सुमेधा गंगाखेडकर

सुमेधा गंगाखेडकर

७वी माळ
Il पद्मासन स्थिते देवी परब्रम्ह स्वरूपिणी
परमेशि जगन्मांतरम महालक्ष्मी नमोस्तूते ll
आज एक देदिप्यमान व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे.
अच्युत गोडबोले हे नाव मला 1998.. 1999 पासून माहीत
होते. लोकसत्ते च्या पुरवणी चतुरंग किंवा लोकरंग मध्ये त्यांचे
प्रसिद्ध होणार सर्व लेख मी दोनदा तरी वाचत असे. त्यांच्या
लिखाणाचे वाचन करायचे मला व्यसन लागले होते. त्यानंतर
माझ्या वाचनात आले किमयागार व मुसाफीर मग काय मी तर
त्यांची चाहतीच झाले.नंतर कॅनव्हास आले आणि अच्युत
गोडबोले यांच्या बरोबर लेखिका म्हणून नाव होते दीपा
देशमुख. त्यावेळी खूप कुतूहल वाटायचे दीपा देशमुख इतक्या
मोठ्या व्यक्तीच्या कशी काय संपर्कात आली. ही सुवर्णसंधी
तिला कशी मिळाली? म्हणतात ना पृथ्वी गोल आहे. तशी
एक दिवशी माझी व दीपाची ओळख झाली.
मी वाचन प्रेमी व ती प्रसिद्ध लेखिका मैत्री व्हायला एव्हढा
धागा पुरा झाला. तुमचे आमचे सुपर हीरो चे 7 भाग लिहिणारी,
जिनीयस, सिंफनी, कँनव्हास, गुजगोष्टी चे लेखन करणारी
लेखिका. तिची आणि माझी मैत्री झाली म्हणजे माझे स्वप्न
सत्यात उतरले होते.
दीपा लहानपणापासूनच खूप मनस्वी आणि हळवी होती.
आपल्याला काय वाटते ते समोरच्याने ओळखले पाहिजे असे
तिला वाटे. तिसरीत असल्यापासून डायरी लिहायची सवय
लागली. आपल्याला आवडलेल्या, न आवडलेल्या सगळ्या गोष्टी
ती लिहून ठेवत असे. घरात भरपूर पुस्तके होती. त्यामुळे ती
सतत वाचन करत असे. कथा, कविता, गझल करत असे. त्याच
बरोबर तिला पेंटिंग, शिवणकाम, सुतारकाम, इलेक्टरीशीयनचे,
काम बघण्यात, करण्यात खूप आवड होती. लहान वयातच ती
कपडे शिवायला लागली आणि आजही ती स्वतःचे ड्रेसेस,
साडीवरचे ब्लाऊज, साडीला फॉल .. सगळ तीच शिवते.
तसेच ती संगीत विशारद पण आहे. काय काय काम केली
असतील या मुलीने शाळेत असताना, कॉलेज मध्ये असताना
शाळा कॉलेज मधून निघणाऱ्या मासिकांचे संपादक पद,
नाटकात कामे, आकाशवाणी औरंगाबाद मध्ये युवावाणीचे
कार्यक्रम करत होती. युवकांसाठी नाटक लिहिणे, सादर करणे.
तसेच योगा क्लासेस घेतले, ब्युटी पार्लर चालवले, कम्प्युटर
शिकली, एकलव्य पब्लिकेशनमध्ये कंटेट क्रिएटर म्हणून काम
केले. याच दरम्यान बर्‍याच स्त्रियांच्या आयुष्यात येतात त्या
समस्यांना ती पण तोंड देत होती. त्या सर्व समस्यांवर स्वार
होऊन ती आपला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होती. चाचपडत होती,
एक दिवस तिला मार्ग सापडला. तो मार्ग देखील
सुखकर नव्हता. पण तिने आव्हान स्विकारले. ठाणे जिल्ह्यातील
मासवण या आदिवासी पाड्यात शिक्षण विभाग प्रमुख म्हणून
जायचे. ह्या एका निर्णयामुळे ती जिंकली व कधीच मागे वळून
बघायची वेळ आली नाही.
मासवणचा अनुभव तिच्या साठी खूप कठीण होता. हिने
कामाची सूत्र तर हाती घेतली. साल होते 2007...तेथील 15
गावात 78 पाड्यांवर काम करायचे होते. दोन लहान खोल्यां
भाड्याने घेतल्या होत्या. सतत साप, विंचू आजुबाजुला घरात
वावरत असत त्यातून 8 तास म्हणजे सकाळी चार तास
संध्याकाळी चार तास लोड शेडिंग. पावसाळ्यात तर सूर्या नदीला
पूर आला की इतर सगळ्या गावांशी सबंध तुटत असे. मोबाईल
फोन नव्हते, टॉवरच नव्हते. खेडे कधी बघितले नव्हते. शारीरिक
कष्टाची फारशी सवय नव्हती. पण हिने काम सुरू केले.
हळू हळू सगळे गावकरी बोलू लागले. कार्यकर्ते जवळ आले
आणि कामाला गती आली. तीन वर्षे या ठिकाणी काम केले.
समाजकार्यासाठी नावाजलेली बरीच मंडळी आदिवासी
भागातले काम बघायला यायचे. त्यातूनच ओळखी वाढत गेल्या.
कामाने आत्मविश्वास दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई
ची कार्यकर्ती होतीच,औरंगाबाद मध्ये स्त्रियांसाठी काही काळ
कामही केले होते. मुंबईत सुटीच्या दिवशी जावून यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चा सामाजिक कार्यकर्ता कोर्स केला.
अशीच एकदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या एका
कार्यक्रमात डॉ अच्युत गोडबोले यांची भेट झाली. तू कुठे काम
करतेस, काय करतेस? असे त्यांनी विचारले. त्यांना तिच्या
कामाचे स्वरूप आवडले व एक दिवस ते मासवणला गेले. तेव्हा
दीपाने त्यांना सर्व गोष्टी दाखवल्या. कसे व काय करते ते
दाखवले. मी लिहिते, कविता करते, गाणे म्हणते व मला
कॉम्प्युटरचे तर खूप छान ज्ञान आहे. मी फोटोशॉप करते, तिचे
बोलणे ऐकल्यावर गोडबोले सरांनी तिचे लिखाण वाचले आणि
मला माझ्या लिखाणात मदत करशील का? असे विचारले.
त्यानंतर दीपा ने होकार देत त्यांच्या सर्व लिखाणात प्रत्यक्ष
लिखाणापासून मुखपृष्ठ करण्यापासून सर्व प्रकारची मदत
करायला सुरुवात केली.
मासवणला असताना मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव
आंदोलनातही भाग घेतला होता.
तीन वर्षे मासवण मध्ये काम केल्या नंतर ती मुंबईत
डॉ बंग दाम्पत्यांनी युवकांसाठी सुरू असलेल्या "निर्माण" आणि
कुमारवयीन मुलांसाठीच्या "कुमार निर्माण" या उपक्रमात
समन्वयक म्हणुन काम केले. याच दरम्यान मनोविकास प्रकाशन
तर्फे "तुमचे आमचे सुपरहिरो" या मालिकेत डॉ अरविंद गुप्ता, डॉ
आनंद नाडकर्णी, डॉ प्रकाश आमटे, डॉ अनिल अवचट, अच्युत
गोडबोले, डॉ ज्ञानेश्वर मुळे व डॉ. रवी बापट यांचे आयुष्य आणि
कार्य या वर आधारित 7 पुस्तके आली.
आता फक्त मदतच नाही तर सुरू झाला दीपा देशमुख चा
अच्युत गोडबोलें बरोबर बरोबरीने लेखन प्रवास. मी लिहिताना
हे चार शब्दात लिहिले. पण अच्युत गोडबोलें पुढे स्वतःला सिद्ध
करणे सोपे होते का? अचाट, अथक काम करण्याची प्रबळ
इच्छा, जिद्द तिने बाणावली होती. मग आले " कॅनव्हास" १२० संदर्भ ग्रंथ वापरले. 
ते पण इंग्रजी भाषेचे, शारदा मंदिर मराठी शाळेत शिकलेली ही मुलगी, इथे
परत कस लागला. इंग्रजी मध्ये वाचन करून मराठीत लिहायचे
होते. एक नाही दोन नाही कितीतरी चित्रकार, शिल्पकार कलेच्या
इतिहासासहित शब्दबद्ध करायचे होते. पण मॅडम हरल्या
नाहीत. मग आले "जिनियस, भाग एक, दोन आणि तीन .. एकूण
36 शास्त्रज्ञ. नंतर पाश्चात्य संगीतावरचे सिंफनी". हे सगळेच मोठे
ग्रंथ आहेत..हे करत असताना मध्येच समुपदेशन विषयातील कोर्स डॉ.
आनंद नाडकर्णी या विख्यात मानसोपचार तज्ञा कडे पूर्ण
केला. मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या "चांदोबा" या मासिकाचा
चार वर्षे मराठीतून अनुवाद केला. तसेच "प्रथम" या शिक्षणावर
काम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या
स्वयंसेवी संस्थेत कंटेट क्रिएटर आणि ट्रेनर म्हणून काम केले.
सतत महाराष्ट्रभर विज्ञान, कला, साहित्य व चित्रकला या
विषयांवर व्याख्यानांद्वारे प्रचार व प्रसार करत असते. सतत
विविध शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांकडून व्याख्यान
देण्यासाठी बोलावणे येत असते. बर व्याख्यान देताना सुद्धा
न बघता, संदर्भ वही न बाळगता कुठल्याही जिनियस विषयी,
कलाकारांविषयी, इतरांनी लिहिलेल्या पुस्तकानविषयी,
चित्रपटाविषयी, नाटकविषयी आणि चांगल काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांविषयी खडांखडा माहिती देते. अफाट
बुद्धिमत्तेची ही झलक आहे. कारण इंग्रजी नांवे, गांव लक्षात
ठेवणे खूप अवघड आहे. तसेच महाराष्ट्र आणि बाहेरील तरुणाई
सोबत तिचे घट्ट नाते आहे.
इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात लिओनाऱ्दो डा विंची
चा तिने लिहिलेला धडा समाविष्ट केला आहे.
खूप पुरस्कार तिला मिळाले आहेत. त्यापैकी काहींचा उल्लेख
करते. 2014 यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे स्त्री
सक्षमीकरणाबद्दल विशेष सन्मान. 2015 मध्ये कला विज्ञान
आणि सामाजिक कामाबद्दल स्वर्गीय सदाशिव आमरापुरकर
स्मृति पुरस्कार, 2018 साली अंबाजोगाई येथे
संपन्न झालेल्या बाल_कुमार साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून
आमंत्रित केले गेले होते. 2019 मध्ये तंत्रज्ञ जिनियस ला
पुरस्कार, 2020 चा रोटरी क्लब ऑफ़
पुणे पाषाण तर्फे साहित्यातील योगदानाबद्दल विशेष गुणवत्ता
पुरस्कार.
लिखाणाने मला भरपूर आत्मसन्मान तर मिळालाच
पण तितकेच ज्ञान ही प्राप्त झाले. त्यामुळे सतत लिहीत राहणे
पुस्तकांना आणि माणसांना वाचत राहणे मला आवडते, असे ती
म्हणत असते.
तसेच तिच्या स्वतंत्रपणे येणाऱ्या काही पुस्तकांची नावे
इथे देत आहे. पाथ फाईनडर्स, भाग एक आणि भाग दोन,
नारायण धारप, आर्किटेकचर, डायरेकटर्स, जग बदलणारे ग्रंथ,
लहान मुलांसाठी शूर भारतीय मुले, शूर भारतीय मुली, स्त्री, या
शिवाय इतरही अनेक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
अशा धाडसी, बुद्धिमान, चतुरस्र मैत्रिणीला पुढील
वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

@सुमेधा गंगाखेडकर
23 oct 2020