सुधीर महाबळ, विलेपारले मुंबई

सुधीर महाबळ, विलेपारले मुंबई

मानवतेच्या इतिहासाचे आणि विज्ञानविश्वाचे विलोभनीय दर्शन घडवणारे बारा “जीनियस” 
“जीनियस” – अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित, "कॅनव्हास" या चित्रशिल्प ग्रंथानंतर मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारा बारा पुस्तकांचा संच ‘हा मानवतेच्या इतिहासाचे एक विलोभनीय दर्शन घडवणारा एक अद्वितीय, अभूतपूर्व असा प्रकार आहे’, असं म्हणणे चुकीचे होणार नाही.

डोळ्यांना दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म जीवांपासून ते अणुरेणूच्या अगम्य हालचालीपर्यंत आणि सूर्य, पृथ्वी चंद्रांपासून ते इतर ग्रह ताऱ्यांच्या चलनवलनांची शास्त्रशुद्ध गणितीक प्रमेय मांडणाऱ्या वैज्ञानिकांच्या चरित्रांची आणि त्यांच्या शोधकार्याची ही मांदियाळी आहे. अगदी साध्या, सोप्या, रसाळ पद्धतीने केलेली ही मांडणी वाचकाला अंतर्मुख करायला लावेल ह्यात शंका नाही. गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, हॉकिंग, जेन्नर, पाश्चर, कॉख, फ्लेमिंग, क्युरी, माईटनर, ओपेनहायमर आणि फाईनमन ह्या बारा शास्त्रज्ञांच्या चरित्रांचा आणि शोधकार्याबरोबरच्या प्रवासाचा  एक उभा / आडवा छेद घेऊन बघितला तर काहीकाही बाबतीत अतिशय आश्चर्यकारक साम्यस्थळे आढळतात. पैकी एक म्हणजे, त्यांच्या ध्येयाप्रती असलेली अविचल निष्ठा. दुसरे, प्रस्थापित समाजाकडून, कुटुंबियांकडून झालेला जीवघेणा विरोध, आर्थिक बाबींमुळे होणारी असह्य घुसमट आणि कुचंबणा, तिसरे म्हणजे आपली मते मांडताना त्यांनी दाखवलेला ठामपणा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अखंड मानवजातीच्या कल्याणार्थ आपल्या संशोधनाचे दालन खुले करून देण्यामागची विश्वात्मक तळमळ आणि एक अत्यंत उदात्त हेतुशुद्धता.

एक प्रश्न असा तिरकसपणे विचारता येऊ शकतो की, ‘हे सगळे महाभाग दोन-तीनशे वर्षापूर्वीचे. आज त्यांच्या कार्याची दखल घेण्यामागची उपयुक्तता काय?’ उत्तर अगदी साधे आहे. ही चरित्रे तर प्रेरणादायी आहेतच, पण त्यांनी केलेली संशोधनं उर्जेने ठासून भरलेली आहेत. न्यूटन किंवा आईनस्टाईन सारखी बुद्धिमत्ता प्रत्येकाकडे असण्याची अपेक्षा तरी का करावी? परंतू आज दुर्गम प्रदेशातला एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अमुक एक विषय समजून घेण्यासाठी झगडा करत असेल तर निराश होण्याची गरज नाही. एखादी गृहिणी कित्येक समझोते करून संसार करत असेल आणि विविध स्वरूपाच्या नवनवीन संकटांना तोंड देतादेता मेटाकुटीला येत असेल तरी स्वतःच्या विवेकशक्तीची आणि सारासार विचार करण्याची कास न सोडता, चांगुलपणाचा मार्ग अनुसरत राहण्याची उर्मी मिळवू शकेल. आजच्या माणसाचे जगणे इतके गुंतागुंतीचे आहे. योग्यायोग्यतेची, तथाकथित नैतिकतेची, सामाजिक व्यवहाराची दडपणे श्वास गुदमरवून टाकणारी आहेत. रोजचे जगणे किमान सुखकर झाले तरी पुष्कळ झाले असे वाटण्यासारखी परिस्थिती असताना, संपूर्ण मानवजातीच्या भल्याचा वगैरे विचार कुठून यावा? अशी निराशाजनक परिस्थिती असूनही ह्याच पृथ्वीतलावर असेही ग्रेट लोक होऊन गेले. आपल्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक खस्ता त्यांनी खाल्ल्या. ह्या शास्त्रज्ञांच्या मुलभूत संशोधनामुळे आपले कित्येक कष्ट कमी झाले आहेत, जीवघेण्या साथींच्या रोगांपासून आपण मुक्त झाले आहोत. भविष्यात येणाऱ्या संभाव्य रोगांच्या बाबतीत लस कशी शोधावी, प्रयोग कसे करावेत ह्याचा रोड-मॅप ह्या थोर लोकांनी आखून दिला, हे ऋण फार मोठे आहे. एक सशक्त आशावाद तेवता ठेवण्याची ताकद मला ह्या “जीनियस” लोकांच्या चरित्रातून मिळू शकते.

शालेय अभ्यासक्रमात भेटणारे हे शास्त्रज्ञ दुर्दैवाने निव्वळ ‘मार्कांच्या’ टरफलात दडून राहतात. वार्षिक परीक्षेचा हंगाम संपला की, ‘टरफलं’ आणि ‘दाणे’ सगळच उडून जातं! कायमस्वरूपी संस्कार करणारे, मनावर ओरखडे उमटवणारे, अंतर्मुख करायला लावणारे काहीच उरत नाही. जीनियसच्या ह्या संचाच्या वाचनातून नेमके तेच साध्य होणार आहे आणि म्हणूनच ही फार मोठी उपलब्धी ठरेल. शालेय अभ्यासक्रमाबरोबर एखाद्या शाळेतल्या गुरुजींनी लुई पाश्चर किंवा स्टीफन हॉकिंग वाचून दाखवल्यास शाळेच्या धड्यातला तोच शास्त्रज्ञ एकदम वेगळा वाटू शकेल.

जीनियसमध्ये जगण्याबरोबर त्यांचे शोधकार्य असे काही गुंफले आहे की जणू काही आपण एक रसाळ गोष्ट ऐकतो आहोत असे वाटते आणि वाचून होताच अरेच्च्या यातले विज्ञान इतके सोपे होते तर? अशी भावना मनात निर्माण होते. ज्यांनी ह्याच लेखकाचे “किमयागार” वाचले असेल त्यांना जीनियस ही त्यापुढची एक पायरी वाटेल! एका बाजूला युगप्रवर्तक शोध लावणारे हे वैज्ञानिक दुसऱ्या बाजूस माणूस म्हणून तुमच्या आमच्यासारखे विकारांनी ग्रासलेले होते, हे देखील अतिशय संयतपणे मांडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे भंजन होणार नाही इतपत दक्षता लेखकद्वयीने घेतली आहे, हे ही कौतुकास्पद.

"ह्या निमित्ताने, थोडेसे ह्या लेखकांविषयी – स्थूलमानाने पाहता कथा, लघुकथा, कादंबरी, कविता अशा प्रकारच्या ललित पद्धतीचे लिखाण काळाच्या विविध टप्प्यांवर मराठी साहित्यात सतत येताना दिसते. त्या त्या काळातल्या समाजमनाचे प्रतिबिंब त्यात उमटत जाते. साहजिकच त्याला लोकाश्रय मिळतो. राजाश्रय मिळतो. पुरस्कार मिळतात. त्यामुळेच त्यात नवनवीन भर घालणारे येताना दिसतात. एखादी भाषा वाहती राहण्याच्या दृष्टीने ते आवश्यक देखील आहे. पण विज्ञान, वैज्ञानिक, चित्रकार, शिल्पकार, कलाकार जेव्हा आपल्या उच्च कोटीच्या प्रतिभेचे आविष्करण समाजासमोर मांडतात तेव्हा ते अमुक एका देशाचे, समाजाचे किंवा विशिष्ट कालखंडाचे देखील उरत नाहीत. ते विश्वात्मक होतात. त्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी, सुखं-दुखांविषयी सर्वसामान्य लोकांपर्यंत, आपल्या स्वतःच्या सोप्या, रसाळ भाषेतून पोचवण्याचे एक फार महत्वाचे कार्य सातत्याने अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख करत आहेत. मराठी साहित्याला अशा प्रकारच्या लिखाणाची नवी पायवाट घालून देण्याचे कार्य ह्या लेखकांचे आहे. सौंदर्याची आवड प्रत्येकालाच असते. सौंदर्य कशाकशा मध्ये दिसू शकते? स्वांतत्र्यवीर सावरकरांचे शब्द उसने घ्यायचे तर, “जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधूर ते ते...” सर्वसामान्य वाचकाच्या सौन्दर्यविषयक जाणीवा निर्माण करणे आणि नंतर त्या प्रगल्भ करणे असे हे कार्य आहे. त्याचा यथोचित स्वागत करणे, हे आपले कार्य..... अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांच्या  ह्या अपार मेहनतीला आणि स्वच्छ हेतूला प्रणाम!!"  
एकूणच अत्यंत उच्च निर्मितीमूल्य परंपरेने सांभाळत ‘मनोविकास’ने अजून एक दर्जेदार प्रकाशन उपलब्ध करून देतानाच २० रुपयाचे योगदान दुष्काळग्रस्तांना देण्यातले सामाजिक भान दाखवले आहे त्याचेही कौतुक करायलाच हवे.                            

सुधीर महाबळ, मुंबई  
sudheer.mahabal@gmail.com