सुनीता भागवत
दीपा देशमुखांचा लेखन प्रवास
'निवारा'मधे एक संध्याकाळ दीपा देशमुख यांचा लेखनप्रवास ऐकण्यात सुरेख बनून गेली.
जुलै महिन्याच्या 'सखी साऱ्याजणी'च्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २३जुलैला सुप्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
संध्या देवरुखकर यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर रेखा डांगे यांनी दीपाताईंचा परिचय करून दिला.संगीत विशारद,जिनिअस,जग बदलणारे ग्रंथ,गुजगोष्टी इ.पुस्तके लिहिणारी व विविध पुरस्कार प्राप्त करणारी लेखिका अशी भरगच्च ओळख सांगण्यात आली.
दीपाताईंनी आपल्या लेखन प्रवासाविषयी सांगताना, आजीच्या गोष्टींपासून सुरुवात केली. लेखक बनण्यासाठी आधी चांगला वाचक बनणे आवश्यक असते. सर्व प्रकारची पुस्तके,अगदी रहस्य कथांसह ,आपल्याला आवडत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विद्याताईंशी परिचय धीर देणारा होता. विजया चौहान यांनी मासवणला येण्याचे दिलेले आमंत्रण हे आयुष्यातले मोठे वळण होते असे त्या म्हणाल्या.तेथील परीसर, शिक्षक म्हणून अनुभव, न्रुत्य,पेंटिंग करणारी साधीसुधी माणसे यांनी खूप काही शिकवले.औरंगाबाद ला डाळींबावरील प्रयोग पहायला गेल्या असताना अच्युत गोडबोले यांच्याशी परिचय झाला. तिथून लिखाणाला सुरुवात झाली. लिखाणादरम्यान अभ्यास करताना इंग्रजीशी दोस्ती व अनेक मान्यवरांशी परिचय झाला, संगीत-चित्रकला या माध्यमांची जाण आली.
या रंगतदार व्याख्यानात दीपाताईंनी अनेक श्रेष्ठ शास्त्रज्ञांचे,कलावंतांचे किस्से सांगितले.
ग्रंथांनी मला काय दिले, तर,कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा आत्मविश्वास दिला व मानवता हा एकच धर्म असल्याची शिकवण दिली ,अशा शब्दांत त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.
दीपाताईंनी सखीमंडळाला "मी अंजना शिंदे"आणि"रोहन साहित्य मैफल"अशी दोन पुस्तके भेट म्हणून दिली. संध्या देवरुखकर यांनी आभार मानले.