जनार्दन केशव
आमच्या (शुद्ध)लेखन आठवणी... दोन पानात लिहाव्यात अशा तुटपुंज्या आठवणींची मालिका नाहीय ही. एकेका आठवणीची निरनिराळी कहाणी आहे. तिच्या सगळ्या मित्रांनी ठरवले तर ती जेवढ्या पुस्तकांच्या सोबत फोटोमध्ये उभी आहे, तेवढी पुस्तके तिच्यावर लिहिली जातील. अगदीच ठरवून लेखन करायचे झाले तर, 'सुरुवात पर्व', 'मोबाईल पर्व', 'कॉम्प्युटर पर्व', 'ऑरकूट पर्व', 'फेसबुक पर्व', 'लेखन पर्व', 'शैक्षणिक पर्व', 'सामाजिक पर्व', त्यातही निरनिराळे उपपर्व आहेत.. स्थलांतर पर्व हा तर एक विस्तृत खंडच आहे. औरंगाबाद, मुंबई, पालघर, विरार, वाशी, पुणे आणि त्यातही अंतर्गत निरनिराळी ठिकाणे.. मासवण मधील कामे तर आजही आठवताहेत.
आता इथे 'सुरुवात पर्व' म्हणूनही काही सांगायचे झाले तर.. आठवणींचे सिक्वल उभे राहताहेत. पहिली भेट सुद्धा आजही ताजी आहे. जुलै महिना होता तो.. २००२ साल होतं ते.. एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी औरंगाबादला गेलो होतो. भर पावसाचे दिवस.. अर्थात भर पाऊस ठाण्यात, मुंबईत. औरंगाबादमध्ये तितकासा पाऊस नव्हता. संत एकनाथ रंग मंदिरात प्रकाशन सोहळ्याला भरगच्च गर्दी.. वाटलं, हे वैभव लाभायला हवंय, अगदी प्रत्येक लेखणीला.. त्या गर्दीतले बरेच चेहरे ओळखीचे होते आणि कार्यक्रमानंतर बरेच नवे चेहरे ओळखीचे झाले.
कार्यक्रम संपला आणि आम्ही जेवायला एका ठिकाणी गेलो. जेवण येईतो थोड्या गप्पा झाल्या. कविता, गजल ऐकवणं झालं. माझी सगळ्या गजल एकत्र असलेली वही हरवल्याची घटना अगदी ताजी म्हणजे आदल्याच दिवशीची होती. ठाणे ते औरंगाबाद प्रवासात मी त्या सगळ्या पुन्हा लिहून काढल्या होत्या. (त्या आठवणीचा स्वतंत्र लेख आहे..) तोही विषय तिथे ओघाने आला. तितक्यात जेवण आलं. चार टेबल एकत्र करून आमची पंगत वजा मोठी मैफलच जमली होती. मैफलीतल्या वीस जणांपैकी एक प्रेमळ आवाज कानावर पडला, "अरे राजा, टाईप करून सेव्ह करून ठेवायच्या ना.. आता चाळीस एक गजल होत्या म्हणून लिहून काढल्यास. आणि तुला आठवणीत आहेत ही मोठी गोष्ट.. तरीही काळजी घ्यायला हवी.." मी उत्तर दिलं, अहो ताई.. काल मी त्या झेरॉक्स करण्यासाठीच घेऊन जात होतो. होता करता आमचे जेवण उरकले. त्या रात्री मी औरंगाबादमध्येच थांबणार होतो. त्या ताईंनी खूप काळजीने विचारलं, "आज कुठे थांबणार आहेस..? आणि परतीला कधी निघणार आहेस..?" मग मी कुठे थांबणार, कधी निघणार सगळं सांगितलं. अजून दोन दिवस तरी मी औरंगाबादमध्येच असणार आहे.
मग ताई बोलल्या, "बरं, मग तुझी गजलांची वही आता मला दे. मी त्या सगळ्या टाईप करून तुला देते." त्या वाक्याने मला माझा जीव मागितल्याचा फील मला आला.. कानावर वाक्यही तसंच आलं माझ्या.. "बरं, मग तुझा जीव तू मला दे.. मी तो कॉपी करून तुला परत देते. नाहीच दोन दिवसात देता आला, तर कुरियर करीन." त्यामुळे मनातल्या मनात जोरात किंचाळलो, "नकोssssss.." एकतर कालच सगळं गमावून बसलो होतो. त्यात पुन्हा सगळं कुणाच्या हाती द्यायचं.. तेही ओळख ना पाळख.. पण, इतक्या लोकांमध्ये मला नाही सुद्धा म्हणता येईना. तशात माझे मित्र दत्ता बाळसराफ बोलले, "दे, तेवढ्याच कुणाकडे सेव्ह तरी राहतील." मी मनात बालबुद्धीने म्हटलं, आणि (परस्पर) छापल्या वगैरे तर..?.. पण, आता सर्वांसमोर माघार देखील घेता येईना म्हणून दिली वही.. मनातल्या मनात मी प्रत्येकाकडे एसीपी प्रद्युम्नच्या नजरेने पाहत होतो.
जिवावर उदार होऊन मी हो नाही करता वही दिली तर होती. पण, पुढचे दोन दिवस खरंच जीवात जीव नव्हता. फोन करावा तर नाहक त्रास देणं होईल. बरं आपलंच काम त्या करताहेत, मग त्रास कशाला द्यायचा..? असा मनातल्या मनात समंजस विचार करायचो आणि त्याचवेळी दहा वेळा फोन हातात घ्यायचो, दहा वेळा पुन्हा तो खिशात ठेवायचो. शिवाय दुसरीकडे मी अजून एक नवीन वही घेऊन सगळ्या गजल लिहूनही काढल्या होत्या. तरीही आपल्या अप्रकाशित गजल कुणाकडे आहेत. ही तशी फार त्रासिक नाही, पण सतत आठवण होणारी भावना मनात उचंबळून येत होती.
निघण्याच्या दिवशी संध्याकाळी निमित्त करून फोन करावा असं वाटलं. हो नाहीचा मनात गोंधळ सुरू असताना ताईंचाच मला फोन आला. मी मनात उड्या मारतच तो उचलला. पहिलंच वाक्य होतं, "छान आहेत तुझ्या गजल. आवडल्या.. त्यातली स्वप्नफुलोरा आणि सायंकाळ तर खूपच आवडल्या." मी अगदी भारावून वगैरे गेलो होतो. दुहेरी तिहेरी आनंद झाला होता मला. मी काही बोलणार इतक्यात ताईच समोरून बोलल्या, "मी निघेन थोड्या वेळाने तुमच्या गाडीच्या वेळेत भेटूया स्टेशनवर.." मी फक्त, "हो ताई, भेटूया.." इतकंच बोललो. पलिकडून ताईच अच्छा बोलल्या. आणि फोन ठेवला..
ठरल्याप्रमाणे ताई, औरंगाबाद स्टेशनवर आम्हाला भेटायला आल्या. माझी वही तर सोबत होतीच पण सोबत माझ्या गजलांच्या प्रिंटआऊट पण आणल्या होत्या. आपण लिहिलेलं सगळं एकत्रितपणे कागदावर छापलेलं मी पहिल्यांदाच बघत होतो. डोळे भरून आले होते माझे. काय बोलावं सुचेनाच मला. त्यामुळे कदाचित ताईंना वाटलंही असेल, काय हा मुलगा.. आपण इतकं टाईप वगैरे करून दिल्या गजल, हा मख्खासारखा काहीच बोलत नाहीये.. तितक्यात गाडीची अनाऊन्समेंट झाली. अगदी 'अचानक्क' माझ्या तोंडून 'थँक्यू ताई..' असं मोठ्ठ्याने निघालं. आणि आम्ही रवाना झालो.
तेव्हा आजच्यासारखे स्मार्ट मोबाईल आणि मराठी संदेश सुविधा उपलब्ध नव्हत्या. एक एसएमएस तोही केवळ १६० अक्षरांची मर्यादा सांभाळून पाठवावा लागत असे. मी ट्रेनमध्ये बसल्या बसल्या पटापट इंग्रजीतल्या मराठीमध्ये काही ओळी टाईप केल्या आणि ताईंना पाठवल्या. तासाभराने ताईंचा त्यावर खूपच छान (Khoopach Chhaan) असा रिप्लाय आला. दुसर्या दिवशी सकाळी मी ठाण्याला उतरलो आणि दत्ता बाळसराफ पुढे निघून गेले.
घरी येताना मी निराळ्याच आनंदात होतो. ठाणे स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि मी ताईंना इतक्या सकाळी फोन नको करायला असे, मनात म्हणत असतानाच ताईंचा फोन आला.. "कसा झाला प्रवास..?" मी आनंदून "खूप्पच छान" असं म्हटलं. बोंबलायला रात्रीच्या प्रवासात काय खूप्पच छान ते.. झोपून आलो होतो मस्त.. पण, म्हटलं, "खूप्पच छान".. मग थोड्या गप्पा झाल्या. बरं ह्या छापलेल्या गजलांचा आनंद शेयर कुठे करायचा..? त्या दाखवायच्या कुणाला..? असं सगळं माझं सुरू होतं. २००२ साली छापलेल्या आपल्या अक्षरांचा आनंद काय असू शकतो. ह्याचा अंदाज वाचकांनीच घ्यावा.
घरी आलो, तयारी करून ऑफिसला निघालो. जाताना वाटेत आधी प्रमोदला फोन केला. सगळी कथा त्याला ऐकवली. त्यानेही आनंद व्यक्त केला. पण, तेवढ्याने समाधान होईना. मला त्या छापलेल्या गजल कुणाला दाखवाव्या हा प्रश्न होता. बरं, ते नुसतंच दाखवणं नाही ना. त्यात रूची असणार्या व्यक्तीला त्या दाखवायला हव्या होत्या. शिवाय त्याला त्या छपाईचे अप्रूप असायला हवे. मग मी माझा संयमी बाणा अवलंबला. आणि त्या कुणालाच दाखवल्या नाहीत. दोन आठवड्यांनी ए. के. शेख यांच्याकडे माझं जाणं झालं. तेव्हा मी ठरवलं, ज्यांनी आपल्याला गजललेखन शिकवलं, सृजनाची नवी वाट दाखवली.. आपला हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापेक्षा अधिक योग्य व्यक्ती इतर कोण असू शकेल..? मग मी ते बाड सोबत घेतलं आणि त्यांनाच ते पहिल्यांदा दाखवलं. हसू आरशात पहावं, तसा माझा आनंद मी त्यांच्या चेहर्यावर झळकलेला पाहिला. अगदी ह्या क्षणालाही नेरूळच्या पोस्ट ऑफीसमधले सफारी घातलेले शेख सर डोळ्यासमोर जसेच्या तसे दिसताहेत.
महिनाभराने ताई मुंबईला येणार होत्या. तेव्हा मी काम करत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्येच त्यांचं काम होतं. त्याही तेव्हा प्रतिष्ठान सोबत जोडलेल्या होत्या. औरंगाबाद विभागीय केंद्राची जबाबदारी होती त्यांच्यावर. खूप छान हसरी भेट झाली आमची. त्या भेटीत त्यांनी मला 'ओ' ताई वरून 'ए' ताई वर आणलं. आणि "माझी दीपाताई" ह्या नात्याचा प्रवास सुरू झाला.
सगळ्यात आधी धागा ओवला गेला तो लेखनाचाच. जसा मी तशीच दीपाताईसुद्धा शुधलेखनाच्या बाबतीत प्रचंड आग्रही. मी अनेकांच्या लेखनात चुका काढतो. पण, माझ्याही लेखनात राईपासून पर्वताएवढ्या चुका काढणार्या दोन महान व्यक्ती आहेत. त्यातली एक दीपाताई. एखादी अडचण आली तर वेळेच्या मर्यादा ओलांडून आम्ही एकमेकांना फोन करतो. अगदी रात्री दोन वाजताही ताईचा मला फोन येतो. ती मला प्रश्न विचारते, "पारिजात मधला री पहिला की दुसरा ?" मी म्हणणार 'पहिला'.. तेव्हा पलिकडून काहीही न बोलता ती फोन ठेवणार. आठ दहा मिनिटांनी पुन्हा फोन येणार.. "अनुनासिक मधला सी पहिला की दुसरा ?" मी म्हणणार 'पहिला'.. मग पलिकडून ती बोलणार.. दोन मिनिटांत लेख पाठवते. वाचून प्रतिक्रिया कळव.. हा सिलसिला गेली १८ वर्षे अव्याहतपणे सुरूच आहे. बरं, हा असा गोड त्रास तीच देते असे नाही. मी अधूमधून सुद्धा देत असतो. ताईच्या लेखन पर्वातला हा एक छोटासा किस्सा सांगितला आहे.. सगळे पर्व ओळीने लिहायला घेतले, की ह्याच पर्वासाठी अधिक पाने लिहिली जातील.
माझ्या ऑफीसच्या उद्घाटनाला ताई आली होती. तो तर एक स्वतंत्र किस्साच आहे. काही दिवसांनी अच्युत गोडबोले सरांसोबत ती पुन्हा आली होती. ती भेट मी लिहिली होती तेव्हाही.. ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ तेही माझ्या ऑफीसमध्ये ही केवढी मोठी दिवाळी भेट होती माझ्यासाठी.. दीपाताईचा मुलगा अपूर्व उत्तम संगणक तज्ज्ञ आहे. पण, कोणत्याही कामासाठी तिचा फोन मलाच येतो. मग लॅपटॉप खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, मोबाईल खरेदी अशी सगळी धमाल असते आमची. गेल्याच महिन्यात एकमेकांच्या सल्ल्याने आम्ही एकमेकांसाठी नवीन मोबाईल घेतले आहेत. लेखनापासून कशाच्याही बाबतीत तडजोड ना तिला मान्य असते ना मला.. मग कोणतीही वस्तू खरेदी करताना लेखनाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा प्रामुख्याने विचार होतो. उगीच सल्ला घ्यायचा म्हणून आम्ही ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्याशी बोलतो. पण, कृती सगळ्या आमच्या मनानेच करत असतो. नवीन कॉम्पुटर किंवा लॅपटॉप घरात आल्यावर अच्युत सर बोलतात, "अरे वा, वेगळाच मित्र घरी आलाय." त्यावर दीपाताईचे उत्तर, "मित्र तोच आहे. पण, अपडेट व्हर्जन असल्यामुळे वेगळा दिसतोय." मग प्रत्येकवेळी एक जोरदार हशां असतोच.
२०११ सालची गोष्ट आहे. अच्युत सरांची तब्येत ठीक नव्हती. (फार काही झालं न्व्हतं.. पण खोकल्यामुळे आवाज अगदी गेला होता.) दोन दिवसांनी त्यांचा कार्यक्रम होता पुण्यात. दीपाताईने तातडीने मला पुण्याला बोलवून घेतलं. मी लागलीच गेलो. अच्युत सरांच्या संपूर्ण निवेदनाची जबाबदारी तिने माझ्यावर सोपवली होती. थेट तेंडुलकरला रिप्लेसमेंट जायचं होतं मला. सुधाकर कदमांच्या घरी आम्ही कार्यक्रमाची रिहर्सल केली. गंमतीचा भाग म्हणून मी अचुत सरांना म्हटलं, "सर, ते शास्त्रीय संगीतात कसे मुख्य गायक समोर गातात आणि शिष्यगण अथवा सहगायक सोबत करतात. तसं आपण करुया का ?.. निवेदन तुम्हीच करा. घसा फारच दुखू लागला तर मी सोबत करेन.." पुढे प्रत्यक्ष कार्यक्रमात उर्जेने त्यांना इतकी छान सोबत केली की, मला निवेदन करावेच लागले नाही. एक सुंदर वाक्य आहे, "व्याधी व्यक्तीला जडतात. कलाकाराला नाही." आणि तेच झालं होतं. स्टेजवर गेलेले अच्युत सर खणखणीत आवाजाचे आणि ठणठणीत प्रकृतीचे होते.
दीपाताईच्या जुन्या कॉम्पुटरमधला बराचसा डेटा गेल्यामुळे अनेक सुवर्णक्षण केवळ आठवणीत साठवले आहेत. पण, त्या आठवणी अगदी अमीट आहेत.. दीपाताई रात्रीच्या शांततेत ती कुणाचीही एखादी कविता किंवा गजल वा एखादे गाणे रेकॉर्ड करायची. (अजूनही असले पराक्रम ती करते.) ते रेकॉर्डींग मला पाठवायची. सोबत, "जनार्दन, ह्याच्याआधी तुझे निवेदन जोडून मला ईमेल कर." असा तिचा आदेश असायचा. माझ्याच दोन गजल सक्तीने तिने माझ्याकडून गाऊन घेतल्या होत्या. मी एकदा गंमतीने तिला म्हणालो होतो, "माझं गाणं ऐकूनच तुझ्या कॉम्प्युटरचा डेटा उडालाय." औरंगाबादच्या विविध कार्यक्रमाचे अगणित फोटो त्यात गेले. तिचा तेव्हाचा कॉम्प्युटर काळा की गोरा हे मला न दाखवता तिने नवीन घेतल्यावर मला सगळी कथा सांगितली होती. त्यानंतर मात्र जेव्हाही कॉम्पुटर बदलणे झाले तेव्हा सगळा डेटा दोन दोन ठिकाणी सेव्ह करून घेण्याची सवय आम्ही लावून घेतली.
काल २८ ऑक्टोबर दीपाताईचा वाढदिवस होता आणि आज भाऊबीज आहे. मला आजही तिने आमच्या ओळखीनंतरच्या पहिल्या दिवाळीला घेतलेली भाऊबीज लख्ख आठवते आहे. आज १८ वर्षे ओलांडून प्रवास पुढे आलाय. ह्या १८ वर्षात एकमेकांच्या भेटी आणि भेट वस्तू ह्यांचीही एक स्वतंत्र मालिका आहे. कितीतरी नवे मित्रमैत्रीण ह्या प्रवासात 'कायमचे' जोडले गेले आहेत. माझ्यातला लेखक घडवण्यात ताईचा सर्वात मोठा वाटा आहे. आणि इतर कोणत्याही भेटीपेक्षा ही भेट अनमोल आहे. चित्रपट समीक्षेकडे मला तिनेच वळवलं आहे. पहिला चित्रपट होता, अश्विनी भावे आणि सचिन खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि दीपाताईचे खूप चांगले मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी २००७ साली दिग्दर्शित केलेला 'कदाचित'..
आम्ही हट्टाने एकमेकांना विषय देऊन लेखन करून घेतो. ती ते पूर्ण करते. आणि अधिकतर वेळा मी आळस करतो. तिच्याच काही पुस्तकांची परिक्षणे अर्धवट राहून गेलेली आहेत माझ्याकडून.. आज ताईला शुभेच्छा किती द्याव्यात आणि काय द्याव्यात हा प्रश्नच आहे. आज जे मी लिहिलं आहे, ती केवळ एकच टक्का तीही मला माहीत असलेली दीपा मी लिहिली आहे. ९९ टक्के अजून बाकी आहे. तिचं लेखन, वाचन, कविता, गाणं, पाककला, समुपदेशन, लोकसंपर्क, प्रवासाची आवड, प्रत्येक बाबतीत स्वतः अपडेट राहणं आणि आपल्या सोबतच्यांनाही अपडेट रहायला 'भाग' पाडणं, तेही अगदी सक्तीने.. ह्या सगळ्याचा प्रवास खूपच गमतीशीर आहे. हा प्रवास मला सांगायला आवडेल तितकाच तो सर्वांना वाचायला आवडेल. म्हणूनच मी लिहिणार आहे, अनेकांना लिहायलाही लावणार आहे आणि ते सर्व लेखन तुम्ही वाचणार आहात. अगदी अपूर्वपासून निखिल, प्रमोद, आसावरीताई, सुरेखाताई, नीलम, दत्ता बाळसराफ, विश्वास ठाकूर, डॉ. आनंद नाडकर्णी, "रवींद्र आणि अर्चना", डॉ, शेख इक्बाल मिन्ने अशी बरीच मोठी यादी आहे. खुद्द अच्युत गोडबोले सरांनासुद्धा दीपाताईमधली लेखिका वेगळी लिहायला सांगणार आहे..