योगेश फडतरे

योगेश फडतरे

आज महाराष्ट्र दिनानिमित्त चांगुलपणाची चळवळ यांच्याकडून लोकप्रिय व प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीला उपस्थित राहण्याचा योग माझ्या नशिबी आला. दीपाताईं सोबत एक तास छान गप्पांचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या अनेक भारी गोष्टी समजल्या.

तुमचे आमचे सुपरहिरो या सिरीज मध्ये त्यांनी आता समाजात वावरत असणाऱ्या आणि सुंदर काम करत असणाऱ्या लोकांबद्दल रंजक पद्धतीने लिहिलंय. यामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णी, मुक्तांगणचे बाबा अनिल अवचट,वैज्ञानिक खेळणीकार जिनियस अरविंद गुप्ता, नामांकित डॉक्टर रवी बापट, प्रकाश आमटे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.या प्रत्येकाचे गुण विशेष त्यांनी थोडक्यात सांगितले.

या सर्व लोकांबद्दल दीपा ताईंची एक विशेष वेगळी मुलाखत व्हायला हवी.

गप्पांच्या ओघात त्यांनी केलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये केलेल्या कामाबद्दल समजले. एकूण 78 आदिवासी पाड्यांमध्ये शिक्षणाचे भरीव काम करण्याचे योगदान त्यांनी दिले आहे. लाइमलाइटमध्ये न राहता स्वतः मधला हा चांगुलपणा जपत काम करणे हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य यानिमित्ताने अधोरेखित झाले आणि हे काम करून मी काही विशेष केले आहे असा कोणताच अभिनिवेश त्यांच्या बोलण्यामध्ये नव्हता, याचे विशेष कौतुक वाटले.

दीपा ताईंची स्वतःची बोलण्याची एक सुंदर शैली आहे. या शैलीत त्यांना बोलताना ऐकत राहावंसं वाटतं.

जिनियस या पुस्तकांच्या सिरीजचं लेखन करताना त्या स्वतःच कशा विज्ञानाच्या अनेक गमती जमती शिकत गेल्या आणि याबद्दल अधिकाअधिक वाचताना विज्ञानात कशा रमत गेल्या याबद्दल ऐकायलासुद्धा मजा आली.

जीनियस या सीरिजमध्ये 'सूक्ष्मजीव विज्ञानातले' वैज्ञानिक माझे स्टोरीटेल वर ऐकून झाले आहेत. लवकरच इतर सिरीज मी वाचायला/ऐकायला घेईन. संपूर्ण सिरिज मध्ये खूप सारे तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांची चरित्रं त्यांनी लिहिली आहेत. हे नक्कीच वाचायला हवं. (माझे काही मोजके वाचून झालेयत.)

कॅनव्हास या पाश्चात्य चित्रकलेवरच्या पुस्तकाबाबत सांगताना दीपाताईच्या डोळ्यातलं कुतूहल मला विशेषत्वाने जाणवलं. चित्रकलेकडे आपण भारतीय फार खोलात जाऊन बघू शकलो नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्या पद्धतीने भारतीयांनी कान विकसित केला, त्या पद्धतीने भारतीयांनी दृष्टी मात्र विकसित केली नाही. आणि ती विकसित व्हायला हवी.

सिम्फनी हे पुस्तक लिहिताना त्यासाठी अच्युत गोडबोले यांनी कशी छान तयारी करून घेतली.

मोतझार्ट, बिथोवन च्या सिम्फनी दीपा ताईंना पाठवल्या. त्या ऐकायला लावल्या. अनेक पद्धतींनी खूप काही शिकवलं हे सांगताना, अच्युत गोडबोलेंचं बहुमूल्य मार्गदर्शन त्यांना लाभलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता असताना मला त्यांच्या मनातला लोभस सच्चेपणा जाणवत राहिला.

ईतकी मोठी आणि प्रसिद्ध लेखिका लहान तरुणीच्या उत्साहाने बोलते. गर्वाचा लवलेशही तिच्या बोलण्यात नसतो हे विलक्षण होतं.

खूप खूप सुंदर गप्पा झाल्या.

मी सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना विनंती करेन की, दीपा देशमुखांची पुस्तकं वाचाच. लायब्ररीतून मिळवा. परवडत असेल तर विकत घ्या. नसेल परवडत तर मित्राकडून घ्या. कोणाकडून तरी उधार घ्या. पण वाचाच.

मनाला श्रीमंत करणारी पुस्तकं लिहिली आहेत. ज्ञानगंगा मराठीत आपल्या भाषेत आणण्याचं बहुमोल काम त्यांनी केलंय. वैज्ञानिक साहित्याचा इतिहास याची नोंद घेईलच. आपण ते नोंदवून घेऊन स्वतःच्या ज्ञानात भर घालत राहायला हवी.

योगेश फडतरे

ठाणे