सुधीर महाबळ
अच्युत आणि दीपा
आताच ‘कॅनव्हास’ वाचून बाजूला ठेवले. तसं मी निर्मितीच्या काळातलं, जवळजवळ पूर्ण स्वरूपातलं, अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधे, तुकड्या तुकड्यामध्ये ते वाचलं होतं. एकेक प्रकरण स्वतंत्र वाचणे आणि तेच सगळं ‘कॅनव्हास’ पुस्तकाच्या फॉर्ममध्ये वाचणे ह्यात फार मोठं अंतर आहे. असं कां? ह्या प्रश्नाचं नेमके उत्तर मी कदाचित देऊ शकणार नाही. पण आहे हे खरय! एक शक्यता ही असू शकेल की, समजा, मदनमोहन एखाद्या अप्रतिम गजलेचं रेकोर्डिंग करण्यासाठी सज्ज आहे. लताबाई, रफी किंवा तलत असे गायक आहेत, केरसी लॉर्ड, मनोहरी सिंग, रईस खां, शिवकुमार, हरिप्रसाद असे वादक तयार आहेत आणि टेक पूर्वीची रिहर्सल चालू आहे. टेक्स होत आहेत, रिटेक्स होत आहेत, काही किरकोळ सुधारणा होत आहेत आणि अखेरीस फायनल टेक होऊन ok झाल्यावर ते प्रसिद्ध झाल्यावर त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. रिहर्सल्स चालू असताना, टेक्स रिटेक्स मध्ये ऐकलेले तेच गाणे ‘ok’ होऊन जेव्हा समोर येतं तेव्हा सगळ्या मेहनतीचा जो एकसंध परिणाम दिसतो, तो कायमस्वरूपी टिकणारा असाच असतो आणि तोच पुढे लक्षात राहतो. तुकड्या तुकड्यांमध्ये ऐकलेले तेच गाणे आता जास्त परिणामकारक स्वरूपात पुढे आलेले असते. असं काहीसं माझं कदाचित झालं असेल.
पण ते वाचून हातावेगळे केल्यानंतर मी बराच वेळ सुन्न होऊन गेलो. दोन तीन शतकांपूर्वीचा काळ आपण जगून आल्यासारखं वाटलं. मी कुणी समीक्षक वगैरे नाही, अभ्यासू नाही, पण माझी स्वतःची एक सोपी पद्धत आहे. पुस्तक वाचून संपल्यावर ‘मी सुन्न झालो का’? ‘मला त्या पुस्तकाने अंतर्मुख व्हायला भाग पाडलं का’? ‘माझं विचारक्षेत्र विस्तारलं का’? हे प्रश्न मलाच विचारतो! आणि सगळ्या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असेल तर ‘कितपत’? हा पुढचा एक प्रश्न. जर का पाहिलंच उत्तर ‘नाही’ असेल तर प्रश्नच मिटला! पण ‘कॅनव्हास’ वाचल्यावर माझ्या लेखी तरी ह्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर मोठ्ठ ‘हो’ असंच आहे आणि ‘कितपत’चं उत्तर ‘प्रचंड’ असं आहे. व्हिन्ची, मायकेलअँजेलो, रेम्ब्राँ, सेजान, रोदँ,, गोगँ, व्हॅन गॉग, लॉत्रेक आणि पिकासो ह्यांना कडकडून भेटल्यासारखं वाटून गेलं मला.
ह्या कलाकारांच्या वागण्यातल्या तऱ्हा पाहता एक गमतीशीर साम्य आढळलं, ते सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानी माणसाची लक्षणे विस्ताराने दिली आहेत. त्यापैकी काही उदाहरणे पहा: समाजात, गर्दीत मिसळायला अजिबात न आवडणे, निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा जीव रमवण्याची आत्यांतिक आवड असणे, स्वतःची स्तुती ऐकायला न आवडणे किंवा लोकांना उडवाउडवीची उत्तरे देणे. कपडे किंवा घर अस्ताव्यस्त ठेवणे, समाजात जे अशिष्ट वर्तन म्हणून मानले गेले आहे ते करणे इत्यादी इत्यादी. एका अर्थी हि कलाकार मंडळी ज्ञानीच म्हणायची. असो.
अच्युत, दीपा – तुमचं सगळ्यात मोठं श्रेय सांगू? चित्रकला ह्या विषयातलं ‘ओ’ का ‘ठो’ न कळणाऱ्या माणसाला आपल्या अज्ञानाबद्दल न्यूनगंड वाटावा, असं उद्दिष्ट तुमचं नाही. म्हणजे, ‘अहो, बघा तुम्हाला काहीच कसं कळत नाही? उष्ण रंग अमुक भावना दाखवतात, शीत रंग अमुक दर्शवतात, उभी रेषा तमुक गोष्टीचे प्रतिक मानलेले आहे’ असले जड-जाड तपशील पुरवण्याऐवजी माणूस, त्यातून तो कलावंत असेल तर काय होतं. कालखंड कुठलाही असो, पण समाजाची एखाद्या बंडखोरी करणाऱ्या कलाकाराप्रती अवहेलना करण्याची सहज वृत्ती कशी असते. आणि मेल्यानंतर त्याच कलाकाराला, त्याच समाजाने डोक्यावर घेऊन देवत्व देण्याची वृत्ती कां असते. नियती नावाची भयानक गोष्ट एखाद्याला संपन्न आणि भरल्या आयुष्यातून उठवू कशी शकते. एरवी समाजात सर्वात खालच्या दर्जाच्या कामात मग्न असणाऱ्या व्यक्ती, माणूस म्हणून किती जास्त ‘उंच’ असतात, ह्या चिरंतन मुद्द्यांना तुम्ही सहजपणाने चेतवलं आहे. रोजच्या जगण्यात मश्गुल असलेल्यांना शक्यतो असे विचार पडूच नयेत असे वातावरण आजूबाजूला आहे. एकाने दुसऱ्याला कमी लेखणे, सार्वत्रिक विषमता, स्पर्धा, मत्सर, हेवे-दावे, ह्या वृत्ती इतक्या भयानक अक्राळविक्राळ स्वरूपात ह्या पुस्तकातून समोर येतात की, कुठल्याही माणसाने स्वतःकडे बघावे. आणि आपण तर असे नाही नां कधी वागलो, किंवा वागत आहोत, ह्या विचाराने अस्वस्थ व्हायला हवे. ही अस्वस्थता अनिवार्य आहे आणि ती खडबडवून मला जागी करते. हे ह्या पुस्तकाचे श्रेय आहे.
मला असं सारखं जाणवत राहिलं की, हे वाचून माझ्यासारखा बऱ्यापैकी बथ्थड माणूस इतका सुन्न झाला असेल तर तुम्हाला हे सगळे साहित्य जमवताना, त्यावर पुस्तकाच्या दृष्टीने प्रोसेस करताना किती सुन्न झाल्यासारखं वाटलं असेल? एक प्रकारचा नैराश्याचा attack तुम्हाला तर नाही नां आला? आला तरी त्यात अमानवी खचितच नाही.
एका अप्रतिम अनुभवाबद्दल मी मनापासून ऋणी आहे!
-सुधीर महाबळ