व्‍हेअर इज एसएसएस?

व्‍हेअर इज एसएसएस?

व्‍हेअर इज एसएसएस?
सतरंगी प्लॅटफॉर्म  आणि मानसरंग प्रस्तुत ‘व्‍हेअर इज एसएसएस?’ हा नाट्यप्रयोग खरं तर द बॉक्स इथे बघितला होता. पण एका दिवसांत अनेक नाटकं बघितली, की त्याचा नीटसा आस्वाद घेता येत नाही. नाटक चांगलं झालं इतकंच काय ते लक्षात राहिलं होतं. मात्र त्याचा पुन्हा प्रयोग पंचवटी पाषाण इथे नयन कुलकर्णी या माझ्या मैत्रिणीकडे असल्याचं कळलं आणि निमंत्रणही मिळालं. त्यामुळे अगदी वेळेत मी तिच्याकडे पोहोचले.
नयनच्या बंगल्यात या नाट्यप्रयोगासाठी अतिशय नेमकं आणि नेटकं नेपथ्य केलं होतं. आहे त्या जागेचा अतिशय चांगला उपयोग दिग्दर्शकाने केला होता. जमलेले सर्व निमंत्रित आतुरतेने प्रयोग सुरू होण्याची वाट बघत होते. नाटक सुरू झालं आणि ते कधी संपलं तेही समजलं नाही.
‘व्‍हेअर इज एसएसएस?’ हे नाटक मनाचा वेध आणि शोध घेणारं असून या नाटकात काय घडतं? एक तरुण मुलगी - लहानपणी वडलांच्याच अत्याचाराला बळी पडलेली. तरुण वयात मल्टीपल पर्सनॅलिटी या विकाराशी झुंज देणारी....या मनोविकाराची सर्व लक्षणं झेलत जगणारी...कधी भीतीने पांढरीफटक पडणारी, तर कधी सर्वसामान्य मुलीसारखी काहीच न घडल्यासारखं सहज वावरणारी...हळूहळू तिला स्वत:चीही ओळख पटायला लागते. सामाजिक आणि मानसिक अडथळे बरोबर घेऊन तिचा प्रवास सुरू आहे.
हा प्रवास बघताना मानसिक आजार त्या व्‍यक्‍तीला किती असह्य आणि गांगरून टाकणारा असू शकतो हे नाटकातून पदोपदी दिसून येतं. लहानपणचे प्रसंग कधीही तिला भेडसावत समोर येतात, जे तिला खरे वाटत असतात. मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळे एकसंध जीवन जगण्यात अडथळे येत राहतात. सतत भयाच्या सावटाखाली दिवस कंठावे लागतात.
या नाटकातून धर्म आणि त्याचबरोबर लिंगभाव हाही विषय समोर येतो. आजही समाज याकडे कोणत्या नजरेने बघतो, त्याची तुच्छता, तिरस्कार, हेही दिसतं. नाटकाचा अतिशय कठीण असा विषय, पण त्याची हाताळणी दिग्दर्शकाने अतिशय वेगळ्या प्रकारे केली आहे. त्यामुळे नाटक प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचण्यात यशस्वी होतं. नेहमीचे नाटकाचे सगळे नियम त्याने तोडूनमोडून टाकले आहेत. पात्रं देखील आपल्या भूमिकेतून कधीही बाहेर येताना दिसतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन याचे प्रसिद्ध डॉयलॉग, त्याची गाणी यांचा अतिशय खुबीने यात उपयोग केला आहे. मर्द को दर्द नही होता या डॉयलॉगने तर विषयाची केलेली हाताळणी उंची गाठणारी आहे. नीला आसमा सो गया, ये कहाँ आ गये हम पासून तुने मेरा दूध पिया है तू बिल्कुल मेरे जैसा है ही सगळीच गाणी प्रत्यक्षात झालेल्या चित्रीकरणापेक्षा नाटकात जास्त समर्पक वाटतात. या गाण्यांना खरी जागा दिग्दर्शकाने दिली असं म्हणावं लागेल.
नाटकातली नायिका म्हणूया, ती सिद्धा आंधळे हिने आपली भूमिका अतिशय समरसून केली आहे. तिच्या मनात उडालेला गोंधळ, भीती, प्रेमभावना सारं काही तिने जिवंत केलंय. सोनूच्या भूमिकेतला संतोष या अभिनेत्याने अतिशय सशक्‍त अभिनय केला आहे. तर पित्याची आणि पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करणारा सुनील यानेही खूप चांगलं काम केलंय. पित्याचा क्रूरपणा असो, वा हतबलता असो दोन्हीही त्याने सहजपणे साकारली आहे. तसंच पोलिसामधला लोचटपणा, विशिष्ट प्रकारची लकब त्याने साधली आहे. त्याच्याबरोबर लेडी कॉन्स्टेबलची भूमिका साकारणारी समृद्धी खडके ही तर हुबेहूब पोलिस खात्यातलीच वाटते. दीप्ती जोशी या तरुणीने आपल्या भूमिकेत जान आणली आहे. तिच्यातला आत्मविश्वास, जीवनाला समजून त्याचा केलेला स्वीकार, प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढण्याची तयारी आणि सकारात्मक विचारपद्धती तिच्या प्रत्येक हालचालीतून जाणवते. कादंबरी आणि आलोक राजवाडे यांचं काम - त्याबद्दल काय बोलावं? कादंबरीच्या अभिनयात अत्यंत सहजता होती. मात्र आलोक राजवाडेने आपल्या नेहमीच्या पठडीतल्या भूमिकांमधून बाहेर येऊन वेगळी भूमिका साकारली आहे. या भूमिकेत त्याच्यातल्या कलाकाराची चुणूक दिसली. त्याने आपल्या आवाजाचं शेवटपर्यंत सांभाळलेलं बेअरिंग, त्याची हालचाल, स्टेजवरचा सहजसुंदर वावर, लकब, हे सगळंच बेहतरीन.
या सगळ्यांना एकत्र गुंफत नाटक बसवणारा जमीर - याचं कौतुक किती करावं असा प्रश्न मनाला पडलाय. अरे हो, या नाटकाचा लेखकही तोच आहे. इतकं कसदार लेखन आहे की त्याबद्दल बोलावं की दिग्दर्शनाबद्दल बोलावं? अतिशय गुंतागुंतीचा विषय त्याने कलात्मक रीतीने तर हाताळला आहेच, शिवाय तितक्याच परिणामकारकरित्या त्याने तो प्रेक्षकांपर्यत कसा पोहोचेल, त्यांना तो कसा उमगेल याची काळजीही घेतली आहे. आपलं अस्तित्व, आपलं लिंग, आपलं सामाजिक स्थान, आपले हक्‍क आणि अधिकार, आपली होणारी घुसमट, या सगळ्यांचा आवाज बनण्याचं काम या लिखाणाने आणि या नाटकाने केलं आहे. मनाच्या आत प्रवेश करून आतल्या अनेक गूढ बाबींना स्पर्श करण्याचं काम जमीरच्या लेखनाने केलं आहे. त्यामुळेच नाटक बघताना समोर दिसणारी पात्रं हा एकाच व्‍यक्‍तिमत्वाचा भाग आहेत, की ती सर्व पात्रं वेगवेगळी आहेत असा प्रश्न मनाला पडतो. तसंच या पात्रांद्वारे धर्म, लिंग, भेदभाव, असमानता, पूर्वग्रह, न्यूनंगड, फरफट, भय, या सगळ्या भावभावना आणि बाबी यांच्यावरही प्रखर भाष्य त्याने केलं आहे. यातले संवाद बघणाऱ्याची बौद्धिक उंची वाढवणारे आहेत. यातला विषय, संवाद विचार करायला भाग पाडणारे आहेत. प्रेक्षकाला अंर्तमनात डोकावून बघायला लावणारे आहेत.
नुकतंच नसिरूद्दिन शाहचं ‘द फादर’ हे अप्रतिम नाटक बघितलं. नाटक बघताना सतत जमीरच्या या नाटकाची आठवण होत होती. ती यासाठी की ‘द फादर’ च्या तोडीचा, तितक्याच उंचीचा ‘व्‍हेअर इज एसएसएस?’ हा नाट्यप्रयोग असून तो प्रत्येकाने बघायलाच हवा. या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग सर्वत्र व्‍हायला हवेत. माझ्या जाणिवा अधिक वृद्धिंगत होण्यासाठी, मी सतत सजग राहण्यासाठी, माझ्यातला करूणाभाव जिवंत राहण्यासाठी मी हे नाटक कितीदाही बघू शकते. तुम्हीही बघा.
दीपा देशमुख
adipaa@gmail,com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.