Khupsa

Khupsa

काय झालं? कसं झालं? कवा झालं?
व्‍यक्‍ती निर्मित, धनंजय सरदेशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘खुपसा डायरीज’ चा अनुभव काल मुक्‍त थिएटर, धायरी इथे घेतला. 
तुम्ही इचाराल, खुपसा डायरीज हे अभिवाचन आहे का? अजेब्बात नाही. बरं मग कथाकथन आहे का? अर्रर्र, ते तर नाहीच नाही. मंग नाटक आहे का?...नाय, नाय नाटक तर मुळीच नाही. मग मग काय आहे खुपसा डायरीज?
खुपसा या नावातच खूप मज्जा आहे आणि ती जाणून घेण्यासाठी खुपसा डायरीज बघणं/ऐकणं/अनुभवणं खूप आवश्यक आहे.
सध्या वातावरण पार गडबडून गेलेलं आहे. युद्ध सुरू आहे, देशादेशांमधली अस्थिर परिस्थिती मनाला अस्वस्थ करत आहे. देशात जाऊ देत, पण अगदी आपल्या आसपास, आपल्या घरात किती मतंमतांतरं आहेत. बाहेर पडावं, तर जात, धर्म, कर्मकांडं यांच्यावरून अस्मिता आग्रही होत चालल्या आहेत. अशा वेळी निखळ आनंदाचा अनुभव घ्यायचा म्हणून नव्‍यानंच सुरू झालेल्या धायरीतल्या मुक्‍त थिएटरकडे पावलं वळली.
सुदर्शन आणि बॉक्सची आठवण यावी तसं हे धायरीतलं मुक्‍त थिएटर. पहिली घंटा वाजेपर्यंत बायाबापे सगळे ताटकळत बाहेर उभे राहिले. मग एकदाची, म्हणजे तशी वेळेतच पहिली घंटा वाजली आणि आम्ही चपळाईने आत शिरून पहिल्या रांगेतल्या खुर्च्यावरची जागा पटकावली.
डॉ. श्रीकांत शिवाजी आणि धनंजय या अभिनेत्यांनी रंगमंचावर आगमन केलं. एन्ट्रीलाच टाळ्या पडल्या की. मग बघता बघता श्रीकांतच्या तात्या विंचूने धमाल आणली. तात्या विंचूच्या करामती आणि एकूणच गावातल्या मंडळींचा इपितरपणा श्रीकांतच्या देहबोलीतून, संवादातून आमच्यापर्यंत पोहोचत होता. समोरचे बहुतांश प्रेक्षक मराठवाड्याचे असल्यामुळे तर कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. कारण या जिवाचे त्या जिवाला कळले हो, अशी अवस्था झाली.
धनूबद्दल काय बोलावं? म्हणजे धनंजय सरदेशपांडेंबद्दल? अकरावीपासूनचा हा घट्ट मैत्री असलेला मित्र. अभिनयाशी आपली नाळ तुटू न दिलेला, महत्वाकांक्षी नसलेला, स्पर्धेत धावण्यास अजिबात उत्सुक नसलेला, थोडक्यात आजच्या जगात न शोभणारा सरळ, साधा, असा धनू. त्याला त्याची बलंस्थानं माहीत आहेत, तशा आपल्या मर्यादाही तो जाणून आहे. मात्र या क्षेत्रात तो अखंडपणे चालतो आहे, ती त्याची पॅशन आहे.
आज, खुपसाच्या निमित्ताने भेटलेला धनू वेगळाच होता. धनूच्या अभिनयात खूपच वैविध्य होतं. तुलना करायची नाही, पण लक्ष्मण देशपांडेंच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ला ची आठवण येऊन गेली. इतकी वेगवेगळ्या प्रकारची पात्रं, नव्‍हे आख्खा गावच धनूने आमच्यासमोर आणून उभा केला. धनू, निखळपणा, आनंद याबरोबरच तू माणसाच्या स्वभावातल्या विविध छटा अचूकपणे हेरल्यास आणि उभ्या केल्यास. जुग जुग जियो मित्रा. खरं सांगू मराठवाड्याची संस्कृती तू खुपसामधून उभी करतो आहेस. खुपसामधले शब्द, वाक्प्रचार, म्हणी, रोजच्या बोलीभाषेचे विविधरंगी अविष्कार तुम्ही दोघांनी सादर केले, जिवंत केले.
प्रकाशयोजना, काश्च्युम, मेकअप, नेपथ्य सर्वकाही समर्पक होतं. थोडं सुरुवातीचं संगीत मात्र खटकलं. त्यात बदल करण्यास जागा आहे असं वाटतं. अर्थात हे वैयक्‍तिक मत आहे. कालचा शो हाऊसफुल्ल होताच, मुंबई, पुण्यातले वेगवेगळे भाग, सेलू, अहो, आख्ख्या महाराष्ट्रातून माणसं आली होती. विशेष म्हणजे एक मराठवाडा समोर रंगमंचावर होता, तर दुसरा मराठवाडा प्रेक्षकांत! त्यातच ‘खुपसा’ सुरू असताना आजुबाजूच्या प्रतिक्रिया इतक्या उत्स्फूर्तपणे येत होत्या, की मी समोरची घडणारी दृश्यं बघू, की प्रतिक्रिया देणाऱ्यांचे अंधारातले चेहरे न्याहाळू अशी माझी स्थिती झाली होती. पण एकूणच खूप मजा आली. 
खुपसा, टीमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचे प्रयोग असेच रंगत राहोत आणि आनंद पेरत राहोत हीच मनापासून सदिच्छा.
(टीप - खुपसा डायरीजचे प्रयोग तुम्ही सुद्धा हॉलमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, अगदी एखाद्याच्या घरी करू शकता. जरूर हा कार्यक्रम आयोजित करा आणि खुपसामध्ये सामील व्‍हा.)
दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.