कल्याण टांकसाळे
काल अच्युत गोडबोले आणि दीपा ताई (दीपा देशमुख) यांच्या कॅनव्हास या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी दत्ता बाळसराफ आणि मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर देखील उपस्थित होते. हे पुस्तक पाश्चिमात्य चित्रकार आणि शिल्पकार यांच्या जीवनाविषयी आणी त्यांच्या कलाकृतींविषयी आहे. पुस्तकाला अमोल पालेकर यांची आपल्या समाजात दृष्यकलेची कशाप्रकारे हेटाळणीच केलेली आहे यांवर सडेतोड भाष्य करणारी प्रस्तावना आहे. प्रभाकर कोलते यांनी याप्रसंगी केलेलं भाषण देखील अस्वस्थ करणारं होतं - चित्र काढणं हा ज्या दिवशी या देशांत गुन्हा ठरेल तो दिवस चित्रकलेसाठीचा चांगला दिवस असेल, असं ते म्हणाले. अच्युत गोडबोलेचं भाषण नेहमीप्रमाणेच हसवणारं आणि भारावणार होतं.
दिपाताईने केलेलं भाषण अनेक वर्ष लक्षात राहील. कारण एक तर ते अतिशय सुंदर, आणि रेखीव होतचं पण ते आपुलकीनं ओसंडून वाहत होतं. शिवाय ते एका खडतर प्रवासानंतर यशाच्या एका शिखरांवर येवून केलेलं भाष्य होतं... अशी अनेक शिखरं या दोघांसाठी अजून बाकी आहेत...