योगेश फडतरे
2015 साली मी इंजिनिअरिंग मधून पास आऊट झालो. पण मला त्याबद्दल कुठलाच आनंद वाटत नव्हता. माझ्या आयुष्यात यशाचे क्षण येऊन सुद्धा मला आनंद का वाटत नाहीये ? हे कोडे मला उलगडत नव्हते म्हणून मी आयपीएच या ठाण्यातल्या मानसोपचार देणाऱ्या संस्थेमध्ये गेलो. या संस्थेचे संस्थापक डॉक्टर आनंद नाडकर्णी आहेत हे मला माहिती होते. कुठेतरी त्यांच्याबद्दलचा उल्लेख वाचला होता. मी जेव्हा आय पी एच मध्ये जायचो, तेव्हा डायरेक्टर असं बोर्ड वरती लिहिलेली ती कोपऱ्यातली रम त्याचा लाकडी छबीचा दरवाजा पाहून संस्थेतील मोठ्या माणसाची ही केबिन आहे असं समजायचं.आनंद नाडकर्णी हे या संस्थेचे प्रमुख आहेत हे मला माहिती होतं. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके काउंटर वरती विकायला ठेवलेली असत, तेव्हा आहे डॉक्टर म्हणजे कुणीतरी मोठी व्यक्ती आहे. आणि बुद्धिमान व्यक्ती आहे असं वाटत रहायचं. आणि आपली केस खूपच जटील झाली म्हणजे आपण खूप आजारी पडलो, तर त्यांना भेटू शकतो अन्यथा त्यांची भेट शक्य नाही असं मला वाटत असे. संस्थेचे ऑफिस दुमजली आहे.त्यात साधारण साठपेक्षा अधिक लोक काम करतात. हा सगळा डोलारा ज्यांनी उभारला तो माणूस सॉलिडच असणार हे मला तेव्हा जाणवलं होतं. पण नंतर कधी त्यांच्याबद्दल काही वाचनात आलं नाही. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा काही प्रयत्नही केला नाही. युट्युब वर मात्र त्यांचे काही व्हिडीओस पाहायचो. या व्हिडिओ मधली त्यांची बोलण्याची शैली आणि विषयाचा गाभा या दोन्ही मध्ये डॉक्टरांचे प्राविण्य विशेष होते हे लक्षात यायचं. काही दिवसांपूर्वी आयपीच मध्ये गेलो असताना डॉक्टरांवर दीपा देशमुख यांचे पुस्तक माझ्या नजरेस पडलं. पुस्तकावर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा मोठा फोटो होता. तो फोटो पाहून पुस्तक घ्यायची इच्छा झाली. या माणसाबद्दल जाणून घेऊ असं वाटलं आणि पुस्तक वाचताना पुढे वाचत जावं असं वाटायला लागलं. पुस्तक लेखिकेने उत्तम लिहिले आहे. दोन तीन वेळा पुस्तकातले काही प्रसंग वाचून भरून आलं.पुस्तक वाचताना वेळ सहज सरून गेला. पुस्तकात डॉक्टर नाडकरणींच्या मानसिक आरोग्यातल्या क्षेत्रातली मुशाफिरी लक्षात येते. त्यांची अनिल अवचट यांच्याशी असलेली मैत्री, मुक्तांगण मधला सहभाग वाचला. आधी वाटलं एवढा मोठा डॉक्टर माणूस स्वतःच्या गाडीने पुण्याला जात असेल. त्यांनी ट्रेन पकडून पुण्याला जातो असं सहजच लिहिलं असेल ते वाचुन आपण किती लगेच निष्कर्ष काढतो हे लक्षात आलं. पण गम्मत म्हणजे मी ठाण्यातच ईतर डॉक्टरांना फोर्चूनर, मर्सिडीज, BMW या सारख्या टॉप गाड्या चालवताना पाहिलेलं आहे. त्या डॉक्टर लोकांपेक्षा ही व्यक्ती खूपच वेगळी आहे हे लक्षात यायला जास्त वेळ नाही लागला.
मला मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करावं असं वाटतं. या क्षेत्रात या अवलिया माणसाने प्रचंड काम करून ठेवलेलं आहे हे जाणवल्यानंतर आपल्याला एक प्लॅटफॉर्म आधीच उपलब्ध आहे ही बाब सुखावणारी वाटली.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आणि खोली पुस्तक वाचत असताना माझ्या लक्षात यायला लागली. पुस्तक जसजसं वाचत गेलो तसतसा डॉक्टर नाडकरणी यांचा चळवळीतल्या संपर्काची जाणीव झाली. KEM मध्ये त्यांनी केलेलं शिक्षण, मुक्तांगण मधील त्यांचा सहभाग, केम हॉस्पिटलमध्ये पुढे त्यांनी घडवलेली कारकीर्द, ठाण्यामध्ये आयपीएच् ची सुरुवात आणि त्याचा डोलारा मोठा करत नेणं. मानसिक आरोग्याच्या चहू बाजूना भिडणं. डॉक्टर असण्याच्या पलीकडे जात त्यांनी रुग्णांना जपणं , त्यांची काळजी घेताना बायो सायको सोशल पद्धतीने विचार करणं या सर्व विलक्षण गोष्टी वाचत गेलो. आजही आयपीएच मध्ये परुग्णांकडून माफक फी घेतली जाते, या सगळ्याचा कुठलाही बडेजाव आयपीएच मधल्या कुठल्याच कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर नसतो. सर्व लोक मदत करण्यासाठी तत्पर असतात. अनेकदा हॉस्पिटलच्या काउंटरवर स्वागतकाशी बोलताना आपले अज्ञान समजून आल्यामुळे ते आपल्यावर हसतील, किंवा आपल्याला काहीच समजत नाही अशा अविर्भावात आपल्याकडे पाहतील असे मला वाटायचे. हा अनुभव आयपीएच मध्ये गेल्यानंतर मात्र मोडीत निघाला. आयपीएचमध्ये फक्त रुग्ण तपासण्या पलीकडे अनेक कार्यशाळा, संवाद शिबिरं, मदत गट असे बरेच काम चालते.आपण स्वतः कधी गरज लागल्यास आयपीएच मध्ये जाल तेव्हा ती संस्था पाहून संस्थेच्या प्रेमात नक्कीच पडाल. समाजाने नाकारलेल्या व्यसनाधीन रुग्णांना, गंभीर मानसीक आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना, त्यासोबत सौम्य मनोरुग्णांना,त्याशिवाय स्वतःचा विकास घडवू इच्छिणाऱ्यांना सर्वांनाच आयपीच पथदर्शक ठरत असते हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही.
एकंदरीत डॉक्टर आनंद नाडकर्णी या व्यक्तिमत्त्वाची खूप सुंदर ओळख या दोन-तीन दिवसात झाली. हे पुस्तक माझ्या मित्रमंडळींना वाचण्यासाठी सुचवतो आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटो सोबत देतो आहे.
योगेश फडतरे