योगेश फडतरे
काही माणसे आपल्या आयुष्यात आपल्या सोबतची वेव्हलेंथ भन्नाट जुळवून येतात. त्या माणसांची आपल्यावर पडणारी मोहिनी काहीतरी सॉल्लिड वेगळी असते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारची जादू असते. त्यांच्या लिहिण्यामध्ये जादू असते.
अशी एक जादुई ताई, आई की मैत्रीण माझ्या आयुष्यात मला पुस्तक रूपातून भेटत गेली. मी तिची अनेक पुस्तके पुन्हा पुन्हा वाचून काढली..ती माझी मैत्रीण..
तिच्यातलं कुतूहल जणू असं आहे की, ती तेरा चौदा वर्षांची अल्लड मुलगी आहे. तिच्यात प्रचंड उत्साह आहे. तिला या जगातल्या अद्भुताची भूक आहे. आणि ती भूक भागवण्यासाठी तिला गोष्टीतल्या भूतांची गरज लागत नाही. हे जगच इतकं अद्भुत आहे की, त्याचा विज्ञानाच्या आणि वैज्ञानिकांच्या मागोव्याने विचार केला आणि शोध घेतला तरी अद्भुतची भूक भागते.
तिने ही ज्ञानतृष्णा जिनीयस पुस्तकांतून स्वतःची तर भागवलीच पण समजाची पण भागवली.
या विज्ञानप्रवासात, लेखनप्रवासात तिला जे जे ज्ञान मिळत गेलं, ते ते ज्ञान ती कष्टाने, ध्यासपूर्वक, प्रयत्नाने पुढच्या पिढीसाठी तुमच्या माझ्यासारख्यांसाठी सोपं करून सांगत गेली आणि विज्ञाननिष्ठेने मांडत गेली.
जीनियसच्या छत्तीस पुस्तकातले सर्व शास्त्रज्ञ असोत किंवा तुमचे माझे सुपरहिरो असो. विज्ञान आणि वैज्ञानिक यांना मराठी भाषेत लोकप्रिय करण्याचं काम ती अथकपणे करत आली आहे. पण हे काम तिच्यासाठी काम नसतं. ते तिच्यासाठी आयुष्यामध्ये बागडण असतं. तिला लहान मुलांच्या उत्साहाने सर्व काही करायचं असतं. तिला लिहायचं असतं. तिला गायचं असतं. आयुष्यातलं सौंदर्य सगळीकडे शोधायचं असतं. तिला वाचायला आवडतं. पुस्तकांबद्दल लिहायला आवडतं. तिला सिनेमे पाहणे आवडतं. त्यातले बारकावे टिपत समजून घ्यायला आवडतं. तिला आयुष्य झऱ्यासारखं वाहत जगायला आवडतं. ती उत्साहाचा अखंड खळाळता झरा आहे.
मी तिला पाच वर्षांपासून ओळखतो. पण पर्वा आमची पहिली भेट झाली. खूप गप्पा मारल्या.
त्या गप्पांमधली दीपा ताई... त्या प्रगल्भ आदरणीय अनेकविध पुस्तकांच्या लेखिका ते ती दीपा ताई तिच्यात दडलेली टूणटूणीत गोजिरी खेळकर गप्पा मारणारी लहान मुलगी..
माझ्या आयुष्यातल्या सुंदर सुंदर दिवसांपैकी एक दिवस.. दीपा ताईच्या भेटीचा दिवस...
त्या भेटीबद्दलही लिहायचं आहे.. एखाद्या सिनेवेड्याने दीपिका पादुकोणला भेटावं आणि त्याला जसा आनंद व्हावा तसा मोठ्ठा आनंद या दीपा भेटीचा होता..
योगेश फडतरे