श्वेता मंडलिक देशपांडे

श्वेता मंडलिक देशपांडे

मंडलिकांच्या घरातलं मी शेंडेफळ अजुन पण मोठं न झालेलं, नाक सरळ असून पण 'नकट्या' असलेलं आणि मुन्नी ताई बहिणीनं मध्ये सगळ्यात मोठी ताई. 
मी लहान असल्यापासून मला तिच्या बद्दल फार प्रेम व आकर्षण वाटायचं. कारणही तसेच होते ती दिसायला खूप छान, वागायला एकदम कडक शिस्त असलेली, सगळ्या गोष्टी टापटीप आणि आमची सगळ्यात मोठी बहीण. 
तीचे ब्युटी पार्लर होते, तिचे ड्रेस कायम नवीन फॅशन चे असायचे मला आवडतात त्या रंगातले डिसेंट, इंग्लिश कलरचे, सगळं मॅचिंग तिच्या आई सारखं म्हणजे माझ्या काकू सारखं, मला काकू पण फार आवडायच्या, आवडतात त्यांच्या साड्या कायम परीट घडीच्या. साड्यांना येणारा डांबराच्या गोळ्यांचा वास, मॅचिंग परकर, बांगड्या, टिकल्या, किती तरी प्रकारच्या चप्पल; परभणी ला येताना पण त्या वेगळ्या वेगळ्या चप्पल घेऊन यायच्या.  
कायम वाटायचं अशी माझी आई का नाही रहात? माझी आई खूपच साधी - कॉटन ची साडी, तीन चार ब्लॉऊज सगळ्या साड्यांवर; एकच चप्पल सगळी कडे हसू यायचं आणि वाईट पण वाटायचं, कसलं हे कळायचं वय पण नव्हतं आणि आता आठवत पण नाही.
मी प्रकाश संत च्या वनवास मधल्या लंपन सारखी होते मनातल्या मनात सगळ्यांना बोलायचे, मुन्नी ताईला पण मी मनातल्या मनात सांगून टाकलं होत तू मला खूप आवडतेस, जशी तू आहेस तशीच राहा म्हणून, गल्ली मध्ये एखाद मांजर दिसलं तरी मला मुन्नी ताईची आठवण यायची, मी त्यान मांजराला सांगायचे माझ्या मुन्नी ताईला खूप आवडशील तू, मग त्याला आंजारून गोजारून सोडून द्यायचे, दिवास्वप्नात सगळी कडे फिरून यायचे. 
मी मोठी होत गेले, संपर्क कमी होत गेला पण मुन्नी ताई सोबत होते; कायम मनातल्या मनात. सारखी सांगायचे तुझ्या सोबत आहोत आम्ही कुठल्याही प्ररिस्थितीत, अर्ध्या रात्री आवाज दे आम्ही येऊ. बरं काही माहितीही नव्हतं ती कुठे आहे, काय करते, कुठे असते काहीच नाही तरी तिला भेटून धीर द्यावा असं कायम वाटायचं, आई जवळ मी सगळंच बोलायचे, आईला फार अभिमान वाटायचा याचा की मला सगळ्यांबद्दल आपुलकी आहे, मला समजावून सांगायची जिथे असेल तिथे ती चमकणार नको काळजी करुस. आईला पण मुन्नी ताईचे अमाप कौतुक होते आमच्या घरात स्कॉलरशीप मिळालेली पहिली मुलगी. 
एवढे वर्ष हरवलेली माझी मुन्नी ताई - दीपा ताई म्हणुन सोशल मिडिया मुळे मला भेटली आता ती नामवंत लेखिका आहे. माझ्या भिडस्त स्वभावामुळे तिला काही बोलले  नव्हते फक्त अवनीश ला तिने लिहिलेले सगळेच आवडते हे मी तिला कळवले होते. 
आम्हाला जवळ आणण्यात तिच्या वेबसाईट चा मोठा हात आहे, मी तिच्या वेबसाईट ची कायम ऋणी राहीन, त्या निम्मिताने आम्ही परत एक परिवार झालो आहोत. 
आज आमच्या दीपा ताईचा वाढदिवस, तिला वाढदिवसाच्या खूप खूप खूप आभाळभर शुभेच्छा !!!