ठकीशी संवाद
ठकीशी संवाद
आत्ताच डॉ. श्रीराम लागू रंग-अवकाश मध्ये एक अप्रतिम नाट्यप्रयोग बघून आले. झालं असं, की आमचा मित्र जमीर, नयन आणि मी ज्योत्स्ना भोळे सभागृहात सकाळी अकराच्या शोसाठी पोहोचलो.
कोरोनाने सर्वांनाच वाळीत टाकलेला काळ आणि त्यात एक पंचाहत्तरीचे गृहस्थ प्रेक्षकांशी (नव्हे, स्वत:शी आणि नंतर ठकीशी) संवाद साधताहेत असं दृश्य. एकटेपणावर भाष्य करतानाच त्यांच्या संभाषणात ठकी नावाचं पात्र येतं आणि काहीच वेळात तीही मंचावर अवतरते....नको गोष्ट सांगायलाच नको, आणि तशी ही गोष्ट नाहीच्चै मुळी. मग काय आहे या नाटकात?
यात आहे कोरोनाचा काळ...यात आहे राम गणेश गडकरी आणि दिवाकर यांचा संवाद आणि स्नेह, दिवाकरांची नाट्यछटा देखील.....यात आहे व्ही शांताराम यांच्या चित्रपटांचा काळ, यात आहेत जग हे बंदीशाळापासून अनेक सुश्राव्य गाणी....यात आहे भारताचा इतिहास, जगाचा इतिहास....यात आहे ॲलेक्झांडर दी ग्रेट, यात आहे हिटलर, यात आहेत नेहरू, गांधी, टिळक, टागोर, आईन्स्टाईन....यात आहेत अटलबिहारी बाजपेयी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अडाणी, शहा....यात आहे सावरकर आणि त्यांचं संस्मरणीय असं काव्य जयस्तुते....यात आहेत दंगे, यात आहेत बॉम्बस्फोट... यात आहे राजकीय व्यवस्था, यात आहे अस्वस्थता...यात आहे भूमिका न घेणारे तुम्ही-आम्ही....यात आहे ग्लोबलायझेशन आणि त्याचा आयुष्यातला शिरकाव...यात आहे संवेदना हरवत चाललेले आपण...यात आहे साहित्य, यात आहे संस्कृती,...यात आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, यात आहे व्हर्च्युअल जग...यात आहे निरर्थकपणे सुरू असलेलं काम....यात आहे 2014 नंतरची परिस्थिती....यात आपल्याला काय म्हणायचंय याचा आवाज आपल्यालाही ऐकू येतोय की नाही कुणास ठाऊक, आपल्याला काय म्हणायचंय हे देखील कोणीतरी ठरवून टाकलंय.... यात आहे करगोटा हे मेटॅफर....ते आपल्यापासून पार जगाला स्पर्श करून येतं.
सतीश आळेकर यांच्या लेखणीतून उतरलेला संवाद ठकीशी नसून तो आपल्या प्रत्येकाशी आहे. हा संवाद विचारात पाडणारा आहे. आपल्याला आरसा दाखवणारा आहे. करमणूक आहे, पण तिच्याबरोबर प्रवास करताना एक ठसठसणारं वास्तवही आहे.
सुव्रत जोशी आणि गिरीजा गोडबोले यांच्या अतिशय अप्रतिम अशा अभिनयातून साकारलेलं हे नाट्य अनुभवायला हवं. अनुपम बर्वे याचं उत्तम दिग्दर्शन. खरं तर सतीश आळेकरांच्या ठकीशी संवाद या संहितेचं दिग्दर्शन करणं जितकं आव्हानात्मक होतं, तितकंच त्यातल्या पात्रांचा अभिनयही. मात्र हे आव्हान या तिघांनीही लीलया पेललं आहे. सुव्रत जोशीने एका वृद्धाचं पात्र वठवताना जो बॅलन्स शेवटपर्यंत राखलाय, त्याला तोड नाही. गिरीजाचं मंचावरचं वावरणं, तिचा सुरेल आवाज, तिचं ‘धनी’ म्हणणं आणि त्यातलेही व्हेरिएशन्स...लाजवाब! (गिरीजाने ठकीची भूमिका अप्रतिम वठवली आहेच, मात्र याच वेळी आपण ॲलेक्सा, सिरी यासारखंचं एखाद्या ठकीशी नातं जोडून बसताना वास्तवाशी नाळ तोडू का ही भीतीही मनाला सतावत राहते.) सतीश आळेकरांसारखा दिग्गज नाटककार, आणि त्यांच्यासोबत तितक्याच ताकदीने उभी असलेली ही तरुणाई....खूप अप्रतिम असं हे टीमवर्क आहे.
सलग नसलेला, पण तरीही तुकड्यांनी जोडून त्याचा एकसंध कोलाज करत चालणारा हा ठकीशी संवाद मला खूप आवडला. एकदाच नव्हे तर हा दोन अंकी नाट्यप्रयोग पुन्हा बघावासा वाटतो आहे आणि अर्थात बघणारही आहे. तुम्हाला हे नाटक बघायचं असेल, तर आज, उद्या अणि परवा सायंकाळी 7 वाजता डॉ. श्रीराम लागू रंग-अवकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृह, पुणे इथे. तिकिट विक्री बुक माय शो वर उपलब्ध.
दीपा देशमुख, पुणे
Add new comment