Ravindra Tamboli
डायरेक्टर्सचे निमित्त: हातमिळवणी प्रकाशकाशी.....
परवाच 'डायरेक्टर्स' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आम्ही उपस्थित होतो.
ती 16 मेची सायंकाळ होती. आम्ही काही तासांसाठी पुण्यात आलो होतो. पुण्याहून निघता निघता तिथे पोंचलो. कार्यक्रम दीपा देशमुख यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा होता.
आपल्या प्रत्येक पुस्तकाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या दीपा देशमुख या आमच्या आवडत्या लेखिका असल्याने आम्ही त्यांच्या डायरेक्टर्स या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनाला एस. एम. जोशी फाउंडेशनच्या हॉलवर पोचलो.
रसिक वाचकांनी हॉल ओसंडून वाहात होता...
आम्ही आधी स्थानापन्न झालो.काही लोक मागे उभे राहिले होते., काहींनी जागा न मिळाल्यामुळे स्टेजवर बसणं पसंत केलं होतं.
काही ज्येष्ठ उभे असल्याने, त्यांना जागा देऊन आम्ही व आमच्या काही मित्रांनी हॉल बाहेरच्या जिन्यात बसून कार्यक्रम ऐकण्याचा निर्णय घेऊन टाकला.
मराठी चित्रपट सृष्टीतील जयप्रद देसाई, सुनील सुकथनकर, हे दोन दिग्दर्शक, प्रकाशक पाटकर व्यासपीठावर स्थानापन्न होते.
मान्यवर पाहुण्यांच्या मागे ‘डायरेक्टर्स’चं बॅनर झळकत होतं. आरंभी अरविंद पाटकर यांनी डायरेक्टर्स आणि मनोविकास प्रकाशन याबद्दल बोलायला सुरुवात केली. अतिशय नर्मविनोदी शैलीत त्यांनी वाचकांशी संवाद साधला. हा संवाद विरेंद्र सेहवागच्या तडाखेबंद शैलीसारखा होता.
त्यानंतर दीपा देशमुख मनमोकळ बोलल्या...
हे पुस्तक त्यांनी त्यांचे मिञ धनंजय सरदेशपांडे यांना अर्पण केले असून
. नेमका याच वेळी त्यांना औरंगाबादच्या जिगीषा संस्थेचा मिलिंद सफई स्मृति पुरस्कारही जाहीर झाला असल्याने या प्रसंगी नाट्यकर्मी अतुल पेठे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
जयप्रद देसाई आणि सुनील सुकथनकर हे दोघेही ओघवते बोलले.
आमच्या नांदेडच्या भाषेत एकंदरीत कार्यक्रम नंबर एक झाला ! आम्ही आमचा बहुमूल्य वेळ काढून कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाला आलेल्यांपैकी आमच्यापेक्षा जेष्ठ मंडळींसाठी स्वतःची जागा सोडून उभे होतो.इलेक्शनचा काळ चालू असल्याने असे ऊभे राहणें रास्त होते.
आजवर अनेकदा पूर्वी उभे राहूनही आम्हाला बसवले गेलेलेच होते. ही परंपरा तशीच ठेवावी म्हणून आम्ही जेव्हा जिन्यावर बसलो तेव्हा आमच्या आधारासाठी म्हणून सकाळ समूहाचे ज्येष्ठ पत्रकार उमेश धोंगडेही आमच्या शेजारी येऊन बसले. त्यांनी आधार दिला. आमचे पाठीराखे म्हणून वरच्या पायरीवर भूषण कदम बसले .
डायमंड पब्लिकेशन चे मालक श्री पाष्टे हे आमचा हात हातात घेऊन आमच्या प्रेमापोटी तिथे उभे राहिले. मनोविकास प्रकाशनचे विलास पाटील हे संपादक आमच्या बोलण्यामधला भाग संपादित करायला त्यात सामील झाले.
प्रकाशन डायरेक्टर या पुस्तकाचे !, आमची हात मिळवणी एका प्रकाशकाशी!,ही रंगत त्यात आली आणि......
डायरेक्टर्स नावाचे एक चांगले पुस्तक आपल्या सर्वांच्या वाचनासाठी उपलब्ध झाले!