तुमचे आमचे सुपरहिरो - पद्मश्री अरविंद गुप्ता
तुमचे आमचे सुपरहिरो - पद्मश्री अरविंद गुप्ता
अरविंद गुप्ता यांना नुकताच महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच त्यांना भारत सरकारनं पद्मश्री जाहीर करून सन्मानित केलं आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन! अफाट बुद्धिमत्ता लाभलेल्या अरविंद गुप्ता यांनी कानपूर आयआयटीमधून अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळवली. पण नंतरच्या उत्तम नोकरीकडे आणि आर्थिक सुबत्तेकडे त्यांनी पाठ फिरवली. देशातली गरिबी आणि बेकारी यांच्या प्रश्नानं अस्वस्थ होत अनेक सेवाभावी कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. कामगारांच्या मुलांसाठी, खेड्यापाड्यातल्या गरीब मुलांसाठी त्यांनी शाळा चालवल्या. अतिशय सोप्या पद्धतीनं विज्ञानातले प्रयोग शिकवत मुलांना विज्ञानाची गोडी लावली. अतिशय अल्प किमतीत आणि टाकाऊ वस्तू यामधून सहजपणे तयार होणारी सोपी वैज्ञानिक खेळणी बनवली. मुलांसाठी अनेक पुस्तकं लिहिली आणि अनुवादित केली. आपल्या जगण्यातून साधेपणानं, आनंदानं, मनापासून मनासारखं जगण्याचा वेगळा श्रीमंत आणि समृद्ध मार्ग त्यांनी दाखवला.
आपलं संपूर्ण आयुष्य अरविंद गुप्ता यांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी घालवलं. विज्ञान हा जगण्याचा भाग झालं पाहिजे आणि ते लहान वयातच रुजलं पाहिजे याचा ध्यास घेतला. असा माणूस विरळाच! निर्मळ, निर्मोही असा हा वैज्ञानिक, संशोधक - खरोखरंच तुमचा आमचा खराखुरा सुपरहिरो आहे. माझं स्वतंत्रपणे प्रसिद्ध झालेलं पहिलं पुस्तक म्हणजे 'तुमचे आमचे सुपरहिरो' मालिकेतलं - 'अरविंद गुप्ता -मुलांसाठी झटणारा जगावेगळा विज्ञानवेडा जादूगार!' हे पुस्तक लिहिताना मला खूप खूप समाधान मिळालं. या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कारही मिळाला. जीनियस लिहिताना, वारंवार त्यांच्याशी चर्चा करता आली. विशेषतः भारतीय जीनियस निवडतानाही त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. इतकंच नाही तर पुस्तकाचं ले-आऊट कसं असावं, आतली चित्रं कशी असावीत यावरही त्यांनी उपयुक्त सूचना दिल्या. त्यांनी आत्मीयतेनं दिलेल्या सूचनांचा आम्हाला उपयोगच झाला.
आज अरविंद गुप्ता यांना पद्मश्री जाहीर झाल्यामुळे खूप खूप आनंद झालाय. ते म्हणतात ः ‘इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक बुद्धिजीवीची आणि शिक्षकाची एक छोटीशी भूमिका आहे. आपल्या सगळ्यांना मिळून सर्वप्रथम उपजाऊ माती तयार करायची आहे. कारण उपजाऊ माती नसेल, तर फूल कसे उगवणार? त्यामुळे ही कोणा एकट्याची जबाबदारी नाही, तर ती सर्वांची जबाबदारी आहे. जेव्हा उपजाऊ माती तयार होईल, तेव्हाच लाखो फुलं फुलतील आणि त्यांचा सुगंध आसमंतात भरून राहील.’
दीपा देशमुख,
२६ जानेवारी २०१८.
Add new comment