गालिब
गालिब
नयन या मैत्रिणीने फर्मान काढलं आणि मी तिच्याबरोबर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये भर पावसांत जाऊन पोहोचले. तोपर्यंत तिथे कुठलं नाटक आहे, कोणाचं आहे, कसं आहे याची मला काहीही माहिती नव्हती. अर्थातच आत गेल्यावर समजलं, व्यासपीठावर गालिबबद्दल काहीतरी होणार आहे. मनात आलं बहुतेक गालिबचे शेर यांचं वाचन विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे करणार असावेत. किंवा गालिबच्या आयुष्यावरचं नाटक असावं. मनातले तर्कविर्तक सुरू असतानाच पडदा वर गेला.
गालिब नाटकामध्ये मानव किर्लोस्कर हे एक अतिशय प्रसिद्ध साहित्यिक आणि त्यांची मुलगी इला पुण्यातल्या एका वाड्यात राहत असतात. मात्र आता मानव किर्लोस्कर यांचा मृत्यू होऊन महिना उलटला आहे. आपल्या वडिलांच्या अतिशय जवळ असलेल्या इलाला चांगलाच धक्का बसलेला आहे. तिला वडील दिसताहेत, ते तिच्याशी बोलताहेत. तिच्या वडिलांना गालिबवर एक कादंबरी लिहायची असते, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू होतो. खरं तर अखेरच्या काही दिवसांत त्यांची मानसिक स्थितीही बिघडलेली असते. ते लिहीत राहतात, पण ते खूप असंबद्ध असं लिहून ठेवलेलं असतं. इला आपलं शिक्षण अर्धवट सोडून वडिलांची काळजी घेत राहते. त्यांच्या मृत्यूने ती विचित्र आणि विक्षिप्त बनलेली दिसते. इलाची मोठी बहीण रेवा ही मुंबईला नोकरी करून आपल्या वडिलांचा आणि बहिणीचा खर्च चालवत असते. रेवा ही खूप प्रॅक्टिकल असते, तर इला खूपच भावनिक असते. या नाटकात अंगद नावाच्या एका तरुण साहित्यिकाचीही एन्ट्री आहे. हा अंगद मानव किर्लोस्करांचा शिष्य असून आज तो एक प्रथितयश लेखक म्हणून ओळखला जातो. त्याच्या कथेवर चित्रपटही बनत असतात. आपल्या आयुष्यात यश, प्रसिद्धी आणि पैसा असं त्याने कमावलेलं असतं.
नाटकाचं कथानक यापेक्षा जास्त सांगत नाही, पण नाटकात गालिबचा वापर मेटॅफरप्रमाणे केला आहे. नाटकात साहित्यिकाचं घर असल्यामुळे खूप पुस्तकं आहेत. वडिलांप्रमाणेच मुलीलाही साहित्याचं वेड आहे. दोघांची कवितेची, शब्दांची, शेरोशायरीची जी जुगलबंदी कानावर पडते ती खूपच आनंद देणारी आहे. या नाटकातले अनेक संवाद अतिशय सुरेख आहेत. उदाहरणार्थ, शून्य कितीही असले तरी ते सगळे मिळूनही शून्यच असतात. कितीही शून्य एकत्र केले, तरी एक मोठा असतो. किंवा जगातले सगळी संकुचित वृत्तीची माणसं एकत्र केली, तरी ती संकुचितच राहतात.
गालिबमध्ये रोजचं जगणं जगण्यासाठी मन मारून केलेला संघर्ष आहे, तडजोडी आहेत, पोकळी आहे, भीती आहे, असुरक्षितता आहे, पण याचबरोबर ही पात्रं स्वार्थी नाहीत, संकुचित नाहीत आणि खलनायकही नाहीत.
गालिब या नाटकात मानव किर्लोस्कर, इला, रेवा आणि अंगद ही चारच पात्रं आहेत. मानव किर्लोस्करच्या भूमिकेत गुरूराज अवधानी, इलाच्या भूमिकेत गौतमी देशपांडे, अंगद आहे विराजस कुलकर्णी, रेवाच्या भूमिकेत अश्विनी जोशी यांनी अप्रतिम कामं केली आहेत. ही सगळी पात्रं पुढे काय घडणार याची उत्कंठा वाढवत राहतात, तसंच ती प्रेक्षकांना सतत आपल्यामध्ये गुंतवून ठेवतात. पडदा उघडतो, तेव्हा वाड्याचा सेट दिसतो, तो लाजबाब आहे. आणि त्या वाड्याच्या समोर असलेलं कारंजं तर ‘क्या बात है’ असं. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य एकदम भारी. हे नाटक चिन्मय मांडलेकर याने लिहिलं आहे आणि दिग्दर्शितही केलं आहे. लिखाण आणि दिग्दर्शन खरोखरंच शब्द नाहीत.
विराजसचा सहज स्वाभाविक अभिनय या नाटकाचं वैशिष्ट्य आहे (अंगद बघताना मला आमच्या कल्याण टांकसाळेची आवर्जून आठवण आली.), तर गौतमीने इलाला अक्षरश: जिवंत केलंय. इला आणि मानव यांच्यातलं बाप-लेकीचं नातं बघताना नात्यांमधल्या सच्चेपणाविषयीचा विश्वास दृढ होत जातो. मानव आपल्या लेकीला कळत नकळत अनेक गोष्टी सांगत राहतो, शिकवत राहतो. यशस्वी होणं आणि एखादी गोष्ट झपाटून साध्य करणं यातला फरक तो सांगतो. वेगळ्या वाटेने चालणाऱ्या माणसांविषयी तो भाष्य करतो. त्याचप्रमाणे अंगद आपल्या आयुष्यात लौकिकार्थाने यशस्वी झालेला असला, तरी त्याला आपल्या क्षमता आणि मर्यादा नीट ठाऊक आहेत.
खूप दिवसांनी एक नितांत सुंदर नाटक बघता आलं याचा खूप खूप आनंद झाला. मी सगळ्यांना आग्रह करून म्हणेन, 24 एप्रिलला गालिब हे नाटक बालगंधर्वला दुपारी आणि रात्री यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. ‘गालिब’ हे नाटक नक्की बघा.
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail,com
Add new comment