सानिया भालेराव
धोपटमार्ग हा खूपदा नित्याचा, सवयीचा, योग्य, लॉजिकल वगैरे वाटत असतो..म्हणजे तो असेल देखील आणि असावा सुद्धा कारण म्हणूनच बहुतांश हुशार,समंजस माणसं त्याला अधिक पसंती देतात. सेफ असणं..म्हणजे सर्वार्थाने.. हे संतुलित आयुष्य जगण्यासाठी महत्वाचं असावं.. पण सेफच्या पलीकडे जाणारे, जिथे जाण्याचा मार्ग नाही पण पोहोचण्याचं ठिकाण दिसतंय आणि कधी कधी ते सुद्धा दिसत नाही पण त्या वाटेने जाणारे लोक असतात..त्यांच्या मनात येतं की वाट नसेल तर आपण करून बघूया.. असे मॅड लोक असतात काही.. या वाटेवर चालतांना काय वेगवेगळ्या पद्धतीने वाट लागते हे त्यांना नंतर लक्षात येतं पण तरीही एक झिंग असते.. ती ज्यांना समजते आणि उमजते ते चालत राहतात..कधी पडतात, कधी उडतात, कधी आपटतात..आता अशा लोकांना दुनिया वेगवेगळी नावं देते आणि ठेवते सुद्धा.. कधी कधी नशीब जोरावर असतं आणि मग एक अत्यंत संवेदनशील लेखिका, व्यक्ती जी स्वतः सुद्धा अशाच वेगळ्या वाटेवर चालत आली आहे, ती अशा वेड्या वाटसरुंवर लिहायला घेते..
आणि चक्क या अनवट वाटेच्या वाटसरुंवर पुस्तक निघतं.. तेही दोन भागात.. आता कोणी म्हणेल काय हा वेडेपणा.. असली पुस्तकं लिहिणं, वर ती प्रकाशित करणं आणि लोकांनी ती वाचणं?? पण आहेत बॉस.. वेगळ्या वाटा धुंडाळणाऱ्या प्रवाशांच्या पाठीवर मायेने हात फिरवणारे, थकलेल्या जीवला दुनियदारीच्या सिद्धांतांना झुगारून सावली देणारे.. असेच काही वेडे जीव.. आणि याची साक्ष म्हणजे बुकगंगा पब्लिकेशन चं दोन भागातील पुस्तक "पाथफाईंडर्स" जे लिहीलं आहे दीपा देशमुख यांनी..
पहिल्या भागात जवळपास पंचवीस हुरहुन्नरी लोकांसोबत माझी आणि माझ्या इकोसोलची गोष्ट आहे.. काहीतरी वेगळं करू पाहणारे लोक, त्यांच्या वाटा धुंडाळण्याच्या गोष्टी वाचल्या की आपसूकच आपल्या समोर असलेल्या नागमोडी वाटेवर सरळमार्गाने चालण्याचं बळ मिळतं. यासाठी दीपा ताई आणि या समस्त पाथफाईंडर्सचे कसे आणि किती आभार मानू? या पुस्तकाची अजून एक खास बाब ही की यामध्ये या सर्व लोकांच्या कामाबाबत तयार केलेल्या व्हिडीओ लिंकचे QR कोड्स आहेत. ते स्कॅन केले की ताबडतोब मोबाईलवर आपल्याला त्यांच्या कामाबद्दलची व्हिडीओ लिंक बघता येते. अजून एक उत्तम गोष्ट ही की यातले कित्येक जण उत्तम सामाजिक जाण घेऊन समाज हिताचं काम करत आहेत, आणि त्यांचे संपर्क क्रमांक, ईमेल आयडी यात दिले आहेत त्यामुळे कित्येकांना मदतीचे हात पुढे येऊ शकतील. माझ्या साठी एक स्पेशल बाब ही की या पुस्तकात अन्वर हुसेन सरांच्या नंतर माझ्या कामाबद्दल लिहीलं आहे. अन्वर सरांच्या चित्रांची, लेखणीची आणि त्यांच्यामधील संवेदनशील माणसाची मी जबरदस्त फॅन आहे सो त्यांच्या खाली माझं नाव येणं ही माझ्यासाठी फार फार मोठी गोष्ट आहे.
दीपा ताईंनी या पुस्तकातून सामाजिक भान जपत काम करणाऱ्या कित्येक लोकांच काम पुढे आणलं आहे. खूपदा अशा कामात बरेच अडथळे येतात आणि मग जेव्हा आपण योग्य मार्गावर आहोत नं? असं मन चाचपडायला लागेल तेव्हा मग हे पाथफाईंडर्स नक्कीच मैलाचा दगड ठरतील. या पुस्तकातला सहभाग म्हणजे इकोसोल तर्फे माझं इंगुलं चिंगुलं नदी प्रदूषणावरचं काम, बाजारातील स्वच्छतेच्या केमिकल बेस्ड उत्पादनांना पर्यावरण पूरक, आरोग्याला कोणताही अपाय न पोहोचवणारे पर्याय निर्माण करण्याच्या या वाटेवर माल मिळालेली, जीवला विसावा देणारी ही एक शाबासकी आहे असं मी मानते. अजून खूप चालायचं आहे आम्हा सर्वांना, आमची ताकद वाढवल्या बद्दल दीपा ताईंचे आभार आणि हे पुस्तक वाचून पाठीवर कौतुकाने थाप देणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून आभार. I feel blessed and humbled by the Unending love and encouragement from all you wonderful people. Cheers to all the people out there who have guts to take the Road less travelled...
( पुस्तकाबद्दल : हे पुस्तक बुकगंगा पब्लिकेशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.)
©सानिया भालेराव
6/11/2020