चिन्मय अजित आचार्य
माणसाला नेहमी कला आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत होणार्या नावीन्यपूर्ण गोष्टींचं अप्रुप वाटत राहिलं आहे. तो नेहमीच त्या निर्माण होणार्या नव्या गोष्टीकडे आकर्षित झाला आहे. त्याची तो दखल घेत आला आहे. मग आपल्याला मिळालेलं आणि कळालेलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी लिखित आणि मौखिक पद्धतींचा त्यानं वापर करायला सुरुवात केली.
जगात या नावीन्यपूर्ण घडतात तरी कशा? त्यामागे असणारे मेंदू हे सर्वसामान्यांच्या मेंदूपेक्षा वेगळे असतात का? एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांच्यातली चिकाटी इतरांपेक्षा वेगळी का असते? काहीतरी ठोस निर्णय लागल्याशिवाय ते लोक मागे का हटत नाहीत? असे अनेक प्रश्न आपल्याला काही लोकांबद्दल पडतात. उत्तराच्या शोधात झपाटल्यासारखं आपलं कार्य करणारी आणि इतरांना प्रकाश देणारी ही माणसं बघितली, ऐकली किंवा वाचली, तर सहजपणे आपण त्यांना ‘जीनियस’ असं म्हणून जातो.
अशा विलक्षण आयुष्य आणि कर्तृत्व गाजवलेल्या जीनियस व्यक्तींचा शोधप्रवृत्त जीवनपट घेऊन सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख वाचकांसाठी एक अनमोल अशी दिवाळी भेट घेऊन येत आहेत. जीनियस या जग बदलवणार्या ७२ लोकांची एक टीम १२-१२ च्या संख्येनं वाचकांच्या भेटीला येणार आहे. येत्या दिवाळीत त्यापैकी १२ वैज्ञानिक वाचकांशी संवाद साधणार आहेत. हे बाराही वैज्ञानिक स्वतंत्र एकएका पुस्तकात आपलं स्थान घेऊन बसली आहेत.
दिवाळीत येणार्या १२ जीनियस वैज्ञानिकांपैकी आधुनिक खगोलशास्त्राचा पितामह म्हटला जाणारा गॅलिलिओ असणार आहे. त्यानं पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते असं म्हटलं आणि गतीच्या नियमापासून अनेक गोष्टी प्रयोगानं सिद्ध केल्या. पण त्या वेळच्या सनातन्यांचा रोषही ओढवून घेतला. न्यूटन म्हटलं की गुरूत्वाकर्षणाचा शोध हे आपल्याला ठाऊकच आहे. पण याच न्यूटननं गणित या विषयाशी साधर्म्य साधून आपल्या बुद्धिमत्तेचा दरारा पुढची कित्येक दशकंच नव्हे, तर शतकं टिकवला हेही वाचणं वाचकांसाठी रंजक ठरणार आहे. तसंच शास्त्रज्ञ हा शब्द उच्चारला की ताबडतोब आईन्स्टाईन याचं नाव आपल्या ओठांवर आपोआप येतं. आईन्स्टाईनविषयी तर मोजता येणार नाहीत एवढी पुस्तकं, एवढ्या फिल्म्स बनवल्या गेल्या, पण त्या माणसाविषयीचं आकर्षण कमीच होत नाही. त्याच्या अनेकविध किस्स्यांबरोबर त्यानं लावलेले शोधही आपल्याला सोप्या पद्धतीनं इथं वाचायला मिळणार आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्या संशोधनानं जगभर प्रसिद्ध असलेल्या स्टीफन हॉकिंगची भेट इथेच जीनियसमध्ये होणार आहे.
पूर्वी अनेक औषधोपचार नसलेले रोग साथीच्या रुपात येऊन जगभर धुमाकूळ घालत आणि हजारो नव्हे तर शेकडो लोकांचे प्राण घेत. अशा वेळी अशा रोगांवर औषधं शोधून त्यांना या जगातून पिटाळून लावणारे जेन्नर, फ्लेमिंग, कॉख यांसारखे वैज्ञानिकही इथेच आपल्याला भेटणार आहेत. पाश्चरायझेशनचा शोध लावणारा लुई पाश्चरही जीनियसमधून दाखल होणार आहेच.
भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही क्षेत्रात दोनदा नोबेल पारितोषिक मिळणारी मेरी क्युरी आपल्याला जीनियसमधून गप्पा मारणार आहे. तिच्या आयुष्यातल्या संघर्षाची गाथा बघितली तर तिचं आकाशाएवढं विशालपण आपल्या मनात मावू शकत नाही. त्याच वेळी लीझ माइट्नर या स्त्री वैज्ञानिकाला मात्र १५ वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन होऊनही केवळ स्त्री असल्यानं डावलण्यात आलं. तरीही तिनं स्वतःला कसं सिद्ध केलं हा प्रवास जीनियसच उलगडणार आहे. हायड्रोजन बॉम्बचा जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर आणि उघड्या डोळ्यांनी बॉम्बस्फोटाचं दृश्य पाहणारा रिचर्ड फाईनमन यांचं कार्य आणि आयुष्यपट बघणं हा एक आनंददायी आणि रोमहर्षक भाग आहे.
जीनियस ही दिवाळीत येणार्या १२ पुस्तकांची मालिका विद्यार्थ्यांना तर नक्कीच उपयोगी ठरणार आहे, पण त्याचबरोबर शिक्षक, पालक, उद्योजक, गृहिणी आणि कोणाही माणसाला ज्याला जगाविषयी कुतूहल आहे अशा सगळ्यांच्याच ते ज्ञानवृद्धीत भर टाकणारं आहे.
अलीकडे विज्ञानावरची कमी पुस्तकं निघत असताना हा उपक्रम मनोविकास प्रकाशनानं हाती घेतला आणि त्यातही आगाऊ बुकिंगसाठी किंमत खूपच कमी केली आणि त्यातलेही २० रुपये दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचं ठरवलं याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि जीनियसचे लेखक अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांना जीनियस आणि पुढच्या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा!
चिन्मय अजित आचार्य
chinmayacharya28@gmail.com