मार्गारेट नोबेलची झालेली भगिनी निवेदिता आणि या रुपांतरामधून तिचा भारतीय संस्कृतीचा अभ्यास तिच्या बोलण्यातून कळत राहतो. विवेकानंदांवरची तिची अतुट श्रद्धा, त्यांच्या विचारांना आपल्या आत खोलवर रुजवून त्या वाटेवर चालण्याचा तिचा दृढनिश्चय आपल्याला या नाटकातून बघायला मिळतो.
समस्त भारतीयांच्या मनातलं विवेकानंदांचं एक साचेबंद रूप या नाटकाने पार बदलून टाकलं आहे. विवेकानंद स्वत: अतिशय रूचकर स्वयंपाक करत. त्यांना स्वत:ला आइस्क्रीम खूप आवडत असे. भगिनी निवेदिताला त्यांनी जेवायला बोलावलं, तेव्हा त्यांनी ‘अतिथि देवो भव:’ नुसार स्वत: तिचे हात धुतले आणि आपल्या रुमालाने पुसले. आपल्या गुरूची ही कृती बघून भगिनी निवेदिता संकोचून गेली. त्यांनी स्वत:च्या हाताने केलेले पदार्थ तिला अत्यंत प्रेमाने खाऊ घातले. नाटक सुरू होण्याआधी डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणाले, ते वाक्य मनाला जास्त भिडलं. इतिहास फक्त वाचून समजतो असं नाही, तर तो जेव्हा जिवंत होऊन समोर उभा राहतो, तेव्हा त्यातलं प्रत्येक पान आपली कहाणी सांगतं. जिवंत झालेला इतिहास अतिशय वेगळ्या रूपात आपल्यासमोर उभा असतो. म्हणूनच विवेकानंद म्हणजे भगवे कपडे आणि फेटा परिधान केलेले, हाताची घडी घालून उभे असलेले, इतकंच त्यांचं रूप नसून ते कसे बोलत असतील, काय बोलत असतील, कधी चिंताग्रस्त होत असतील, तर कधी प्रसन्न होत असतील, ती सारी विवेकानंदांची रूपं डॉक्टरांनी आपल्या समर्थ लेखणीतून आपल्यासमोर आणली.
नाटक बघत असताना सचिन गावकरचं साजेसं नेपथ्य लक्ष वेधून घेत होतं. सेटवरच्या प्रत्येक वस्तूमधून बंगाली संस्कृती ठळकपणे जाणवत होती. मिलिंद जोशी यांचं संगीत मनाला आत्मिक शांती देत होतं आणि प्रतिमा कुलकर्णींचं दिग्दर्शन खूपच सहज स्वाभाविक वाटत होतं. (काही वेळेस त्यांनी विवेकानंदांना थोडी लाऊड ट्रिटमेंट का दिलीय हा प्रश्न मनाला पडला होता.) तसंच नाटक म्हटलं की त्यात रंगमंचावर सतत काहीतरी घडणं आवश्यक असतं, इथे त्याबाबतीत मर्यादा येत होत्या. कारण इथे दोघांमधला वैचारिक संवाद हाच या नाटकाचा पाया होता. मात्र दिग्दर्शिकेने अतिशय खुबीने हा संवाद कधी भूतकाळ, तर की वर्तमानकाळ यांना गुंफत तो साकारला हे विशेष.
‘द लॉस्ट सपर’चं वैशिष्टय म्हणजे स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता या दोघांमध्ये त्या वेळी जी चर्चा झाली ती भाषा इंग्रजी असल्यामुळे डॉक्टरांनी हे नाटक इंग्रजीतूनच लिहिलं आणि सादर केलं. गिरीश परदेशी आणि डॉ. प्रज्ञा मानवतकर म्हणजेच अनुक्रमे विवेकानंद आणि भगिनी निवेदिता प्रत्यक्षच आपल्यासमोर उभे आहेत असा भास होतो. दोघांनीही आपापल्या भूमिका इतक्या सहजपणे साकारल्या आहेत की त्यात कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही. त्यांची भाषा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अडसर ठरत नाहीत.
नाटक शेवटाकडे जात असताना विवेकानंद फेटा धारण करतात, तेव्हा संपूर्ण सभागृह स्तिमित होतं. याचं कारण त्या वेळी नाटक नाटक राहत नाही, तर खरोखरच विवेकानंद आपल्यासमोर आले आहेत असं वाटायला लागतं. नाटकाचे या आधीचे जे दोन प्रयोग झाले, त्या वेळी रामकृष्ण मिशनच्या गुरूंनी विवेकानंदांना म्हणजेच गिरीश परदेशीला वाकून नमस्कार केला होता. पुण्यातल्या प्रयोगानंतरही अनेक ज्येष्ठ व्यक्ती ‘विवेकानंदां’ना भेटताना खाली वाकून प्रणाम करत होत्या.
एक अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे आज ‘द लॉस्ट सपर’ हे नाटक इंग्रजी भाषेतून होत राहील. महाराष्ट्र सोडून कोलकत्ता, दार्जिलिंग आणि दिल्ली इथे याचे प्रयोग लवकरच संपन्न होणार आहेत. आणि आणखी एक अत्यानंदाची गोष्ट म्हणजे 12 जानेवारी 2026 या दिवशी ‘द लॉस्ट सपर’ हे नाटक मराठीतून सादर होणार आहे. आपल्या मातृभाषेतून ते अनुभवण्याची संधी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘द लॉस्ट सपर’ टीमचे मनापासून आभार. 12 जानेवारीच्या प्रतीक्षेत...
दीपा देशमुख
Add new comment